Login

तिची तपश्चर्या - भाग ४८

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी

तिची तपश्चर्या - भाग ४८

मानस आणि उमा दोघे चित्राताईंच्या दरवाजासमोर उभे आहेत. त्याने दरवाजावरची बेल वाजवली आहे पाहूया पुढे ..

दरवाजा उघडेपर्यंत मानस बंगल्याचे निरीक्षण करत होता. बंगला म्हणजे वास्तूकलेचा एक अप्रतिम नमुना होता. बंगल्यासमोरच्या मोकळ्या जागेत सुंदर सुंदर फुलझाडं आकर्षक रित्या लावली होती. दरवाजा अस्सल सागवानी आणि प्रशस्त होता. एकंदरीतच बंगला त्यांच्या श्रीमंतीची गाही देत होता. चित्रा ताई आणि नंदिनी दोघी हॉलमध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. दुपारचे चार वाजले होते. इतक्यात दरवाजाची बेल वाजली. आता कोणाला असेल असा विचार करत चित्राताई उठून दरवाज्यापर्यंत आल्या. त्यांनी दार उघडलं आणि त्या डोळे विस्फारून पाहतच राहिल्या. दरवाजात उमा आणि मानस उभे होते. ते दोघं एक ना एक दिवस इथपर्यंत पोहोचणारच याची त्यांना खात्री होती. परंतु ते इतक्या लवकर इथे येतील असं वाटलं नव्हतं. खरंतर उमाने जेव्हा पत्ता मागितला तेव्हा चित्राताईंच्या मनात आलं होतं की तिला पत्ता देऊ नये. त्याच्यात त्यांचाही एक स्वार्थ होता. तो म्हणजे त्यांचा भाऊ डॉक्टर जयंत. दोघांना दारात बघून त्यांनी

"यां ना आत मध्ये" असं म्हटलं.
चित्राताई कोणाला आत या म्हणते म्हणून नंदिनीने जागेवरूनच तिला विचारलं,

"ताई कोण आहे ग!"

"तूच बघ की जरा उठून"

चित्राताई असं बोलल्यावर नंदिनीने उठून मागे वळून बघितलं. दारातून मानस आणि उमा आतमध्ये येत होते. अचानक मानस ला पाहून नंदिनीचे डोळे भरून आले. ती काही क्षण एकटक त्याच्याकडे पाहतच राहिली. मानस पण नंदिनीला पाहत राहिला. त्याचे डोळे सुद्धा पाणावले. ते जवळ येताच नंदिनीने दोघांनाही बसायला सांगितलं आणि ती म्हणाली,

"मी पाणी घेऊन येते बसा तुम्ही."

"अग तू यांच्याजवळ बस मीच पाणी घेऊन येते"

चित्राताई पाणी आणायला आत मध्ये गेल्या. मानस आणि उमा शेजारी शेजारी बसले नंदिनी त्यांच्यासमोर बसली. काय बोलायचं हा सर्वांनाच प्रश्न पडला. शेवटी मानसनेच मौन तोडलं,

"नंदिनी कशी आहेस?"

"तुझ्यासमोर जशी दिसते तशीच आहे"

इतक्यात चित्राताई पाणी घेऊन आल्या. उमाने उठून दोघीनाही नमस्कार केला. मानसने उमाची ओळख करून दिली.

"ही माझी पत्नी उमा. ‌ तीन महिन्यांपूर्वीच आमचं लग्न झालंय."

"मानस सॉरी त्यादिवशी विमानतळावर मी तुला ओळख दाखवली नाही."

"हरकत नाही नंदिनी. तुझा इतका मोठा अपघात झाला. आम्ही सर्वांनी खूप शोध घेतला तुझा. खूप प्रयत्न केले. शेवटी तीन महिन्यांनी अपघाताची केस बंद करण्यात आले. तुझ्याबरोबर असणाऱ्या चार मैत्रिणींचे मृतदेह मिळाले. त्यांच्या कपड्यांचे थोडे फार अवशेष शिल्लक होते त्यावरून ते कळलं. परंतु तुझा शोध काही केल्या लागत नव्हता. खूप शोध घेतल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की अपघात इतका भयंकर होता की पाचवी व्यक्ती जिवंत असण्याची शक्यच नाही आणि म्हणून त्यांनी ती केस बंद केली."

"अरे तुम्ही इतक्या लांबून आला आहात. चहा आणि बिस्किटे तरी घ्या ना. तुम्हाला घर सापडायला त्रास नाही झाला ना." नंदिनीचे बोलल्यावर चित्राताई आत मध्ये गेल्या. थोड्यावेळाने बाहेर आल्या तेव्हा त्यांच्या मागे एक स्त्री दोघांसाठी चहा घेऊन आली. चहा बरोबर एका प्लेट्स मध्ये बिस्कीट्स होती.

"चित्राताईंनी व्यवस्थित पत्ता दिला होता त्यामुळे आम्हाला घर शोधायला त्रास नाही झाला."

चहा पिऊन झाल्यावर पहिल्या प्रथमच उमाने संभाषणात भाग घेतला.

