तिच्या स्वातंत्र्याची किल्ली -भाग 1

गोष्ट निर्णयाची
"काय ग, उद्याच्या कार्यक्रमाला जातेस ना तू?" सासुबाई आपल्या गुडघ्यावर हात ठेवत कल्पनाला म्हणाल्या.

"हो. जाईल ती. आई, हल्ली तुला कुठे जायला जमत नाही आणि काही होतही नाही त्यामुळे आता तू फारशी कुठे गेली नाहीस तरी काही बिघडणार नाही. कल्पना जाईल उद्या. तू काळजी करू नको." अनंत मधेच म्हणाला.

"अहो, पण.. मला जमणार नाही."

"का? घरचा कार्यक्रम आहे. तशीही दिवसभर तू घरातच असतेस. नाही म्हणायला घरची कामं बघतेस. पण त्यात काही इतकं मोठं?" अनंता मधला पुरुष लगेच जागा झाला.

"उद्यापासून चिनूची परीक्षा सुरू आहे. ती घरी आल्यावर तिचा अभ्यास घ्यायचा आहे. शिवाय मला वहिनींना बघायला दवाखान्यात जायचं आहे. तिथे दोन-तीन तरी तास थांबावं लागेल." कल्पना.

"वहिनींना बघायला तू परवा दिवशी जाऊ शकतेस आणि चिनू काय आता लहान नाही राहिली. तिचा ती अभ्यास करेल. मी सांगतोय ना.. तू जाऊन ये."

आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकून कल्पना पुढे काही बोलू शकली नाही. या घरात जणू त्याचा शब्द तिच्यासाठी अंतिम होता. बाबांचं बोलणं ऐकून चिनू आईकडे बघायला लागली.
"आई, तुम्ही उद्या चिनूचा अभ्यास घ्याल? मी कार्यक्रमाला गेले तर मला यायला संध्याकाळ होईल."

"नाही गं बाई. मला ते जमत नाही." तिच्या सासुबाईंनी सहज अंग काढून घेतलं.

अनंत उठून आपल्या खोलीत गेला. त्याने पाचशे रुपयांचं पाकीट तयार करून कल्पनाला हाक मारली.

"हे पाकीट उद्याच्या कार्यक्रमासाठी आहे."

"अहो, पाकीट कशाला? एखादी छानशी साडी आणली असती. दिसायलाही ते तितकंच छान दिसलं असतं." स्त्री सुलभ भावनेने कल्पना म्हणाली.

"आता तुला माझ्यापेक्षा जास्त कळायला लागलं की काय? तू कमवतेस? नाही ना? मग मी देतोय तेवढं घे आणि गप्प रहा." अनंताच्या भुवया उंचावल्या.
तशी कल्पनाने खाली मान घातली.
तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले.
लग्नानंतर नवऱ्याचा प्रत्येक शब्द झेलायचा आणि तोच प्रमाण मानायचा. हे जणू कल्पनासाठी एक समीकरणच झालं होतं.

लग्नानंतर दोघांनी मधुचंद्र साजरा करायला कुठे जायचं यावर बरीच चर्चा झाली होती. तशी कल्पनाला फिरायची खूप आवड!
पण नवऱ्याच्या डोक्यात राग भरला की काय होतं, याची प्रचिती तिला या चर्चेवेळी झाली आणि तिच्या उत्साहावर पाणी फिरलं. ते दोघे बाहेर फिरायला गेलेच नाहीत.

क्रमशः

🎭 Series Post

View all