तिची तपश्चर्या - भाग ५१
नंदिनी आणि जयंतमध्ये मैत्री बरोबर एक हळुवार नातं निर्माण होत होतं. पाहूया पुढे ..
नंदिनी सुरुवातीला जयंतकडे फक्त एक तिला ट्रीट करणारे डॉक्टर म्हणूनच पाहत होती पण नंतर नंतर नंदिनीच्या लक्षात येऊ लागलं होतं की जयंतला मैत्री बरोबर आपल्याबद्दल काहीतरी वाटतंय. हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिल्यावर नंदिनीला जयंतच्या घरी आणलं होतं. दोन प्रशिक्षित नर्सेस तिच्यासाठी ठेवल्या होत्या तरीसुद्धा जेव्हाही वेळ मिळेल जयंत जातीने तिची चौकशी करत होता. तिच्या जखमा अजून पूर्णपणे भरल्या नव्हत्या तेव्हा ड्रेसिंगसाठी तो स्वतः येत होता आणि अगदी हळुवारपणे काळजीपूर्वक ड्रेसिंग करायचा आणि कधीही नंदिनीच्या तोंडातून '' आवाज आला की तो तिला हळुवारपणे विचारायचा,
"खूप दुखलं का सॉरी हं"
तो तिच्या रूम मध्ये आला की तिच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न करायचा तिला बोलत करायचा. एकदा असंच चित्रा ताईंनी नंदिनीचे केस धुवून दिले होते आणि नंदिनी खिडकीतून ऊन येत होतं तिथे बसून ती ते सुकवत होती. इतक्यात जयंत आतमध्ये आला. मोकळे सोडलेल्या केसांमध्ये नंदिनी खूपच देखणी दिसत होती. तो तिच्याकडे एकटक पाहत होता इतक्यात नंदिनीची नजर त्याच्याकडे गेल्यावर त्याने हळूच नजर फिरवली. नंदिनीला त्याच्या वागण्यातील बदल लक्षात येत होता..
जयंत खूप चांगला डॉक्टर होता त्याबरोबरच तो एक खूप चांगला माणूस होता.
जयंत खूप चांगला डॉक्टर होता त्याबरोबरच तो एक खूप चांगला माणूस होता.
अशावेळी नंदिनीला मानस ची आठवण यायची. मानस कधी आपल्या आयुष्यात येईल का. जयंतच्या मनातील भावना नंदिनी ओळखू लागली होती. जयंतला पण त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या होत्या. पण त्याला वाटायचं आपण नंदिनीला विचारलं आणि आपण तिचा जीव वाचवलाय या भावनेने तिने आपल्याला होकार दिला तर ते आपल्याला नकोय. तिला सुद्धा आपल्याबद्दल प्रेम वाटायला हवं. घाई करण्यात काहीच अर्थ नव्हता. आता नंदिनीची व्हीलचेअर गेली होती आणि ती काठी घेऊन घरभर फिरू शकत होती. कधी कधी ती बाहेर व्हरांड्यात जाऊन बाहेर बघत बसायची. पायऱ्या उतरताना तिला कोणाची तरी मदत घ्यावी लागत होती.
चित्राताई आणि जयंतच्या आईला नंदिनी आणि जयंत एकत्र यावे त्यांचं लग्न व्हावं असं वाटत होतं. परंतु चित्राताईंना माहिती होतं की नंदिनी मानस मध्ये गुंतली आहे ती इतक्यात सर्व या गोष्टीला तयार होणार नाही. आता नंदिनी त्या सर्वांबरोबर बाहेर जाऊ शकत होती. एक दिवस जयंतने रविवारी सर्वांची सिनेमाची टिकिट्स काढली. तेव्हा मुद्दामहून चित्राताई आणि जयंतच्या आईने नंदीनी आणि जयंतला बाजूबाजूला बसण्याची संधी दिली. तेव्हा नंदिनीचा होणाऱ्या ओझरत्या स्पर्शाने जयंत मोहरून जात होता. नंदिनी मात्र गडबडून जात होती.
एक दिवस चित्राताईंनी जयंतला विचारले,
"तुला नंदिनी आवडते ना मला माहितीये. तू तिला लग्नाचा विचार बघ ती काय सांगते. नंदिनी कितपत तयार होईल माहित नाही कारण तिचं मानस नावाच्या एका मुलावर प्रेम होतं आणि अजूनही आहे."
"ताई अजून थोडा वेळ जाऊ दे मी तिला योग्य वेळ आल्यावर विचारणार आहेच."
असंच एक दिवस जयंतची आई आणि चित्राताई देवळात गेल्या होत्या तेव्हा नंदिनी आणि जयंत दोघच घरात होते. नंदिनी स्वतःच्या रूम मध्ये बसली होती तितक्यात जयंत तिथे आला आणि तिला म्हणाला,
"अग अशी एकटीच इथे रूम मध्ये का बसलीयेस. चल आपण थोडा वेळ लॉन मध्ये बसूया तुला जरा मोकळी हवा मिळेल."
"हो मला सुद्धा रूम मध्ये बसून बसून कंटाळा येतो." जयंतने पायऱ्या उतरताना तिला हात दिला. त्याच्या मनात आलं हिचा हात असाच कायम आपल्या हातात राहावा तर मग आपलं आयुष्य खरंच खूप सुखाने जाईल. नंदिनीचा स्वभाव त्याला खूप आवडला होता. नंदीनीला वाटत होतं की आपण असं पायाने लंगडतोय आणि आपण मानस किंवा जयंत च्या आयुष्यात का बरं गोंधळ घालावा. दोघेजण येऊन लॉन मध्ये टेबल खुर्ची टाकले होते तिथे बसले. जयंतने आत मधून येतानाच दोन कॉफी मावशीना सांगितल्या होत्या. मावशी त्या घेऊन आल्या.
"घे नंदिनी तुला आवडते तशी कॉफी बनवायला मावशीना सांगितली होती."
कॉफी पिता पिता जयंत ने हळूच नंदिनीला विचारले,
"नंदिनी तू पुढील आयुष्याचा काही विचार केला आहेस का? मला तू खूप आवडतेस तू माझ्याशी लग्न करशील का".
अचानकच असा प्रश्न आलेला पाहून नंदिनीला काय बोलावं काही सुचेना. ती गप्प राहिलेली पाहून जयंत तिला म्हणाला,
"हे बघ नंदिनी मला माहिती आहे तुझं मानस वर प्रेम आहे. पण आता तो तुझ्या आयुष्यात पुन्हा येणं शक्य नाहीये. आणि तू पूर्ण विचार करून उत्तर दे. मला कसलीही घाई नाही मी वाट बघायला तयार आहे. पण तू अशीच एकटी किती दिवस राहशील."
"जयंत तुम्हाला तर माहिती आहे माझी कहाणी. मला या सर्वातून बाहेर यायला अजून थोडा वेळ लागेल. तुम्ही मला वेळ द्या."
"हो नंदिनी आणि मुख्य म्हणजे तुझ्या मनात सारखे विचार येतात की माझ्यामुळेच तुला जीवनदान लाभलं आहे तर ते विचार बाजूला ठेवून एक व्यक्ती किंवा एक मित्र म्हणून मी तुला कसा वाटतो त्याप्रमाणे तू विचार करून मला उत्तर दे."
"जयंत आणि तुम्ही सुद्धा माझ्याबद्दल सहानुभूतीने विचार करत नाही ना. आता हिच्यावर अशी वेळ आली आहे तर आपण तिला आधार द्यावा म्हणून तुम्ही माझ्याशी लग्नाला तयार होत नाही ना."
"तू वेडी आहेस का नंदिनी माझं खरोखर तुझ्यावर खूप प्रेम आहे. इतक्या महिन्यांमध्ये मी तुला खूप जवळून बघितलं आहे आणि तुझा स्वभाव सुद्धा मला कळला आहे. केवळ नशिबामुळे तुझ्यावर ही वेळ आली आहे पण म्हणून मला तुझ्याबद्दल सहानुभूती नाही तर खरं खरं प्रेम वाटतंय."
नंदिनी द्वीधा मनस्थितीत सापडली होती. काय करावं तिला काही सुचत नव्हतं. यदा कदाचित मानस जर आपल्या आयुष्यात आला तर पुन्हा मागे फिरता येणार नाही म्हणून तिने जयंत कडून थोडा वेळ मागून घेतला होता.
(नंदिनी जयंतच्या प्रस्तावाचा विचार करेल का पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा