Login

तिची तपश्चर्या भाग ५८ (अंतिम)

एएका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी

तिची तपश्चर्या भाग ५८ (अंतिम)

मानस आणि उमा दोघांचेही आई बाबा गोवा ट्रिप साठी गेले आहेत पाहूया पुढे..

उमा माहेरी गेल्यावर आई-बाबांना भेटल्यावर तिने त्यांना गोवा ट्रिप बद्दल सांगितलं.  आई म्हणाली,

"अगं इतका खर्च आम्हाला कसा झेपेल.  ते सुद्धा विमानाने जायचं म्हणजे खूपच खर्च होईल."

"अगं आई आता त्यांना आपण खर्चाबद्दल बोललो तर त्यांना खूप वाईट वाटेल.  पुढच्या वेळी ते तुम्हाला बोलावतील तेव्हा आपण त्यांना विचारून बघूया.  आता यावेळी तुम्ही जाऊन या त्यांच्याबरोबर."

घरी आल्यावर तिने मानसला आई बाबांचे म्हणणं सांगितलं.

"अग तुझ्याशी लग्न केल्यावरच तुझे आई-बाबा माझे सुद्धा आई बाबा झाले. असा विचार अजिबात मनात आणू नकोस.  आपल्या आई बाबांना पण हेच वाटतं म्हणून तर त्यांनी स्वतःहून त्यांच्याबरोबर तुझ्या आई-बाबांचे बुकिंग करायला सांगितले ना."

"हो बरोबर आहे. हा तुमच्या सगळ्यांच्या मनाचा मोठेपणाच आहे."

ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळीच दोघांचेही आई-बाबा कारने मुंबई पर्यंत गेले आणि तिथून ते गोव्याला विमानाने जाणार होते.  फॅक्टरीत जायलाच पाहिजे होते म्हणून मानस मुंबईला गेला नाही.  तो फॅक्टरीत गेल्यावर उमा एकटीच घरात होती.  उमाच्या मनात येत होतं आता नंदिनीला भेटून सुद्धा एक आठवडा होऊन गेला होता.  आता मानसने माझ्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय घ्यायला हवा नाही का.  त्याच्या मनात आपल्याबद्दल नक्कीच काहीतरी कोमल भावना असणारच.  कारण नंदिनी जयंतशी लग्न करते असं म्हटल्यावर पण त्याला खूप काही फरक पडला नाही.  आपल्याला स्पष्टपणे सांगितले नाही तर कसं कळणार.  असं किती दिवस वरवरचे नवरा बायकोचं नातं निभावत राहायचं.

फॅक्टरीत गेल्यावर मानसच्या मनात सुद्धा उमाचेच विचार घोळत होते.  आज उमा एकटीच घरात आहे. अर्थात तिचा वेळ कसा घालवायचा हा तिला कधी प्रश्न पडतच नाही.  उमाबद्दल नक्कीच आपल्या मनात प्रेम निर्माण झालं आहे. म्हणूनच ती दोन दिवस माहेरी गेली होती तेव्हा तिचा विरह आपल्याला खूपच जाणवला. मी कितीही नाही म्हटलं तरी उमाला आपली प्रेमभावना जाणवतच असेल. ती आपल्यावर प्रेम करते हे तर आपल्याला अगदी लग्न झाल्यापासून जाणवत आहे.  आता तिच्या प्रेमाला आपण योग्य न्याय द्यायलाच हवा. आपल्या आई-बाबांना पण तिने नेहमीच प्रेम दिले आहे आणि त्यांना सुद्धा ती अगदी मुलीसारखीच वाटते. तिची कधीही कसलीच तक्रार नसते.  पण म्हणून तीला गृहीत धरणे योग्य नाही.  उद्या उमाला घेऊन कुठेतरी फिरायला नक्कीच गेले पाहिजे.  बाहेर मोकळ्या हवेत फिरायला तिला खूपच आवडतं.  त्यावेळी आपण आपल्या मनात काय आहे ते तिला सांगून टाकायला हवं.

