तिची तपश्चर्या - भाग ४७
नंदिनीने मानसला भेटायला हवे असा विचार उमाच्या मनात कधीपासून घोळत होता. पाहूया पुढे..
मानस आणि उमा सकाळी लवकर उठूनच साताऱ्याला जायला निघाले होते. मानसने आदल्या दिवशीच गाडीत पेट्रोल भरलं होतं इतर तयारी केली होती. आई बाबा दोघे पोर्चमध्ये त्यांना बाय करायला आले होते.
"मानस गाडी सांभाळून चालव आणि पोहचल्यावर फोन कर. उमा तू पण काळजी घे."
"हो आई तुम्ही काही काळजी करू नका आम्ही पोहोचल्यावर फोन करतो."
मानसने गाडी सुरू केल्यावर उमाच्या मनात आलं इतके दिवस आपल्यालाच वाटत होतं की नंदिनी आणि मानसची भेट व्हावी पण आता मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. इथूनच परत फिरायचं का? छे हा तर निव्वळ पळपुटेपणा होईल. जे काय होईल त्याला सामोरे जाण्यातच शहाणपणा आहे. मानसने एफएम ऑन केला. हेमंत कुमार आणि लतादीदींच्या आवाजात परिस्थितीला अनुरूप गाणं लागलं होतं,
"तुम्हें याद होगा हम तुम मिले थे
मोहब्बत की राहों में मिलके चले थे"
मोहब्बत की राहों में मिलके चले थे"
मानस आणि उमाने दोघांनी एकाच वेळी एकमेकांकडे पाहिलं. त्याला हे गाणं म्हणजे आपल्या आताच्या परिस्थितीला उद्देशून लागलं आहे असं वाटत होतं. एफएम वर नेमकं हेच गाणं कसं काय लागलं असेल असा तो विचार करत होता. उमाच्या डोळ्यांसमोर तिच्या मनातले विचार चित्रीत होत होते आणि नंदिनी,
"भुला दो मोहब्बत में हम तुम मिले थे
सपना ही समझो के मिल के चले थे"
सपना ही समझो के मिल के चले थे"
असं म्हणते असं तिला मनोमन वाटत होतं आणि ते सत्यात उतरावं असंही एक मन आवर्जून सांगत होते. आपल्या मनातली ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल असे एक मन तिला ग्वाही देत होतं दुसरं मन सांगत होतं की आता नंदिनी जिवंत आहे म्हणजे ते शक्य नाही. तिच्या मनाची द्विधा मनःस्थिती झाली होती. रस्त्यात एक चांगलं हॉटेल बघून ते दोघं नाश्त्यासाठी थांबले. दोघं एक छान जागा बघून बसले आणि मेनू कार्ड पाहत होते. इतक्यात तिथल्या वेटरने टीव्ही ऑन केला आणि काय योगायोग तर टीव्हीवर सुद्धा 'सट्टा बजार' सिनेमातील तेच गाणे लागलं होतं. दोघांनीही लगेच वळून तिकडे पाहिलं. हा योगायोग पाहून दोघेही हसू लागले.
"उमा हे गाणं ऐकून तुला काय वाटतं? नंदिनीला भेटल्यावर काय होईल असे तुला वाटतंय?"
"हे गाणे ऐकून आपण जो अर्थ काढू त्याचप्रमाणे विचार करू शकतो. त्यामुळे आता तर्क लढवण्यात काहीच अर्थ नाही."
"बरं तू काय खाणार आहेस. काहीतरी पोटभरीचं खायला हवं. पोहोचायला किती वेळ लागेल माहित नाही. मी एक मसाला डोसा घेतोय तू पण काहीतरी हेवी घे."
"ठीक आहे मी एक ओनियन उत्तप्पा घेते."
दोघांनी ऑर्डर दिली आणि आजूबाजूला पाहू लागले. इतक्यात उमाचं लक्ष खिडकीमधून बाहेर हॉटेलच्या लाॅन वर गेलं. तिने पाहिलं तर तिथे दोन साळुंक्या तिला दिसल्या आणि लहानपणापासून दोन साळुंक्या दिसल्यावर ती खुश व्हायची तशी ती खुश झाली. तिच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित उमटलं. मानसने तिला विचारलं,
"काय ग तुला काय आठवलं का, तुझ्या चेहऱ्यावर हलकसं हसू दिसतंय."
"हो ते बाहेर लॉन वर दोन साळुंक्या बघितल्या. आम्ही माध्यमिक शाळेत असल्यापासून किती साळुंक्या दिसल्या त्याप्रमाणे आपला दिवस कसा जाणार हे ठरवायचो,
'वन फाॅर साॅरो
टू फॉर जॉय
थ्री फाॅर ए लेटर
फोर फॉर ए बॉय'
'वन फाॅर साॅरो
टू फॉर जॉय
थ्री फाॅर ए लेटर
फोर फॉर ए बॉय'
"अगं पण याचा अर्थ काय?"
