Login

तिची तपश्चर्या भाग ५७

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी
तिची तपश्चर्या भाग ५७


''आनंद यात्री' उमा आणि मानस घरी आल्यावर काय घडेल पाहूया पुढे..

घर जवळ आलं तसं मानसने उमाला आईना फोन करायला सांगितला.  उमाने आज्ञाधारकपणे फोन लावला,

"हॅलो आई आम्ही आता पंधरा मिनिटात घरी पोहोचू."

"बरं आल्यावर तुम्ही जेवणार आहात की वाटेत काही खाल्लं आहे."

"हो हो आम्ही वाटते खाल्लं आहे आल्यावर फ्रेश होऊन थोड्यावेळाने जेवू.  तुम्ही जेवून घ्या."

थोड्याच वेळात गाडी बंगल्याच्या पोर्च मध्ये आल्यावर मानसने हॉर्न दिला. लगेच लगबगीने शकुंतलाताई बाहेर आल्या.

"अरे वा या या.  आली माझी गोड गोजिरी नाजूक साजूक स्ट्रॉबेरी.  वा उमा तुझ्या गालावर स्ट्रॉबेरीचा रंग उतरलाय बरं का."

"आई तुमचं आपलं काहीतरीच असतं."

"अगं अशी लाजतेस काय. बरं महाबळेश्वरची सगळीच स्ट्रॉबेरी एकटीनेच खाल्ली नाहीस ना! आणलीस ना आमच्यासाठी." उमा पण गमतीने म्हणाली,

"मी आणणारच नव्हते.  निघताना एक स्ट्रॉबेरी आली आणि म्हणाली अगं तुझ्या प्रेमळ सासूबाईसाठी आम्हाला घेऊन चल बरोबर."

"तिला एक फटका द्यायला हवा होतास तू.  मला सासूबाई म्हणाली ना."

"अहो नाही पुढचं वाक्य ऐका ना.  ती म्हणाली की तुझ्या सासूबाई प्रेमळ तर आहेतच पण अगदी तुझ्या आई सारख्याच आहेत.  ती असं म्हणाली म्हणून काही स्ट्रॉबेरी आणल्या तुमच्यासाठी." उमाच्या हजारजबाबी पणावर सगळे हसायला लागले.

"बरं चला तुम्ही वर जाऊन फ्रेश होऊन या मग आपण सगळे एकदमच जेवायला बसुया."

"आई तू जेवून घ्यायचं ना तुला औषध घ्यायचं असतं.  आमची वाट कशाला बघत बसलीस."

उमा आणि मानस वर गेले.  घरात कामाला असलेल्या दत्तूने त्यांचे सामान वर नेऊन ठेवलं आणि स्ट्रॉबेरीचे बॉक्सेस खालीच ठेवले.  दोघेही फ्रेश होऊन खाली आले आणि सगळे म्हणजे उमा, मानस आणि आई एकत्र जेवायला बसले.  शामराव फॅक्टरीत गेले होते.  शकुंतला ताईंच्या मनात आलं कसा या दोघांचा लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभून दिसतोय. कोणाची दृष्ट नको लायला.  जेवताना त्या म्हणाल्या,

"काय ग उमा महाबळेश्वरहून आई-बाबांना फोन केला होतास की नाही."

"हो मी रोजच आई-बाबांशी फोनवर बोलते.  ते वाट बघत असतात ना."

"बरोबर आहे रोज बोलायलाच हवं गं.  कसं असतं ना आपली सासरी गेलेली मुलगी कितीही सुखात असली, खुश असली तरी तिचा आवाज ऐकण्यासाठी आणि तिला प्रत्यक्ष पाहण्यासाठी सगळे आई-बाबा नेहमीच अधीर असतात. रोज भेट झाली नाही म्हणून फोन केला तर ख्यालीखुशाली कळते ना."

उमाच्या मनात आलं आई आपलं मन तर जाणतातच आपल्याला इतकं जपतात परंतु आपल्या आई-बाबांच्या काय भावना आहेत ते सुद्धा त्या जाणून आहेत आणि त्या स्वतः जपत आहेत.  खरंच या सर्वांचे आपल्याशी नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असावेत.  जेवताना मानस म्हणाला,

"उद्यापासून मला फॅक्टरीत गेलेच पाहिजे बर का.  इतक्यात मी काही रजा वगैरे घेणार नाही.  उगाच बाबांना जास्त प्रेशर नको यायला."

"उमा मानस फॅक्टरीत गेला की तू उद्या आई-बाबांकडे जाऊन ये. भेटून ये त्यांना आणि मानस तू उमाच्या आई-बाबांचा आणि आमचं गोव्याचा बुकिंग करून दे बरं का पुढच्या आठवड्याचा."

"होय मी उद्याच बुकिंग करून टाकतो.  उमा उद्या जाशील तेव्हा आई-बाबांशी बोलून घे.  त्यांना पुढल्या आठवड्यात चालेल ना."

"मला वाटतं त्यांची काही हरकत नसणार दोघेही तसे घरीच आहेत आता.  त्यांचे पण जरा बाहेर मोकळेपणाने फिरणं होईल."

"हो नक्कीच.  माझ्याप्रमाणेच आई-बाबा पण कधीच कुठे बाहेर फिरायला गेले नाही."

"आता जेवल्यावर थोडा आराम करा मग नंतर बॅगेतले सामान काढा."

जेवल्यावर मानस आणि उमा आराम करण्यासाठी दोघे वरती गेले. उमा म्हणाली,

"मी जरा बाहेर गॅलरीत उभी राहते.  आता जेवले ना थोड्यावेळाने झोपेन."

"हो तुझ्या तुला झाडापानांना बघायचं असेल ना. तू इथे नव्हतीस तर किती बारीक झाली असतील.  पक्षी इथे गॅलरीत बसून किलबिलाट करून तसेच माघारी फिरले असतील."

"अहो कसं असतं ना आपल्या माणसांना कसा आपल्या एखाद्या व्यक्तीचा विरह जाणवतो तसं पशु पक्षांना, झाडांना,फुलांना सुद्धा हे सर्व जाणवतच असतं.  खरंतर माणसापेक्षा सुद्धा ते जास्त प्रामाणिक असतात.  त्यांच्या भावना ते मुखाने प्रकट करू शकत नाहीत परंतु त्यांच्या हालचालीतून ते जाणवतं."

"उमा तू बीकॉम केले आहेस ना.  त्यापेक्षा तू आर्ट्सला गेली असतीस तर मानसशास्त्र या विषयात पीएचडी केलं असतं किंवा सायन्सला जाऊन वनस्पती शास्त्रात काहीतरी भरीव कामगिरी केली असती.  अकाउंट म्हणजे अगदी रूक्ष विषय."

"आता मी आता सुद्धा हे सगळं करू शकते म्हणजे छान डबल ग्रॅज्युएट होईल की नाही "

"हो ही तर खूप छान कल्पना आहे.  तुझा वेळ पण खूप छान जाईल.  घेऊया का ऍडमिशन.'

"अहो काहीतरीच काय मी आपली मस्करी केली.  चला आता थोडा वेळ झोपा नाहीतर दिवेलागणीच्या वेळेला झोपून राहा".

मानस झोपल्यावर उमा तिथेच सोप्या वर बसून विचार करत होती खरोखर माणसांचा अभ्यास करणे किंवा वृक्ष वल्लरीचा अभ्यास करणे किती छान असेल नाही का.  प्रत्येक व्यक्ती समाजात वावरताना वेगवेगळ्या प्रकारेच वावरत असतात.  कधी कधी ती आपल्या स्वभावाविरुद्ध जाऊन सुद्धा वागत असते.  असं का होतं.  कदाचित त्या त्या प्रसंगाला तसं वागणं योग्य असावं असं वाटतंय. कधी कधी एखाद्याच्या मनातील भावना कितीही प्रयत्न केला तरी आपण जाणून घेऊ शकत नाही.  पण कधी कधी एखाद्याच्या मनातील भावना अगदी आरशात बघितल्या सारखे आपण लगेच वाचू शकतो.  असं जेव्हा होतं तेव्हा ती व्यक्ती नक्कीच साधीभोळी असते. जीच्या मनातील भावना कळत नाही ती व्यक्ती आतल्या गाठीची असते.

(दोन दिवसांनी घरातील मोठी माणसं बाहेर गेल्यावर काय घडेल ते पाहूया पुढील भागात)