"नंदिनी ताई तुम्हाला आणि यांना जर एकांतात काही बोलायचं असेल तर मी बाहेर थांबते."

"अगं नाही. तसं काहीच नाही. आम्ही जे काय बोलणार ते तू आणि चित्राताईने पण ऐकलं तर काहीच हरकत नाही."

"नंदिनी तुझा अपघात झाल्यानंतर काय झालं तेच मला जाणून घ्यायचं आहे. इतका भयाण अपघात कसा झाला होता काहीच कळलं नाही. सगळ्यांनी आशाच सोडली होती. सगळ्यांचं म्हणणं होतं की तू जिवंत असण्याची शक्यताच नाही."

"आज मी तुमच्यासमोर जिवंत उभी आहे त्याचं सारं श्रेय मी डॉक्टर जयंत, डॉक्टर समीर आणि चित्रा ताईला देईन. ते नसते तर माझं काय झालं असतं हे मी सांगू शकत नाही. माझ्यासाठी ते देवच आहेत. खरं तर माझा अपघात झाल्यानंतर मी पूर्णपणे शुद्धीवर येईपर्यंतची सगळी कथा चित्राताई जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकते. मला तिच्याकडूनच सगळं कळलं."

"खरं सांगू का नंदिनीला आम्ही पहिल्यांदा ज्या अवस्थेत पाहिलं ते आठवलं तरी माझ्या अंगावर काटा उभा राहतो. आम्ही तिला रस्त्यावर पडलेले पाहिलं तेव्हा फक्त तिचा श्वास चालू होता म्हणून तिला जिवंत म्हणू शकत होतो. मला तर ती जगेल अशी खात्रीच नव्हती. जयंत आणि समीरने त्यांचे सारं वैद्यकीय कौशल्य पणाला लावलं. दोघांनाही खात्री होती कि ती निश्चितच जगेल आणि बरी होईल."

"नंदिनी पण तू आणि तुझ्या मैत्रिणी पिकनिकला जाणार हे तू कोणाला सांगितलं नव्हतं का. आपण आदल्या दिवशीच भेटलो होतो. मला पण तू काही बोलली नव्हती."

"अरे सर्व रात्री अचानकच ठरलं. आधी गीता आणि मिता दोघींनी एकमेकींना फोन केला आणि त्यांनी ठरवलं. मग त्यांनी मला फोन केला. नंतर मेघाला विचारायचं ठरवलं. खरं तर आम्ही कार हायर करूनच जाणार होतो. पण ती सोय होऊ शकली नाही म्हणून मग मीच त्यांना म्हटलं की मी माझी गाडी काढते. त्या नकोच म्हणत होत्या कारण मला एन्जॉय करता येणार नाही. आपण तुझी गाडी नको काढूया. त्यांचं तेव्हा ऐकलं असतं तर खूप बरं झालं असतं. माझ्यामुळे त्यांचा जीव गेला. हे माझ्या मनातील शल्य कधी जाणारच नाही."

लगेच उमा म्हणाली,

"नंदिनीताई तुम्ही असं समजू नका. स्वतःच्या मनाला त्रास करून घेऊ नका. जन्माला येतानाच प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं असतं. ज्याची त्याची वेळ आली की त्याला जावंच लागतं."

"ते जरी खरं असलं तरी मी निमित्त ठरले."

"मला काहीच सांगितलं नव्हतं त्यामुळे आधी माझ्या मनात विचार आला की हा काही घातपात आहे का. कोणीतरी मुद्दामच तुम्हाला कुठेतरी बोलावलं असेल आणि त्यानेच घडवले असं मला वाटलं. ‌ तुझी आई म्हणाली की सकाळी लवकर उठूनच ती घराबाहेर पडताना आम्हाला सांगून गेली ती आणि तिच्या मैत्रिणी पिकनिकला जात आहेत."

"अचानक ठरल्यामुळे मला तुला पण सरप्राइज द्यावं असं वाटलं म्हणून मी तुला काहीच सांगितलं नाही. तुला सांगितल्यावर तू रागावशील मला माहिती होतं.
तुझ्याऐवजी नियतीच आमच्यावर रागावली."

"चित्राताई तुम्ही म्हणालात ना आम्हाला. आम्हाला म्हणजे तुमच्यावर आणि कोण कोण होतं आणि नंदिनी तुम्हाला कुठे सापडली? तुम्ही खाली जंगलात कशासाठी आला होतात?"

"मी आणि जयंत आम्ही दोघे खालून त्या रस्त्यावरून कारने जात होतो. जयंतला एक फोन आला होता म्हणून त्याने गाडी जरा साईडला घेतली होती. इतक्यात मी पाहिलं तर मला समोरच काहीतरी घरंगळत खाली येताना दिसलं. मला जाणवलं की ते एक मानवी शरीर होतं मग मी जयंतला त्या दिशेला हात करून दाखवले. त्याने लगेच फोन बंद केला. गाडी थोडी पुढे घेऊन एका कोपऱ्यात लावली आणि आम्ही दोघेही पटकन तिथे धावलो."

(नंदिनीच्या जीवनात आणि काय काय घडलं ते पाहूया पुढील भागात)