रविवारी सकाळपासूनच मानस अगदी उमाच्या अवतीभवती वावरत होता.  मानस आज पूर्ण दिवस आपल्याबरोबर आहे या भावनेने उमा मनातून खूपच खुश होती.  दुपारी जेवण झाल्यावर मानस म्हणाला,

"उमा संध्याकाळी तयार राहा आपण कुठेतरी फिरायला जाऊया."

"अय्या खरंच!  कुठे जायचे आपण." विचारताना उमाच्या मनात होतं की मानसने आपल्याला पुन्हा आता टेकडीवर घेऊन जावं.  तिथे त्याच्या मनातील ज्या भावना असतील त्या सगळ्या बोलून दाखवाव्यात.  तिला गप्प बसलेले पाहून मानस म्हणाला,

"ते मी तुला आत्ताच सांगणार नाही पण तुझ्यासाठी खूप गोड सरप्राईज असेल एवढं नक्की."

आता आपल्याला काय बरं गोड सरप्राईज येईल.  कदाचित त्याच्या मनात आपल्यासाठी काहीतरी खास सरप्राईज असेल. बघूया संध्याकाळी कळेलच.  संध्याकाळी उमा खूप छान तयार झाली.  आकाशी रंगाच्या साडी मध्ये ती एकदम नीलपरी भासत होती.  आज सुद्धा ठरवून मॅचिंग केल्यासारखं मानसने स्काय ब्लू शर्ट घातलं होतं आणि ब्लू जीन्स घातली होती.  उमाला गाडीत बसताना खूपच उत्सुकता होती.  मानस पण आता उमाशी कसं बोलायचं याची उजळणी करत होता.  मानसने गाडी थांबवल्यावर उमाने पाहिलं तर तिने लगेच ओळखलं की हा टेकडीचा परिसर आहे.  तीला वाटलं आपल्या मनातलं मानसला अचूक कसं कळतं.  असं तेव्हाच घडतं जेव्हा एकमेकांच्या विचारलहरी सारख्या असतात. आज कसं काय कोण जाणे पण टेकडी चढताना अगदी पहिल्या पायरी पासून साठाव्या
पायरीपर्यंत मानसने तिचा हात धरला होता.  उमाला वाटत होतं की आपण अगदी स्वर्गाच्या पायऱ्या चढतो आहोत.  आता स्वर्गातील अप्सरा आपलं स्वागत करतील की काय.  उमाच्या मनाला मानसच्या हाताचा स्पर्श खूप काहीतरी सांगत होता.

वरती आल्यावर दोघं एका खडकावर शेजारी शेजारी बसले.  आज पहिल्या प्रथमच मानस उमाच्या इतक्या निकट बसला होता. 

"उमा आज मी तुला टेकडीवर फिरायला का घेऊन आलो माहितीये का. मला माहिती आहे तुझ्या मनात हा प्रश्न आला असेलच."

"हो मलाही प्रश्न पडला आहेच.  पहिल्या वेळी आपण आलो तेव्हा टेकडी चढताना माझ्या मनात भावनांचा मोरपिसारा फुललेला होता.  मनात विचारांचे तरंग उठत होते.  एखाद्या मुलीला आपल्या होणाऱ्या नवऱ्याने पहिल्या प्रथमच बाहेर भेटायला बोलावल्यावर तिच्या मनात किती कल्पना असतात.  तशाच माझ्याही मनात होत्या.  भविष्यातील अनेक रंगीबेरंगी स्वप्न मी घरापासून टेकडी पर्यंतच्या त्या पंधरा-वीस मिनिटांच्या प्रवासात पाहिली होती. तुम्ही आमच्या घरी मला बघायला आला होता तेव्हाच मला तुम्ही खूप आवडला होतात.  आपली ती पहिली भेट एखाद्या कादंबरीतील नायक नायिके प्रमाणे असेल असं मला तेव्हा वाटलं होतं.  खूप तरल भावना मनात घेऊन मी तुम्हाला भेटायला आले होते. पण तुम्ही जे काही सांगितलं त्यानंतर टेकडी उतरताना मात्र माझा पार विरस झाला होता."

"हो मला माहिती आहे.  तेव्हा तुला स्पष्ट असं सांगताना मला सुद्धा खूप वाईट वाटत होतं.  पण लग्नाच्या आधी स्पष्ट कल्पना देणं मला खूप गरजेचं वाटलं. म्हणूनच मी तुला सांगितलं होतं की तुझा नकार असेल तर मी दोन दिवस थांबेन आणि त्यानंतरच माझ्या घरून होकार येईल.  नकार द्यायची पूर्ण संधी मी तुला दिली होती उमा."

"तुम्ही संधी दिली होती हा तुमचा चांगुलपणा.  पण माझ्या आई-बाबांचा चेहरा आणि आमची परिस्थिती माझ्या नजरेसमोर आल्यावर मी लगेचच तुम्हाला होकार दिला."

"उमा तू होकार दिल्यामुळेच आज आपण इथे एकत्र आहोत.  इतक्या महिन्यांच्या सहवासानंतर मला तुझं मोठं मन जाणवलं आहे.  इतकच नाही तर मी कबूल करतो की मला तुझ्याबद्दल प्रेम निर्माण झाले आहे.  तू असं समजू नकोस की आता नंदिनीने जयंतशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणून मी तुला असं बोलतो आहे.  खरंतर आपले लग्न झाल्यानंतर नंदिनी भेटली तरी तिच्या अपघाताबद्दल जाणून घेण्यातच मला जास्त रस होता.  मी स्वतःहून पुन्हा नंदिनीला भेटण्याचा उत्साह दाखवला नाही.  कारण तुझ्याबद्दल माझ्या मनात हळूहळू प्रेम निर्माण होत होतं.  तू तुझ्या वागण्याने माझं मन तर जिंकलंसच पण माझ्या आई-बाबांचं मन पण जिंकून घेतलं."

"तुम्हाला माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय हे मला सुद्धा जाणवत होतं आणि मला खात्री होतीच की एक ना एक दिवस तुम्ही माझे व्हालच.  तुम्ही तेव्हा मला पत्नीचा दर्जा दिला नसला तरी मी लग्न झाल्यापासूनच मनोमन तुम्हाला माझा पती मानत होते. मी वाट बघायला तयार होते."

सूर्यास्त होत आला होता.  सूर्यास्ताच्या रंगछटा पश्चिमेकडे आकाशात विखुरलेल्या दिसत होत्या.  त्या रंगछटांचे जणू प्रतिबिंबच उमाच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. मानस उमाच्या अजून जवळ सरकला आणि तिचा हात हातात घेऊन तिला त्याने हळुवारपणे विचारले,

"उमा माझं तुझ्यावर प्रेम आहे. या मावळत्या दिनकराच्या साक्षीने मी तुला वचन देतो की मी तुझा पत्नी म्हणून खऱ्या अर्थाने आता स्वीकार करतो आहे.  तू कायमसाठी माझी होशील ना? आयुष्याच्या अंतापर्यंत तू मला अशीच साथ देशील ना!"

मानसने वाकून उमाच्या चेहऱ्याकडे पाहिले. उमाचा चेहरा लाजेने आरक्त झाला होता.  मानसने हळूच तिला आपल्या बाहूपाशात घेतले.  उमाने उत्तरादाखल त्याच्या छातीवर अलगद डोके टेकवले.  या सोनेरी क्षणाची उमा कधीपासून वाट पाहत होती.  आज खऱ्या अर्थाने तिच्या संयमीत तपश्चर्येचे फळ तिला मिळालं होतं.  उमाने मनोमन टेकडीचे आभार मानले.  उमा आणि मानस खऱ्या अर्थाने एकत्र आले होते.

समाप्त


©️®️ सीमा गंगाधरे

(कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तुमच्या अभिप्रायाची उत्सुकता आहे. ते माझ्या लिखाणासाठी नेहमीच प्रेरणादायी असतील)