"अर्थ जरा मजेशीर आहे. ऐकून तुम्ही हसाल. अहो म्हणजे एक साळुंकी दिसली तर दिवस वाईट जाणार, दोन दिसल्या तर दिवस आनंदात जाणार, तीन दिसल्या तर आपल्याला एखादे पत्र येणार म्हणजे बहुतेक लव्हलेटर आणि चार दिसल्या तर आपल्याला एखादा मुलगा भेटणार म्हणजे बॉयफ्रेंड. अर्थात या सगळ्या खुळ्या समजूती आणि गंमत म्हणजे समजा एखाद्या मैत्रिणीला फक्त एकच साळुंकी दिसली ना तर ती दुसरीला कोणाला कधीच सांगणार नाही पण तेच तिला जर दोन साळुंक्या दिसल्या तर ती लगेच दुसरीला सांगणार. तीन दिसल्या तर एकमेकींची मस्करी करायची आणि चार दिसल्या तर काय विचारायलाच नको"
"अरे म्हणजे तुमच्या मुलींचे पण असं सगळं काही चालत असायचं का? मला वाटलं मुली म्हणजे एकदमच सज्जन."
"अहो ही सगळी गंमत आहे. चार साळुंक्या दिसल्या म्हणजे काय कोणत्या मुलीला बॉयफ्रेंड भेटला असं नाही."
"चल आपली ऑर्डर आली. आता गरम गरम खाऊन घे. अजून काय हवं असेल तर सांग लाजू नकोस. नंतर मस्त गरम गरम चहा पिऊ या."
"हो तिखट खाल्ल्यावर चहा तर पाहिजेच."
खाता खाता मानसने बाहेर लाॅन वर बघितलं तर त्याला चार साळुंक्या दिसल्या. त्याने उमाला ते दाखवले आणि म्हणाला,
"आता या चार साळुंक्या बघितल्यावर तुला कोण बॉयफ्रेंड भेटणार आहे आता तर तुझं लग्न झालंय."
"शी बाबा मी उगाचच तुम्हाला सांगितलं. प्रत्येक वेळी तुम्ही मला चिडवत बसणार."
"नाही गं चिडवणार. हे आत्ताच तू सांगितलं म्हणून मी बोललो."
"आईना फोन करून सांगा आपण कुठपर्यंत पोहोचलो त्या वाट बघत असतील."
"हो हो सांगायलाच हवं. तू एक आदर्श मुलगी, आदर्श सून आहेस."
"लग्न झाल्यावर स्त्रीची आणखीन पण नाती असतात. त्याला पण आदर्श जोडा ना."
"कोणतं नातं"
"आदर्श पत्नी" उमा असं बोलल्यावर मानस एकदम गप्प बसला. त्याच्या मनात आलं उमा खरोखरच एखाद्या आदर्श पत्नीप्रमाणे वागते. सगळ्या जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने निभावते. पण आपण एक आदर्श नवरा नाही आहोत ना. सप्तपदी चालताना दिलेल्या वचनांना आपण कुठे जागतोय."
"हो तुम्ही एवढं सिरीयसली घेऊ नका मी तुम्ही बोलत होता त्या ओघाने बोलले. माझ्या तशा अपेक्षा नाहीत. तुम्ही मला लग्नाआधी सगळं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे मी तशा काही अपेक्षा ठेवल्या नाहीयेत."
"उमा हा तुझा चांगुलपणा आहे. कधी कधी मला वाटतं मी त्याचा गैरफायदा घेतो."
"नाही असं काहीच नाहीये माझ्या मनात असं कधीच येत नाही आणि येणार पण नाही. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. तुम्ही सर्वांना खूप समजून घेता. कोणाचंच मन कधी दुखावत नाहीत."
"बापरे किती कौतुक माझं. चल निघूया का आपण."
"चला आता पोटोबा झाला आहे. किती वेळात पोहोचू आपण."
"दीड दोन तासात जाऊ आपण."
चित्राताईंनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचायला दहा मिनिटंच उरली होती आणि उमाच्या हृदयातली धडधड वाढली होती. एक अनामिक हुरहुर तिला छळत होती. जसंजसं घर जवळ येत होतं तस तसा मानसच्या गाडीचा स्पीड कमी होत होता. उमाने त्याला धीर देत म्हटलं,
"तुम्ही शांत रहा सगळं चांगलं होईल."
(मानसने चित्रा ताईंच्या दरवाजाची बेल वाजवली. दार उघडायला कोण येतंय पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा