Login

तिची तपश्चर्या - भाग ५०

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी

तिची तपश्चर्या - भाग ५०

नंदिनीने जयंतला बाबांच्या मित्राचा म्हणजेच गोडबोले काकांचा पत्ता दिला.पाहू पुढे...

जयंत नंदिनीने गोडबोले काकांचा पत्ता दिला होता तिथे गेला. जयंतने बेल वाजवल्यावर गोडबोले काकांनीच दार उघडलं. दारात अनोळखी व्यक्ती पाहून त्यांनी विचारलं,

"कोण हवंय तुम्हाला?"

जयंतने स्वतःची ओळख देऊन त्यांना नंदिनी बद्दल सांगितलं. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आणि अतिशय आनंद झाला. त्यांनी जयंतला घरात घेऊन नंदिनी बद्दल सर्व माहिती विचारली. जयंत ने नंदिनीच्या आई-बाबांचा पत्ता विचारला.

"हो नंदिनीचे आई-बाबा गेले तेव्हा खरं तर त्यांनी मलाही काही सांगितलं नाही. दुःखावेगाने ते अचानकच हे घर सोडून गेले. त्यांनी स्वतःची बदली दुसऱ्या ठिकाणी करून घेतली एवढेच मलाही माहिती होतं. नंतर एक दिवस अचानक तिच्या बाबांचं मला पत्र आलं. त्यात त्यांनी माझी माफी मागून नंदिनीच्या वियोगाचं दुःख सहन न झाल्यामुळे ते इथून निघून गेले असं सांगितलं. त्या पत्रात त्यांनी मला नवीन पत्ता कळवला होता.

त्यांचा पत्ता कळताच मी लगेच दोन दिवसांनी त्यांना मुंबईला भेटायला गेलो. त्यांचे सांत्वन केलं. तेव्हा मी त्यांना असे सांगितलं की पाचवा मृत मृतदेह मिळाला नाही कदाचित ती नंदिनीच असेल आणि ती कुठेतरी या जगात जिवंत असेल. मी असं बोलताच क्षणभर त्यांचे डोळे लकाकले. परंतु ते नंतर निराश झाले."

इतक्यात आतून काकू चहा घेऊन आल्या आणि जयंतला चहा दिला. चहा पिऊन झाल्यावर काकांनी जयंतला नंदिनीच्या आई-बाबांचा पत्ता दिला.

"जयंत आज तुमच्यामुळेच आमची नंदिनी जिवंत आहे. तुमचे उपकार आम्ही कोणीच कधीच विसरू शकणार नाही. बरं आता तुम्ही नंदिनीच्या आई-बाबांना आधी तिला भेटवा आणि नंतर मी सुद्धा साताऱ्याला येऊन नंदिनीला भेटेनच."

जयंत तिथून तडक मुंबईला आला. त्याने नंदिनीच्या आई-बाबांचा पत्ता शोधून काढला. आता आपण जे सांगू त्यानंतर तिचे आई-बाबा कसे रिऍक्ट होतील काय माहित. त्याने बेल वाजवल्यावर नंदिनीच्या बाबांनीच दार उघडलं.

"नमस्कार मी डॉक्टर जयंत कुलकर्णी. तुम्ही नंदिनीचे बाबा का?"

"नंदिनी! तुम्ही नंदिनीला ओळखत होतात का. पण तुम्हाला सांगायला अतिशय दुःख होतं कि ती आता या जगात नाहीये."

"काका मी तुम्हाला नंदिनी बद्दल एक आनंदाची बातमी सांगायला आलोय."

"आनंदाची बातमी! या ना तुम्ही घरात या. या बसा. अगं जरा पाणी घेऊन ये गं बाहेर."

नंदिनीची आई पाणी घेऊन बाहेर आली. बाबांनी त्यांना पण बसायला सांगितले आणि म्हणाले,

"अग हे आपल्याला नंदिनीच्या बाबतीत काहीतरी आनंदाची बातमी सांगायला आले आहेत."

इतकं ऐकूनच दोघांच्या चेहऱ्यावर हरवले ते सापडल्याचा आनंद ओसंडून वाहू लागला.नंतर जयंतने नंदिनी जिवंत असल्याचं ‌सांगितल्यावर दोघांनाही अस्मान ठेंगणं असल्याचं वाटू लागलं. जयंतने नंदिनी त्यांना कशी भेटली ते सर्व सांगितले. आम्हाला आत्ताच्या आत्ता नंदिनी कडे घेऊन चला असा त्यांनी हट्ट धरला. त्यांची अवस्था समजत होती. ते सर्व लगेचच साताऱ्याला जयंतच्या घरी आले. नंदिनीला शक्य असतं तर तिने धावतच येऊन आई-बाबांना मिठी मारली असती. परंतु पायामुळे हळूहळू लंगडत ती जवळ आली. त्या तिघांची हृद्य भेट पाहून सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

"नंदिनी मला वाटलंच नव्हतं की मी तुला पुन्हा कधी पाहू शकेन. तुझ्या मृत्यूची भयंकर बातमी ऐकून आम्हा दोघांनाही तिथे राहणं शक्यच नव्हतं. त्या घराच्या कोपऱ्या-कोपऱ्यात तुझ्या आठवणी साठलेल्या आहेत."

"बाबा आधी काही महिने तर मला काही आठवत नव्हते. शुद्ध आल्या नंतर मला प्रचंड वेदनांशिवाय काहीच कळत नव्हतं, जाणवत नव्हतं. नंतर मला आठवू लागलं पण माझी अवस्था खूपच कठीण होती. मला तुम्ही तसं बघितलं असतं तर तुम्हाला ते सहनच झालं नसतं. म्हणूनच मी माझ्याबद्दल कोणालाच काही सांगितलं नाही."

"अगं तू कशीही असली असतीस तरी आम्हाला, तू आहेस ही एक भावनाच जगण्यासाठी खूप मोठं कारण ठरलं असतं. ‌ भावनाचं लग्न झालं आणि महेश सुद्धा परदेशात गेला. त्यानंतर आम्हाला खूपच एकाकीपणा आला. आता तर निवृत्तीनंतर घर खायला वाटतं."

"बाबा आता मी आहे ना. आता तुम्ही अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. तुम्ही आणि आई आता दोघेही मुंबई सोडून इथेच साताऱ्याला राहायला या. इकडचं वातावरण तुम्हाला खूपच आवडेल."

"अगं मला माहितीये डॉक्टर जयंत आणि कुटुंबीयांचे तुझ्यावर खूप उपकार झाले आहेत. आज केवळ आणि केवळ त्यांच्यामुळेच आम्ही तुला पाहू शकलो. परंतु आता आपली भेट झाली आहे. तिथे आमच्या बरोबर मुंबईला चल ना."

इतक्यात जयंतच्या आई आतून बाहेर आल्या.‌ त्यांनी नंदिनीच्या बाबांचं शेवटचा वाक्य ऐकलं आणि त्यावरून ओळखलं की हे दोघं नंदिनीचे आई-बाबा आहेत. बाहेर येतायेता त्या म्हणाल्या,

"तुम्ही नंदिनीचे आई-बाबा आहात ना. कधी आलात? बसा ना. भेटलात ना नंदिनीला. आता नंदिनी आमचीच आहे. नंदिनीने आम्हाला खूप लळा लावला आहे. माझ्या चित्रासारखीच नंदिनी मला आहे. मी तीला आता कुठेच पाठवणार नाही. ती म्हणते त्याप्रमाणे तुम्ही खरंच या साताऱ्याला. इथल्या वातावरणात तुम्हाला खूप सकारात्मक बदल जाणवेल. नंदिनी पण इथे आहेच."

नंदिनीचे बाबा जयंतच्या आईला म्हणाले,

"आम्ही दोघे विचार करतो आणि तुम्हाला कळवतो. खरंतर आता नंदिनी जिथे आहे तिथेच राहायला आम्हाला नक्कीच आवडेल. तिथला सगळा पसारा आवरल्यानंतरच इथे यावं लागेल."

नंदिनीचे आई-बाबा नंदिनीला भेटून निघून गेले. त्यानंतर खरोखर काही दिवसातच ते साताऱ्याला राहायला आले. जयंतच्या घरापासून त्यांचं घर जवळच होतं. त्यामुळे ते अधनामधना येऊन नंदिनीला भेटून जात होते. कधीतरी नंदिनी आणि चित्रा त्यांच्या घरी जात होत्या. असेच दिवस जात होते. हळूहळू ‌जयंत आणि नंदिनी मध्ये खूप चांगली मैत्री झाली होती.

(चित्राताई असं बोलल्यावर नंदिनीच्या डोळ्यासमोरून जयंतबरोबर असतानाचे काही प्रसंग तरळून गेले. नंदिनी आणि जयंत मध्ये कोणतं नातं असेल पाहूया पुढील भागात )