तिची तपश्चर्या भाग ५६
महाबळेश्वर ट्रीप संपवून मानस आणि उमा परत यायला निघाले आहेत पाहूया पुढे..
मानस आणि उमा सकाळी लवकरच निघाल्यामुळे गारवा होता. मानसने मुद्दामच एसी न लावता खिडकीच्या काचा थोड्या खाली केल्या होत्या. त्यामुळे नैसर्गिक शुद्ध हवा त्यांना मिळत होती. थोडं पुढे गेल्यावर उमाने एक गुलमोहराचे झाड पूर्णपणे बहरलेले पाहिलं. नकळतच तिच्या तोंडातून शब्द निघाले,
"आहाहा गुलमोहर किती बहरलाय. आपण जरा या झाडाजवळ थांबूया का. असं वाटतंय की आज
गुलमोहराचा आनंद पण ओसंडून वाहत आहे."
गुलमोहराचा आनंद पण ओसंडून वाहत आहे."
"उमा आपल्या मनातील भावना आपण निसर्गात शोधण्याचा प्रयत्न करतो. निसर्गाचं कार्य त्या त्या ऋतूप्रमाणे, त्या त्या काळाप्रमाणे अनादी कालापासून तसंच चालत आले आहे. महाबळेश्वरची ट्रीप तुला खूप आवडली आहे तो आनंद तुझ्या मनाला झालाय म्हणून तुला गुलमोहर पण आनंदून गेलेला दिसतोय."
"असेलही कदाचित. मी जपान बद्दलची माहिती एका पुस्तकात वाचली होती. तिथे 'चेरी ब्लॉसम' म्हणून एक सीजन असतो. तेव्हा सकुरा नावाची फुलं खूप बहरून येतात. तेथील लोक सकुराने बहरलेल्या अशा झाडाखाली मुद्दामहून जेवायला जातात. अगदी उत्सवाप्रमाणे तो सीजन साजरा होतो. तिथे खूप आकर्षक, सुंदर रोषणाई केलेली असते. तिथे लोकांची अशी समजूत आहे की त्या सकुरा झाडाखाली बसून जेवताना जर आपल्या अंगावर त्या फुलांचा वर्षाव झाला तर आपल्या जीवनातील आनंद द्विगुणीत होतो. त्या फुलांपासून तेथे आईस्क्रीम बनवले जाते, मिठाई बनवली जाते. तिथे त्या फुलांचं वारेमाप कौतुक केलं जातं अगदी मनापासून. इथे आपल्याकडे फक्त कवितातूनच गुलमोहराचे वर्णन आणि कौतुक होताना दिसते. बाकी लोकांना गुलमोहर बहरला काय किंवा तसाच राहिला काय काही फरक पडत नाही."
"हो मी पण 'चेरी ब्लॉसम'बद्दल वाचलं आहे. तुझं वाचन खूपच दांडग दिसतय. अर्थात एका शिक्षकाची मुलगी आहेस तू. अगदी लहानपणापासूनच ज्ञानार्जन करत आली असशील. काही जण फक्त प्रणयरम्य कादंबऱ्या, काही जण फक्त ऐतिहासिक अशा एका चौकटीत राहून वाचन करतात. परंतु तू चौफेर वाचन करतेस हे खूपच चांगलं आहे."
मानसने गुलमोहराजवळ गाडी थांबवली. उमा लगेचच गाडीतून उतरली आणि गुलमोहराच्या झाडाखाली जाऊन हात पसरून वरती फुलांकडे पाहू लागली. पूर्ण झाड
केशरी रंगात नाहून निघालं होतं. उमाला एवढं खुश पाहून मानसने गुलमोहरच्या झाडाखाली तिच्या नकळत वेगवेगळ्या पोजेस मधले फोटो काढले. त्याच्या मनात आलं उमाला सगळ्याच गोष्टींचे कसं कौतुक वाटतं. अगदी लहान लहान गोष्टीत पण ती आनंद शोधत असते. खरंच 'आनंद यात्री' हे विशेषण तिला लागू होतं.
केशरी रंगात नाहून निघालं होतं. उमाला एवढं खुश पाहून मानसने गुलमोहरच्या झाडाखाली तिच्या नकळत वेगवेगळ्या पोजेस मधले फोटो काढले. त्याच्या मनात आलं उमाला सगळ्याच गोष्टींचे कसं कौतुक वाटतं. अगदी लहान लहान गोष्टीत पण ती आनंद शोधत असते. खरंच 'आनंद यात्री' हे विशेषण तिला लागू होतं.
थोड्यावेळाने ते तिथून निघाले. घरी पोहोचायला अजून वेळ लागणार होता म्हणून मानस उमाला म्हणाला,
"घरी पोहोचायला अजून उशीर होईल आपण काहीतरी खाऊन घेऊया."
ते एका 'निवांत' नावाच्या रेस्टॉरंटमध्ये गेले. इथे खरच खूपच निवांतपणा जाणवत होता. अगदी हलक्या रंगाची मनाला निवांत वाटणारी अशी सजावट केली होती. ते दोघे एका टेबलवर बसले. मानसने ओनियन उत्तप्पा सांगितला आणि उमाने दहीवडा सांगितला. पांढरे शुभ्र दही पांघरलेला दहीवडा बघून उमा म्हणाली,
"हा दहीवडा किती शुभ्र छान दिसतोय ना. त्याच्या मनात कोणाविषयी कलुषित भाव नसतात."
"अरे बापरे. तू त्या दहीवड्याला पण सोडणार नाहीस."
इतक्यात त्यांच्या बाजूच्या टेबलवर एक तरुण आणि तरुणी येऊन बसले. तरुणीच्या चेहऱ्यावर थोडे काळजीचे भाव दिसत होते तर तरुण 'आर या पार' या भावनेचे प्रतिनिधित्व करत होता. आले तेव्हापासून त्यांची धूसफूस चालूच होती. आपल्या आजूबाजूला कोण बसलय याचे त्यांना भानच नव्हतं. कोणालाही सहज ऐकू जाईल अशा स्वरात ते एकमेकांशी बोलत होते. त्यांचा लहान मुलगा बहुदा हॉटेलच्या आवारातील झोपाळ्यावर बसला होता. अधूनमधून दोघे बाहेरच्या बाजूला बघत होते. तो तरुण जरबेच्या आवाजात म्हणाला,
"हे बघ मेघा मी आता तुझ्या बरोबर नाही राहू शकत. माझ्या आयुष्यात आता सुनिता परत आली आहे. ते माझं पहिलं प्रेम आहे आणि आता ती आणि मी एकत्र येणार आहोत."
"अहो पण आता आपले लग्न झाले आहे. आपल्याला आता पाच वर्षाचा मुलगा आहे ह्याचे तरी तुम्ही जरा भान ठेवा. तुम्ही तिला घरात परत आणलं तर मग आम्ही दोघं कुठे जाणार."
"मी तुला भाड्याने घर घेऊन देईन. तिथे तुम्ही दोघं रहा. तुझी नोकरी तर आहेच. अधून मधून पैशाची मदत मी तुला करेन. चोवीस तासासाठी बाई ठेव."
"अहो महेश पण तेव्हा ती तुमच्याकडे पैसा नाही म्हणून तुम्हाला सोडून गेली आता तुमच्याकडे भरपूर पैसा आला म्हणून ती परत येते. उद्या कशावरून तिला अजून जास्त पैसेवाला दुसरा कोणी भेटल्यावर ती तुम्हाला सोडून जाणार नाही."
"आता असं काही होणार नाही."
"महेश तुम्ही कधी असा विचार करून पाहिला आहात का जर मी तुमच्या जागी असते आणि मी असं वागले असते तर तुम्हाला कसं वाटलं असतं. असा एखाद्याचा संसार उध्वस्त करून कोणाचे भलं नक्कीच होत नाही."
"उमा कधी कधी असं काही कानावर आलं की आपण सरळ तिकडे दुर्लक्ष करायचं असतं. चल खाऊन घे."
खाल्ल्यावर मानसने बिल दिल्यावर ते निघाले. राहून राहून उमाला वाटत होतं की या दोघांना आपण काहीतरी समजावून सांगावं. तिसऱ्या व्यक्तीला आपण कसे सांगणार म्हणून उमाने तो विचार सोडून दिला. त्या दोघांचं तेच चालू होतं. गाडीत बसल्यावर उमा शांत बसलेली पाहून मानस म्हणाला,
"अगं असं समाजात वावरताना आजूबाजूला आपल्याला बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात. त्याबद्दल जास्त विचार करायचा नाही. काय माहित आज ते असं बोलत असले तरी ते दोघे एकत्र येऊ पण शकतात."
"हो ते शक्य आहे पण मी विचार करत होते अशी एखादी व्यक्ती लग्न झाल्यावर अगदी लहान मुलगा पदरात असताना आधीची प्रेयसी परतली म्हणून स्वतःच्या बायकोला असा धोका कसा देऊ शकतो. हे योग्य नाहीये ना. असा भ्रमर वृत्तीने वागून कोणाचे जीवन सुखी होत नाही. मधल्या मध्ये लहान मुलाचे आयुष्य पणाला लागेल नाही का."
"अगं उमा आता ते भावनेच्या भरात कदाचित बोलत असतील. उद्या प्रत्यक्ष वेळ येईल आणि तो मुलगा त्या तरुणाला बाबा म्हणून हाक मारेल तेव्हा कदाचित त्याचा विचार बदलेल सुद्धा. आता तू त्यांचा जास्त विचार करू नकोस तुझ्या मनाला त्रास होईल."
मानसच्या मनात येत होतं आपण पण उमाशी लग्न केलं आहे तरी उमाच्या बाबतीत आपण तसेच वागणार आहोत अर्थात आपण उमाला त्याची सुरुवातीलाच कल्पना दिली होती आणि लग्न होऊन सुद्धा आपण नवरा बायको म्हणून कधीच वागलो नाही. उमाला सुद्धा आपला तिरस्कारच वाटत असेल नाही का! या दोघांना एक पाच वर्षाचा मुलगा आहे म्हणजे लग्न होऊन ते एकमेकांच्या संमतीनेच राहिले असतील ना. उमा सारख्या सालस, निर्मळ मनाच्या मुलीच्या बाबतीत आपण इतक्या कठोरपणे नाही वागू शकणार. उमाचा मूड चांगला व्हावा म्हणून मानसने एफ एम ऑन केला. गाणे लागलं होतं,
'हवास तू हवास तू
हवास मज तू हवास तू
प्रिया नाचते आनंदाने
दूर उभा का उदास तू?'
हवास मज तू हवास तू
प्रिया नाचते आनंदाने
दूर उभा का उदास तू?'
दोघांनी एकमेकांकडे पाहिल्या आणि त्यांनी मंदस्मित केले. चला उमाचा मूड तर ठीक झाला. गाणं ऐकून उमाच्या मनात आलं हे असं मी मानसला कधी स्पष्टपणे विचारू शकेन का. पण तो आपला स्वभावच नाही. सिनेमांमध्ये ठीक आहे. इतक्यात मानस म्हणाला,
"आता अर्ध्या तासात आपण घरी पोहोचू. तोपर्यंत गाणी ऐकत बस."
(घरी गेल्यावर उमा आणि मानसच्या जीवनात काही बदल घडेल का पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे