तिची तपश्चर्या - भाग ४६
दोन दिवसांनी उमा माहेरून घरी परत जाते. पाहू पुढे ..
आई-बाबांचा निरोप घेताना दुःखी कष्टी झालेली उमा घरी आल्यावर मात्र खूप उत्साही झाली. आता थोड्याच वेळात फॅक्टरीतून मानस येईल. आपली आणि त्याची भेट होईल या विचाराने तिला खूप आनंद होतो. ती आणि आई बाहेर झोपाळ्यावर बसल्या होत्या इतक्यात मानसच्या गाडीचा हॉर्न वाजला. उमाच्या चित्तवृत्ती पुलकीत झाल्या आणि ती एकदम उठून उभी राहिली. आई तिच्याकडे पाहतच राहिल्या. ही अगदी लहान मुली सारखी निरागस आहे. कधी मानस येतोय असं तिच्या साध्या हालचालीतून पण जाणवत होतं. मानस आणि बाबा घरात आले. उमाला बघून मानसच्या चेहऱ्यावर पण आपोआप हसू उमटलं.
"काय उमा आई बाबा बरे आहेत ना. दोन दिवस अगदी भरपूर गप्पा मारून झाल्या असतील."
"आई बाबा बरे आहेत. आता हळूहळू रोजच्या रुटीनला सरावतील. काल संध्याकाळी मी त्या दोघांना थोडं बाहेर फिरून यायला सांगितलं. मी त्यांना सांगून आले आहे रोजच थोडा फेरफटका मारत जा. छान वाटते. आता आई पण तिची कामं कमी करणार आहे."
"चला आता मी तुमच्या सगळ्यांसाठी मस्त चहा बनवते."
"हो बनव बाई . तुझ्या हातच्या चहाची मानसला सवय लागली आहे."
"आई तू मला चिडवायची एकही संधी सोडत नाहीस."
चहा पिऊन झाल्यावर मानस फ्रेश व्हायला गेला. थोड्या वेळाने आईनी उमाला पण मानसचं आवरलं का पहयला पाठवलं. त्याचं आवरल्यावर दोघं एकत्रच खाली या जेवायला असं सांगितलं. उमाच्या लक्षात आलं दोघांना एकांत मिळावा म्हणून आईनी तिला वर पाठवलं आहे. ती वाटच बघत होती. पडत्या फळाची आज्ञा घेऊन उमा लगेचच वर गेली. उमा वर आल्याचं मानसने पाहिलं.
"काय गं तुला अजून राहायचं होतं का माहेरी? आईने दोन दिवस म्हटलं म्हणजे अगदी दोनच दिवस राहायचं असं काही नाही. फक्त फोन करून सांगायचं की तू अजून राहणार आहेस. काहीच हरकत नव्हती." खरं तर उमा घरी आली म्हणून त्याला मनातून खूप आनंद झाला होता
"आई बाबा आता बरे आहेत. बाबा सुद्धा आता निवृत्तीनंतरच्या जीवनात हळूहळू रुळतील. त्यांना आता थोडाफार आराम तरी करायला मिळेल. अधून मधून मी जाऊन त्यांना भेटून येत जाईन."
"हो नक्कीच. कधी आपण दोघेही जाऊ त्यांना भेटायला म्हणजे मला आईंच्या हातच्या अळूवड्या खायला मिळतील." मानस असं बोलल्यावर दोघंही हसायला लागले.
"बरं आता आपल्याला काश्मीरहून येऊनसुद्धा बरेच दिवस झाले आहेत. मी चित्राताईंना बरेच वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एकदाही माझा फोन उचलला नाही. तुम्हाला नंदिनीला भेटायचं आहे, तिच्याशी बोलायचं आहे ना. तिच्या बाबतीत काय घडलं सगळं जाणून घ्यायचं आहे ना."
"हो उमा मला तिच्याबद्दल सर्व जाणून घ्यायचं आहे. पण तू म्हणतेस त्या फोन उचलत नाहीत म्हणजेच त्यांच्या बाजूने त्यांना आपल्याशी काही बोलायचं नसेल. अर्थात हे त्यांना नंदिनीने सांगितलं असावं असं मला वाटतं. खरंतर तिथून काहीच प्रतिसाद येत नाही तर तू खुश व्हायला हवं. तुझ्या जागी दुसरी मुलगी असती तर तिने असं आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न कधीच केला नसता."
"तुम्ही तुमच्या प्रेमाशी एकनिष्ठ आहात याचा मी खूप आदर करते. मी माझ्या परीने सर्व प्रयत्न प्रामाणिकपणे करणार आहे. पुढे माझं काय होईल हा विचार मी कधीच करणार नाही."
"धन्य आहे तुझी."
"चित्राताई माझा फोन उचलत नाही. मी आता त्यांना मेसेज करते. नशीब आपलं की चित्राताईंनी त्यांचा पत्ता मला दिला आहे. आता आपण सरळ साताऱ्याला जाऊया. तिथे गेल्याशिवाय काहीच कळणार नाही. आपण गेलो तर काहीतरी त्या बोलतीलच ना. असं तर नाही ना की त्या आपल्याला हाकलून देतील."
"हो तू साताऱ्याला जायचं म्हणतेस पण मला घरी काहीतरी कारण सांगावं लागेल ना. आई-बाबा विचारतीलच ना असं मध्येच साताऱ्याला का जात आहे. कॉलेजमधल्या मित्राचे लग्न वगैरे काहीतरी सांगावं लागेल. तिथून दोन दिवस महाबळेश्वरला जाऊन येऊया."
"हो आता रात्री जेवताना सांगा म्हणजे दोन दिवसात आपल्याला निघता येईल. आपण कसं जायचं त्याप्रमाणे बुकिंग करायला पण लागेल."
"अगं नाही आपली गाडी घेऊनच जाऊया ते सोयीस्कर होईल."
"चला आता खाली जाऊया. आईने मला तुमचं आवरलं की नाही ते बघायला पाठवलं आणि मी इथेच गप्पा मारत बसलेय. हे बघा जे काय असेल त्याला दोघं मिळून सामोरे जायचंय आपल्याला. तुम्ही टेन्शन घेऊ नका."
उमा म्हणाली खरी टेन्शन घेऊ नका पण मानसला खूप टेन्शन आलं होतं. नंदिनी कडून काय ऐकायला मिळेल याचा तो विचार करत होता. एवढ्या मोठ्या अपघातातून ती कशी वाचली हे तर त्याला जाणून घ्यायचं होतं शिवाय ती साताऱ्यालाच का राहते तिच्या आई-वडिलांचा शोध तिने घेतला की नाही. असं तर नसेल ना की तिचे आई-बाबाच साताऱ्याला आता राहत आहेत.
उमाला वाटत होतं जे काय असेल ते लवकरात लवकर कळेल तर बरं होईल. उगाचच असं नुसतंच विचार करत जीवन जगण्यात काहीच अर्थ नाही. दोघेजण जेवायला खाली आले. आई-बाबा आधीच येऊन बसले होते. आई गीताला म्हणाल्या,
"गीता मानस आणि उमा आलेत जेवायला.चला पानं घेऊया."
जेवणात ताकाची कढी पाहून उमाच्या तोंडाला पाणी सुटलं. खरंतर आईकडे ताकाची कढी केली होती. उमाला आठवड्यातून दोन-तीन वेळा ताकाची कढी दिली तरी खूप आवडायचं. ती लगेच म्हणाली,
"वा गीताताई ताकाची कढी केली ना आणि कांदा भजी पण. खूपच छान."
जेवताना मानसनेच विषय काढला. तो आईला म्हणाला,
"माझ्या कॉलेजमधल्या मित्राचं लग्न आहे साताऱ्याला म्हणून मी आणि उमा दोन दिवसांनी साताऱ्याला जाणार आहोत. तिथूनच पुढे दोन-तीन दिवस महाबळेश्वरला पण जाऊन येऊ. इतक्या जवळ जातोय तर महाबळेश्वर पण फिरून येतो."
"अरे वा मानस स्वतःहूनच कुठेतरी जायला निघाला आहेस. उमाला असं मध्ये मध्ये कुठेतरी फिरायला घेऊन जात जा. उमा तुला स्ट्रॉबेरी आवडते ना. छान सीजन आहे आता महाबळेश्वरला. अगदी मनसोक्त स्ट्रॉबेरी खायला मिळतील."
"बाबा मी चार-पाच दिवस नसलो फॅक्टरीत तर काही हरकत नाही ना."
"अरे मानस आम्ही तुला सांगत असतो की तू अधून मधून आराम कर. कुठेतरी जा पण तुलाच रोज फॅक्टरीत यायचं असतं."
"बरं मानस मी काय म्हणतेय तुम्ही दोघं महाबळेश्वरला जाऊन आलात की आमचं म्हणजे माझं, बाबांचं आणि उमाच्या आई-बाबांचं पण गोव्याचे बुकिंग करून दे एक आठवडाभराचे. आता उमाचे बाबा निवृत्त झाले आहेत. त्यांना पण थोडा बदल मिळेल. ते सुद्धा असे फिरायला म्हणून कुठे गेले नाहीयेत."
"हो आई आम्ही आल्यावर तुम्ही नक्कीच जा मी सगळं तुमचं व्यवस्थित बुकिंग करून देईन. उमाच्या आई बाबांना तू कल्पना देऊन ठेव म्हणजे ते तसे तयारी करून ठेवतील."
"गोव्याला म्हणजे काय शांतादुर्गा, मंगेशी देवीचे देऊळ आहे, बीचेस आहेत. पर्यटनासाठी अगदी उत्तम स्थळ आहे. उमा नंतर तुम्ही दोघं पण कधीतरी गोव्याला जा. गोवा म्हणजे तरुणांना, म्हाताऱ्यांना सगळ्यांनाच पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे."
"होय मी ऐकले आहे गोव्याबद्दल. तिथे बघण्यासारखं, फिरण्यासारखे बरंच काही आहे."
"तुम्ही साताऱ्याला कसे जाणार आहात. मानस सगळे बुकिंग वगैरे व्यवस्थित आधीच करून ठेव."
"हो लग्न तीन दिवसांनी आहे म्हणूनच आम्ही एक दिवस आधीच जाऊ म्हणजे मग व्यवस्थित लग्नाला हजर राहता येईल. गाडी घेऊनच जाऊ म्हणजे सगळीकडे फिरायला बरं पडतं."
"गाडी नेणार तर मग शंकरला घेऊन जा बरोबर. म्हणजे तुला पण जरा एन्जॉय करता येईल."
"नाही अगं सातारा एवढं काही लांब नाहीये मीच गाडी ड्राईव्ह करेन."
जेवण झाल्यावर थोड्या गप्पा टप्पा झाल्यावर सगळे झोपायला गेले. आपल्या आई-बाबांची पण इतकी काळजी घेतली जाते हे पाहून उमाला मनोमन समाधान वाटले.
(आता कथेत खऱ्या अर्थाने ट्विस्ट येणार आहे. नंदिनी मानसशी काय बोलेल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे