Login

तिची तपश्चर्या - भाग ४९

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी

तिची तपश्चर्या - भाग ४९

नंदिनी बोलत होती. तिची कहाणी ऐकताना सर्वांचेच डोळे पाणावले होते. ती काय सांगते पाहूया पुढे..

नंदिनीला पुढे काही बोलताच येईना. चित्राताईने तिच्या पाठीवर हात ठेवला.

" नंदिनी शांत हो. तू काही बोलू नकोस मी सांगते पुढचं.

"नंदिनी तुला त्रास होत असेल तर आपण थोडा वेळ दुसरं काहीतरी बोलूया. शांत हो नंदिनी." नंदिनीला शांत करून चित्राताई बोलू लागल्या.

"गाडी कोपऱ्यात लावली आणि आम्ही धावतच मानवी शरीर दिसत होते तिकडे धावतच गेलो. ‌ केवळ जयंत डॉक्टर असल्यामुळेच पुढचं सगळं व्यवस्थितपणे आम्ही करू शकलो. जवळ गेल्यावर पाहिलं तर आमच्या लक्षात आलं की ही एक मुलगी आहे. जयंतने खाली वाकून बघितले तिचे शरीर खूपच वाईट रितीने जखमी झालं होतं. श्वासोश्वास चालू होता त्यावरूनच ती जिवंत आहे एवढं कळत होतं. जयंत धावतच गाडीकडे गेला. फर्स्ट एड बॉक्स आणि गाडीत एक प्लास्टिकचा कपडा होता तो घेऊन आला. आम्ही कसंबसं उचलून तिला त्या कपड्यावर तिला ठेवले. त्यांने जेवढ्या जागी शक्य होतं तेवढ्या जागी मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. नंतर आम्ही दोघांनी मिळून तिला उचलून गाडीत ठेवलं तेव्हा तिचा एक पाय खूपच वाईट जखमी झाला होता, लटकत होता. रक्तस्राव पण खूप झाला होता. मी मागच्या सीटवर बसून तिचं डोकं मांडीवर ठेवून पुढचा प्रवास केला.

इथे साताऱ्यापासून जवळच जयंत आणि त्याचा डॉक्टर मित्र समीर ह्यांचं हॉस्पिटल आहे. जयंतने शक्य तितकी फास्ट गाडी चालवली. आम्ही दोघं तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. जयंत स्वतः धावत जाऊन वाॅर्डबॉय आणि स्ट्रेचर घेऊन आला. नंदिनीला डायरेक्ट ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं. तिचं नशीब थोर म्हणून डॉक्टर समीर पण हॉस्पिटलमध्येच होता. दोघांनी मिळून तिथे सर्व शस्त्रक्रिया करून नंदिनीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. तिला रक्ताची तातडीने आवश्यकता होती. नंदिनीचा आणि माझा रक्तगट एकच होता. मी तिला रक्त दिलं. परंतु ती लगेच शुद्धीवर आली नाही. तिला आय सी यु मध्ये ऍडमिट केलं. दोन प्रशिक्षित स्पेशल नर्सेस तिच्या आय सी यु ला अटेंड करत होत्या. जयंत आणि समीरने प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि नंदिनीचे प्राण वाचवले. नंदिनीला शुद्धीवर यायला सहा दिवस लागले. केवळ तिच्या आयुष्याची दोरी बळकट होती म्हणूनच ती वाचली.

नंदिनी शुद्धीवर आली पण तिला काहीच आठवत नव्हते. शुद्धीवर आल्यानंतर तिला प्रचंड वेदना होत होत्या. मी सुद्धा रोज तिच्याजवळ जाऊन बसत होते. तिच्या चेहऱ्यावरील वेदना पाहून माझ्या पोटात तुटायचे. दीड महिने ती हॉस्पिटलमध्येच होती. जयंत, समीर आणि मी सुद्धा तिला तिची ओळख विचारायचा प्रयत्न केला. मेंदूवर आघात झाल्यामुळे तिला काहीच आठवत नव्हतं. तिला स्वतःच्या पायावर उभे राहता येत नव्हतं. सुरुवातीला तिला व्हीलचेअर वर फिरवावं लागत होतं. तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज द्यायची वेळ आली तेव्हा आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि तिला आमच्या घरी आणलं. दिवसा आणि रात्रीची नर्स ठेवली. हळूहळू तिला सर्व आठवलं होतं.

नंदिनीच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती. ती तीचं नाव पूर्णपणे सांगू शकत होती. परंतु तिने ती कुठे राहायची, तिच्या वडिलांबद्दल सांगायचं टाळलं. नंतर आम्ही तिला समजावून सांगितल्यावर तिने तिचे आई बाबा कुठे राहायचे ते सर्व सांगितलं. त्यावेळी तिने मानस बद्दल काहीच सांगितले नाही. जयंतने स्वतः तिथे जाऊन सगळी चौकशी केली. तिथे दुसरेच लोक रहात होते. त्यांना नंदिनीच्या कुटुंबाबद्दल काहीच माहिती नव्हती. जयंत असाच परत आला.

नंदिनी आता आमच्या घरात थोडंफार रूळू लागली होती. जयंत तिला म्हणाला,

"तुझे कुटुंबीय कुठे स्थलांतरित झाले हे आपल्याला माहिती नाही. आपण वर्तमानपत्रात एक निवेदन देऊया म्हणजे आपल्याला कळेल ते कुठे आहेत."

"नाही इतक्यात नको अजून मला पूर्ण बरं होऊ दे." नंतर नंदिनीशी बोलल्यावर मला कळलं की वर्तमानपत्रात निवेदन दिल्यावर मानस सर्वात आधी इकडे येईल. तिला तिच्या अशा अवस्थेत मानसला भेटायचं नव्हतं. म्हणून तिने थोडा वेळ मागून घेतला.

नंदिनीला आता सगळच आठवत होतं. घरच्यांच्या आठवणीने ती खूप व्याकुळ होत होती. आम्ही सर्व घरात असलो कि ती आमच्याशी व्यवस्थित बोलायची. अर्थात ते सर्व वरवरचं होतं. ती एकटीच असताना खूप दुःखी असायची. एकदा मी तिला विचारलं तू एवढी दुःखी का आहे. तेव्हा तिने मला तिची आणि मानसची प्रेमकहाणी सांगितली. ती सांगताना तिचा चेहरा खूप उजळला होता आणि मला जाणवलं की तिच्या आयुष्यात मानस परत आला तर ती या सर्वातून लवकर बाहेर पडू शकेल. मी तिला खूप समजावलं की तुला जर मानसला खरोखर भेटायचं असेल तर तुला हिम्मत दाखवायला हवी.

हळूहळू मी तिची समजूत काढली आणि तिला थोडं थोडं चालवायला लागले. पण तिच्या पायात अजून हवा तसा जोर आला नव्हता. तिच्या जखमा पूर्ण भरल्यानंतर जयंतने तिच्यासाठी फिजिओथेरपीस्ट अपॉइंट केला.

फिजोथेरपीमुळे तिच्यात खूप बदल दिसायला लागला. तिला आता मानससाठी पूर्णपणे बरं व्हायचं होतं. मानस मध्येच म्हणाला,

"इथे तुम्ही कोण कोण राहता. डॉक्टर जयंत तुमचे कोण आहेत?"

"जयंत, मी आणि माझी आई आणि आता नंदिनी असे आम्ही चौघेजण राहतो. जयंत माझा लहान भाऊ आहे. माझी कहाणी खूपच दुःखदायक आहे. माझा नवरा दारू पिऊन मला मारहाण करायचा. चांगला शिकला सवरलेला माणूस होता तो. दारूमध्ये त्याने त्याचं सर्वच उधळून टाकलं. म्हणून मी घटस्फोट घेऊन इकडे आले. जयंत माझा लहान भाऊ असला तरी त्याने माझी मोठ्या भावासारखी जबाबदारी स्वीकारली. माझी आई आता देवळात गेली आहे येईल एवढ्यात. जयंत सुद्धा एका मित्राच्या घरी गेलाय तो पण येईल." मानस नंदिनीला म्हणाला,

"तुला माझं लग्न झालं हे आता कळलं. पण तुझ्याबद्दल मला आधीच कळलं असतं तर नंदिनी मी तुला आहे तसं नक्कीच स्वीकारलं असतं. माझ्या प्रेमावर संशय घेतलास. तुझा माझ्यावर विश्वास नव्हता का."

"नाही तसं नाही माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि तू मला तसंच स्वीकारशील याची सुद्धा खात्री होती पण मला तुझ्या आयुष्यात असं अपंग म्हणून यायचं नव्हतं म्हणून मी ते टाळलं."

"पण तू कमीत कमी तुझ्या आई बाबांचा तरी शोध घ्यायला हवा होता. अगं तुझ्या आई-बाबांना किती दुःख झाले असेल ह्याची तुला कल्पना नाही. तू नेहमी मला सांगायचीस की तू आई-बाबांची खूप लाडकी मुलगी आहे. तुझ्या अपघातानंतर ते इतके खचून गेले की त्याने हे शहरच सोडून दुसऱ्या ठिकाणी बदली करून घेतली ते सुद्धा आमच्या सर्वांच्या नकळत. आम्हाला त्याबद्दल काहीच माहित नाही."

"हो ते मला सुद्धा माहिती आहे म्हणून मला एक नक्कीच माहिती होतं की बाबा जरी कुठेही गेले तरी त्यांचा गोडबोले म्हणून एक खूप जिवलग मित्र आहे त्यांना त्यांच्याबद्दल नक्कीच माहिती असेल म्हणून मी जयंतना गोडबोले काकांचा पत्ता दिला. त्यांनी आम्हाला आई-बाबा कुठे असतील ते सांगितलं."

(नंदिनीचे आई बाबा तिला भेटल्यावर तिच्या भावविश्वात किती आनंद निर्माण झाला असेल पाहूया पुढील भागात)