Login

तिची तपश्चर्या भाग ५५

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी
तिची तपश्चर्या - भाग ५५

महाबळेश्वर ट्रिप ची उत्सुकता उमाच्या मनात आहे पाहूया पुढे..

रात्री आठ वाजता मानस आणि उमा एका हॉटेलमध्ये आले.  उमाला तर त्या हॉटेलचं नाव खूपच आवडलं आणि तिला वाटलं हे हॉटेल आपल्याला आपल्या पुढील आयुष्याचा संकेत देत आहे.  हॉटेलचं नाव होतं 'सुखाचे क्षण'.  मानस सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करेपर्यंत उमा नेहमीप्रमाणे स्वप्नरंजनात रंगून गेली.  मानसने तीन दिवसासाठी हॉटेल बुक केलं होतं.  आता तीन दिवस फक्त मी आणि मानस. मानसचा सहवास आपल्याला पूर्ण वेळ लाभेल या कल्पनेनेच ती खूप उत्साही झाली होती.  हॉटेलची सजावट खूप कलात्मक रीतीने केली होती.  रंगसंगती तर डोळ्यांचे पारणे फेडत होती.  सकाळी उठल्यापासून मानस आपल्या सोबत असेल या कल्पनेने उमा खरोखर सुखाचे क्षण अनुभवत होती.

तिला अशी हरवलेली पाहून मानस म्हणाला,

"अग उमा दमलीस का चल रूममध्ये जाऊया.  थोड्या वेळाने डिनर साठी खाली येऊ."

त्यांचे सामान घेऊन वेटर पुढे गेला आणि हे दोघे त्याच्या मागून गेले.  रूममध्ये तीन-चार सुंदर पेंटिंग लावली होती.  एका पेंटिंग मध्ये एक तरुणी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जात होती असं चित्र होत.  तिच्या चेहऱ्यावरील भाव एखाद्या अभीसारीके सारखे दिसत होते. तिचे केस मोकळे होते. चेहऱ्यावर चुकार बटा रुळत होत्या आणि तिने तिचे हात पसरलेले होते.  उमाने कल्पना केली की मानस आपल्याला बोलावतोय आणि आपण आपले बाहू पसरून त्याच्याकडे वाऱ्याच्या वेगाने जात आहोत.

"अग उमा चल फ्रेश होऊन घे.  आता तीन दिवस तू पण इथेच आहेस. चित्र पण इथेच आहेत तेव्हा त्यांचं निरीक्षण कर." असं बोलून मानस गालातल्या गालात हसायला लागला.

"अहो आत्ताशी तर मी एकच चित्र बघत होते. अजून ही तीन चित्र बघायची आहेत. प्रत्येक चित्रात किती वेगवेगळे भाव आहेत.  चित्रकाराने किती आकर्षक रंगसंगती वापरली आहे." नंतर तिने चित्राच्या अगदी जवळ जाऊन पाहिले तर खाली चित्रकाराचे नाव होते मानस.  ती हसायलाच लागली.

"पाहिलं का हा चित्रकार दुसरा तिसरा कोणी नसून मानसच आहे."

"अरे हो खरंच की. काश मी पण असाच छान चित्रकार असतो तर नक्कीच तुझं खूप सुंदर चित्र काढलं असतं. " उमा हसायलाच लागली. तिला 'मानसीचा चित्रकार तो' हे गाणं लगेच आठवलं आणि त्याने नंदिनीचे स्केच काढलेले पण आठवलं. कधीतरी आपलं पण चित्र तो नक्कीच काढेल याची उमाला शाश्वती होती.

"बरं चल आवरून घे आपण जेवायला खाली जाऊ."

उमा विचार करत होती की मानस खरोखर नॉर्मल आहे की तो वरवर दाखवतोय.  नंदिनी जयंतशी लग्न करणार हे कळल्यावर तो दुखावला नक्कीच गेला असेल.  दोघांनी मिळून एकत्र स्वप्न पाहिली होती त्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.  कोणालाही वाईट वाटणारच.  आपण तर साधी एखादी कादंबरी वाचताना किंवा सिनेमा पाहताना अशी एखादी घटना घडली तरी आपण त्यात गुंतून जाऊन आपल्या डोळ्यात अश्रू येतातच की.  हे तर दोघं आपल्यासमोर आहेत.  त्यांचे एकमेकांवर किती  निस्सीम प्रेम होतं ते आपण जाणतोच.

सुंदर आणि गरमागरम जेवणाचा दोघांनीही आस्वाद घेतला.  नंतर मानसने दोघांसाठी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम मागवलं.  उमाला तर स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आवडतच पण इथे येऊन इतर कोणतं आईस्क्रीम खाण्यापेक्षा स्ट्रॉबेरी आईस्क्रीमच खावं म्हणून त्याच्यासाठी पण त्याने स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घेतले.  आज स्ट्रॉबेरी आईस्क्रीम मध्ये नुसता फ्लेवर नव्हता तर स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे पिसेस सुद्धा दिसत होते.  उमाने तिचा काचेचा बाउल एकदम फस्त केला.

"उमा तुला अजून एखादे आईस्क्रीम घ्यायचं असेल तर घे. खूपच सुंदर आणि ओरिजनल आईस्क्रीम आहे.  आता उद्या आपण महाबळेश्वर फिरायला जाऊ तेव्हा स्ट्रॉबेरीच्या बागेत सुद्धा जाऊ.  तिथे मनसोक्त स्ट्रॉबेरी खा. इथलं क्रिमी स्ट्रॉबेरी मिल्कशेक तर तुला खूपच आवडेल."

"तुम्ही तर मला लहान मुलासारखं किती आमिष दाखवता.  माझ्या तोंडाला पाणी सुटले ना.  उद्यापर्यंत धीर धरवेल ना मला नाहीतर स्वप्नातच यायचा क्रिमी स्ट्रॉबेरी मिल्कशेक"

"स्वप्न पडलं तर स्वप्नात पण घे आणि आपण आता उद्या प्रत्यक्ष घेऊया."

दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावरच ते बाहेर पडले.  महाबळेश्वरचे बरेचसे पॉईंट्स संध्याकाळी बघण्यासारखे होते.  सर्वात आधी ते ऐतिहासिक प्रतापगडावर गेले.  शिवाजी महाराजांच्या प्रति
आदरभावनेने ते नतमस्तक झाले.  नंतर मॅप्रो गार्डन मध्ये गेले.  तिथे स्ट्रॉबेरीचे मळे पाहून उमा हरखूनच गेली.  तिथे क्रिमी स्ट्रॉबेरी मिल्कशेक बघूनच उमाला खूप आनंद झाला.  तो इतका सुंदर दिसता होता की उमाला वाटत होतं त्याला नुसतं पहातच बसावं. शेवटी मानस तिला म्हणाला,

"अगं बाई आता याचा आस्वाद घे नाहीतर आईस्क्रीम सगळं विरघळून जाईल.  किती वेळ त्याला बघत बसणार."

नंतर तिथे मिळणारे फलेरो चॉकलेट्स आणि इतर प्रॉडक्ट काय घेऊ आणि किती घेऊ असं उमाला झालं होतं.  तिची ती बालिश घाई बघून मानसला गालतल्या गालात हसू येत होतं.  घरी नेण्यासाठी, आई, शीलाताईकडे सगळ्यांकडे
देण्यासाठी तिने बरेच सामान खरेदी केले. 

"आता आपल्याकडे गाडी आहे म्हणून बरं नाहीतर मला ही एवढी सगळी हमाली करावी लागली असती."

"काहीतरीच काय बोलता गाडी नसती तर मी एवढं सगळं घेतलंच नसतं.  आम्ही बायका सगळा सारासार विचार करून खरेदी करत असतो."

नंतर संध्याकाळी बाजारात फिरताना महाबळेश्वरची स्पेशल लेदरची एक पर्स उमाला खूप आवडली.  बराच वेळ उमा ती पर्स हातात घेऊन मागूनपुढून तिला निरखून बघत होती.  मानसच्या ते लक्षात आलं. 

"उमा तुला पर्स आवडली आहे ना मग घे ना.  सुंदर आहे पर्स.  घरासाठी, इतर सर्वांसाठी वस्तू घेताना तू किती पटापट सगळं घेतलं आणि स्वतःसाठी एक पर्स घ्यायची तर इतका विचार का करतेस."

"माझ्याकडे आहे ना पण.  सध्या मी ही वापरते. ती खराब झाली की मग बघू."

"उगाच मन मारू नकोस. पर्स घे.  ही माझ्याकडून तुला भेट."

मानस असं बोलल्यावर उमाला खूपच आनंद झाला.  ही पर्स ती प्राणपणाने जपणार होती कारण मानसने तिला भेट म्हणून दिलेली सर्वात पहिली भेटवस्तू होती.  अशाप्रकारे तीन दिवसातच पूर्ण महाबळेश्वर पालथे घालून झाले.  उमाला महाबळेश्वर खूपच आवडलं.  सगळे पॉईंट्स बघितले.  घोड्यावर बसायचा अनुभव सुद्धा घेतला.  घोड्यावर बसताना मानसने तिला मदत केली होती.  तेव्हाचा त्याचा तो स्पर्श ती कधीच विसरू शकणार नव्हती.  त्यावेळी तिच्या मनात आलं अशा तऱ्हेने घोड्यावर बसण्यासाठी तरी अजून दोन-तीन दिवस राहावं का.  नंतर तिचं तिलाच हसू आले.

रात्री झोपताना मानस तिला म्हणाला,

"काय मग तुला आवडलं ना महाबळेश्वर. आता सर्व बघून झालं आहे. उद्या आपण निघूया का घरी जायला."

"हो जाऊया.  तुम्हाला पण फॅक्टरीत काम असेल.  मी काय घरीच असते.  ठीक आहे आपण निघूया उद्या."

"तू झोप आता मी खाली जाऊन बिल पेमेंट करून येतो सकाळी गडबड नको."

मानस खाली गेल्यावर उमा आधी सुरुवातीला बेडवर झोपली.  मानस घरी नसताना दुपारच्या वेळी ती कधीकधी बेडवर झोपायची.  त्यामुळे आता तिला मऊ गादीची थोडीफार सवय झाली होती.  कदाचित पुढे तीला कायमच मऊ गादीवर झोपावं लागेल असं उमाच्या मनात आलं.  त्यामुळे मऊ गादीची सवय करून घेणं आवश्यकच होतं.  स्वतःच्या विचारांवर उमा खुश होती.

(उमा आणि मानसचे नातं असं समांतर रेषेत चालेल की दोन रेषा कधीतरी एकत्र येतील पाहूया पुढील भागात)