तिच्या स्वातंत्र्याची किल्ली -भाग 2

गोष्ट निर्णयाची
सासरी घरात इन मीन तीन माणसं. कल्पनाला वाटलं आपल्याला भरपूर स्वातंत्र्य असेल. आपल्या मनाजोगा संसार करता येईल. पण अनंतापुढे तिचं काही चाललं नाही. तो जे म्हणेल तेच करायचं आणि मन मोडलं की त्याचा राग गगनाला भिडायचा. हे सगळं बघून कल्पनाने आपल्या नवऱ्याच्या शब्दापुढे जाण्याचं धाडस कधी केलं नाही.
सासुबाईही आपल्या मुलापुढे गप्प बसायच्या. त्याला टेन्शन कशाला द्यायचं, म्हणून त्या शांतपणे त्याचं सगळं म्हणणं ऐकून घ्यायच्या.

घरची कामं संपली की वेळ जात नव्हता म्हणून कल्पनाने नोकरीचा विषय आपल्या नवऱ्यापुढे मांडला. पण 'तुला नोकरी जमणार नाही." या वाक्याने त्यावर कायमची खाट मारली. कल्पनाच्या डोक्यात नोकरीचा विषय पुन्हा यायला नको यासाठी अनंताने चान्स घ्यायची गडबड केली. खरंतर तिला इतक्यात मूल नको होतं. चिनू झाली आणि एकच मूल हवं हा निर्णयही अनंतानेच घेतला. असे संसारातले बरेचसे निर्णय त्याने एकतर्फी घेतले होते. हळूहळू हे सगळं कल्पनाच्या अंगवळणी पडलं.

कदाचित संसार हा असाच असावा, असं तिला वाटायला लागलं. संसार हा दोघांचा असतो. दोघांनी तो जपायचा असतो, सावरायचा असतो. ही तिची अपेक्षा कुठेतरी मनातच राहिली.

"आता काय झालं? रडा.. तुम्हाला रडायला काही कारण लागत नाही." अनंताचे शब्द ऐकून कल्पना भानावर आली. काही न बोलता ती स्वयंपाक घरात आली.
"आई, काय झालं?" चिनू तिला बिलगली.

"काही नाही. तू अभ्यास कर. मी पट्कन जेवण बनवते." कल्पनाने डोळे पुसत स्वयंपाक करायला घेतला.
--------------------------------

सकाळी अनंत कल्पनाला स्टेशनवर सोडायला गेला." माझं ऑफिस संध्याकाळी सहा वाजता सुटतं. तू बरोबर त्यावेळेस इथे यायला हवं."

"असं कसं? परगावी जायचं म्हटलं की थोडा तरी उशीर होणारच की. तुमची आणि माझी वेळ काही जमायची नाही. तुम्ही घरी जा. माझी मी येईन." कल्पना खाली मान घालून म्हणाली.

"ते काहीही असो. मी वाट बघतो." अनंत पुढे निघून गेला आणि आज पहिल्यांदा कल्पनाला आपल्या नवऱ्याचा खूप राग आला. नवऱ्याला आपली काळजी आहे असं म्हणावं तर तेही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. जबाबदार स्त्री किंवा एक व्यक्ती म्हणून मला घरचे, स्वतः चे कुठलेही निर्णय घेण्याचे अधिकार, स्वातंत्र्य नाही? की मी अशीच काही न बोलता, न विचार करता त्यांचा शब्द झेलत राहायचा? माझ्या आयुष्याचे निर्णय मी घ्यायचे तरी कधी? आपल्याच नातेवाईकाला एखादी भेटवस्तू घ्यावी वाटली तरी मी घेऊ शकत नाही. बरं, हा निर्णय राहू दे. पण चिनूला कोणत्या शाळेत घालायचं हा निर्णयही यांचाच होता.
पुरुष प्रधान संस्कृती असली तरी स्त्रीला मान का नाही? ती कमवत नाही म्हणून की ती एखादा निर्णय ठामपणे घेऊ शकत नाही म्हणून? का ती खंबीर नाही म्हणून? आपलं नेमकं काय चुकतंय हेच तिला कळेना. आपल्या पदरात मुलगी आहे. तिच्यावर हेच संस्कार करायचे? कल्पना अनंतने जिथे सोडले होते तिथे काही वेळ विचार करत उभी होती.
समोर साड्यांच्या दुकानात ही गर्दी झाली होती. कार्यक्रमाला जाताना जाऊबाईंना एखादी छानशी साडी घ्यायच्या तिच्या विचाराने पुन्हा उचल खाल्ली. अनंताने दिलेले पाचशे रुपये तिने पाकिटातून बाहेर काढले आणि आपल्या जवळचे साठवलेले आणखी पाचशे रुपये तिने त्यात ठेवले.
तिला वाटलं, अनंतने दिलेले पैसे म्हणजे त्याचे विचार अगदी या बंद पाकिटासारखे आहेत. एकदा या पाकिटात बसवले की झालं! ते कोणी उघडू शकत नाही.आता हे बंद पाकीट फोडून आपण आपले विचार यात मिसळले की दोन विचार एकत्र येतील. थोडा संघर्ष होईल. पण आता आपण पुढाकार घ्यायला हवा. सासुबाईंना फोन करून
कल्पना समोरच्या दुकानात शिरली. आपले थोडे पैसे भर घालून तिने एक छानशी साडी विकत घेतली आणि तिथूनच ती पुढे कार्यक्रमाला गेली.
-------------------------------------

संध्याकाळी वाट पाहून अनंत शेवटी घरी आला. कल्पना अजून कशी आली नाही म्हणून त्याची चिडचिड सुरू झाली. कल्पनाला यायला उशीर झाला म्हणून सासुबाई चिनूचा अभ्यास घेत होत्या. स्वयंपाकाची थोडीफार तयारीही त्यांनी करून ठेवली होती.
"बाबा, आजी आईपेक्षा छान अभ्यास घेते." चिनू आनंदाने म्हणाली.

क्रमशः

🎭 Series Post

View all