Login

तिची तपश्चर्या - भाग ५२

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी
तिची तपश्चर्या - भाग ५२

जयंतने नंदिनीला लग्नाबद्दल विचारले आहे ती काय उत्तर देईल पाहूया पुढे..

नंदिनीने वेळ मागून घेतला खरा परंतु तिला जयंतला दुखवावे असेही वाटत नव्हतं आणि लगेच होकार द्यावा असेही वाटत नव्हतं. चित्राताई नंदिनीला वारंवार समजावून सांगत होती अगं आता तुझ्या आयुष्यात मानस येणार नाही.  जयंतबरोबर लग्न करून तू खरोखर सुखी होशील.  चित्राताईला नंदिनी आणि जयंतचा सुखी संसार बघायचा होता. तिच्या आयुष्याची तर वाताहात झालीच होती परंतु आपल्या भावाचा संसार तरी सुखाने व्हावा यासाठी ती मनोमन देवाची प्रार्थना करत होती.

जयंत जरी म्हणाला असला की नंदिनी तू सावकाश उत्तर दे तरी त्याच्या मनात एक प्रकारची धाकधूक होती.  त्याला सुद्धा वाटत होतं की नंदिनीने आपल्या आयुष्यात यावे.  जयंतच्या प्रश्नामुळे नंदिनीच्या मनावर ताण आला होता आणि तो तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.  जयंतला वाटले की नंदिनीला थोडा हवापालट झाला तर तिला थोडं ताजतवानं वाटेल. जयंतचा एक मित्र काश्मीरला राहत होता.  त्यांचे अगदी खूप घरोब्याचे संबंध होते.  त्याची फॅमिली आणि जयंतीची फॅमिली एक दुसऱ्याच्या घरी जाऊन अधून मधून रहात होते.  त्याने विचार केला हवा बदलण्यासाठी काश्मीर पेक्षा योग्य ठिकाण दुसरे कोणतेही नाही.  म्हणून एक दिवस रात्री जेवताना तो आई आणि चित्रा ताईला म्हणाला,

"नंदिनी आता तू तशी पूर्ण बरी झाली आहेस.  फक्त तुलां पायामुळे थोडसं लंगडावं लागतं पण ते आता कायमसाठी असेलच.  मला वाटते की तू आता एका जागी राहून कंटाळली असशील. तुला थोडा बदल हवा म्हणून तू आणि चित्रा दोघीजणी कुठेतरी एक आठवडाभरासाठी जाऊन ये."

"अरे जयंत पण आम्ही दोघी अशा कुठे जाणार आणि कुठे फिरणार.  हॉटेलमध्ये राहायचं म्हटलं तरी प्रत्येक वेळी जेवणासाठी वगैरे त्यांच्यावर अवलंबून राहावं लागेल."

"अग ताई मी तुम्हाला हॉटेलमध्ये राहा असं म्हणतच नाही. माझा मित्र नरेंद्र त्याच्याकडे तुम्ही काश्मीरला जाऊन काही दिवस राहा.  नरेंद्रच घर पण मोठे आहे आणि तू तर सर्वांना ओळखतेसच.  तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा परकेपणा वाटणार नाही.  तुम्हाला फिरण्यासाठी तो गाडी देईलच शिवाय त्याची बहीण ती सुद्धा तुमच्या बरोबर फिरायला येईल. ती तुम्हाला काश्मीरमधील सर्व ठिकाण दाखवू शकते."

"जयंत अगदी माझ्या मनातलाच बोललास. मला सुद्धा नरेंद्रचा चेहरा लगेच डोळ्यासमोर आला. ठीक आहे तू आमचा रिझर्वेशन वगैरे करून दे मी आणि नंदिनी दोघी जाऊन येऊ."

नंदिनी आणि चित्राताई दोघी फ्लाईटने काश्मीरला आल्या.  श्रीनगर एअरपोर्टवर त्यांना घ्यायला नरेंद्र गाडी घेऊन आला होता. चित्रा ताईला बघून नरेंद्रला खूपच आनंद झाला.  नरेंद्रला नंदिनीची कहाणी कळली होती. त्यामुळे त्यांने लगेचच ओळखलं की ही नंदिनी आहे.

"नंदिनीजी तुमचं स्वागत आहे. तुम्ही इथे अगदी आपलं घर समजूनच राहायचं. अजिबात परकेपणा मानायचा नाही.  जशी माझ्यासाठी पूनम आहे तशाच तुम्हीसुद्धा माझ्यासाठी आहात."

नरेंद्रच्या बहिणीचे नाव पुनम होतं.  गेल्या त्या दिवशी त्यांनी आराम केला नंतर तिघीजणीनी एक आठवडाभर छान मस्त काश्मीर फिरून घेतलं.  जयंत म्हणाला त्याप्रमाणे नंदिनीला खरोखरच खूप ताजतवाने वाटलं.  आठ दिवसानंतर दोघी घरी यायला निघाल्या तेव्हा नरेंद्रच्या आईने नंदिनीला, चित्राला काश्मीर सिल्क साडी आणि एक सुंदर पर्स दिली. त्या दोघींना सोडायला नरेंद्र एअरपोर्टवर आला होता.  आठ दिवसात नाती अजून घट्ट झाली होती.

खूप दिवसांनी मोकळ्या वातावरणात फिरल्यामुळे नंदिनी पण जरा उत्साहीत झाली होती.  नंतर त्या एअरपोर्टवर आल्यावर नंदिनीने अचानकच मानसला पाहिलं.  क्षणभर तिला असं वाटलं पंख असते तर उडत जाऊनच मानसला भेटलो असतो पण इतक्यात तिने मानस बरोबर उमाला पाहिलं आणि उमाच्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं त्यावरून तिने ओळखलं की ह्या दोघांचं लग्न झालंय म्हणून तिने मानसला ओळख दाखवली नाही.  मानसला ओळख दाखवली नसली तरी तिच्या मनात एक अनामीक हुरहुर होतीच.  तिने वरकरणी ती शांत असल्याचे दाखवलं.  नंतर चित्राताई कडे येऊन तिने मानसला पाहिल्याचं आणि त्याच्या बरोबर त्याची बायको पण आहे असं सांगितलं.  का कोण जाणे पण एका अर्थी चित्राताईला खूप आनंद झाला म्हणजे आता जयंत आणि नंदिनीचे लग्न अडथळ्याशिवाय होऊ शकेल याची तिला खात्री पटली. असं असलं तरी नंदिनीला नाराज पाहून तिला सुद्धा वाईटच वाटलं.

मानसने नंदिनीला ओळखलं होतं आणि किती आशेने तो नंदिनी जवळ आला होता.  त्याने नंदिनीला तू नंदिनी ना असं विचारल्यावर नंदिनी खोट्या कठोरपणे त्याला मी नंदिनी नाही असं सांगितलं.  असं सांगताना तिने तिच्या मनावर दगड ठेवला होता.  नंदिनीला तिचे कॉलेजमधले दिवस आठवले होते.  सर्व मित्र-मैत्रिणींच्या नजरा चोरून त्या दोघांचं प्रेम कसं बहरत होतं ते तिला आठवलं.  त्यांच्या त्या टेकडीवरच्या भेटी आठवल्या.  तिच्या मनात आलं हे देवाने नेमकं माझ्या बाबतीतच असं का घडवून आणले.  आज मी आणि मानस सुखाने संसार करत असतो.  नंदिनीला एकदा वाटलं होतं की मानसला ओळख द्यावी.  आपल्यासाठी कदाचित त्याने त्याच्या बायकोला घटस्फोट पण दिला असता.  पण मनात असा विचार येताच तिला वाटलं आपण किती स्वार्थी आहोत.  आपल्या स्वार्थासाठी आपण एखाद्या निरपराध व्यक्तीचं आयुष्य पणाला लावायचं?

नंतर घरी आल्यावर चित्राताईंनी तिला उमा तिच्याशी जे बोलली ते सांगितलं.  मानसने उमाशी लग्न केलं असलं तरी अजून त्याने तिला पत्नीचा दर्जा दिला नाही.  हे कळल्यावर नंदिनीच्या मनात पुन्हा आशा जागृत झाली. कदाचित मानसला पण वाटत असावं की आपण कुठेतरी या जगात त्याला भेटू.  शेवटी काय माणूस आशेवरच जगत असतो.  चित्राताई नंदिनीला म्हणाली,

"अगं एक ना एक दिवस मानस इथे येऊन पोहोचणार एवढं लक्षात ठेव.  तेव्हा त्याच्याशी काय बोलायचं ते तू ठरवून ठेव.  आता तुला जयंत आणि मानस यांच्यातून एकाला निवडावं लागेल.  पूर्ण विचार करून तू निर्णय घेशील याची मला खात्री आहे."

नंतर काही दिवस नंदिनी या विचारांच्या आवर्तनातच अडकली होती.  ती कधी जयंतला आपला जोडीदार म्हणून पाहत होती तर कधी ती मानसला पुन्हा आपल्या आयुष्यात जोडीदार म्हणून बघण्याची स्वप्न बघत होती. तिची परिस्थिती कात्रीत सापडल्यासारखी झाली होती.

(जयंती की मानस नंदिनी आता काय निर्णय घेईल पाहूया पुढील भागात. कृपया कथेचे उर्वरित भाग नक्कीच वाचत राहा आणि प्रतिक्रिया देत रहा)