तिच्या स्वातंत्र्याची किल्ली -भाग 3 अंतिम

गोष्ट निर्णयाची
चिनूच्या बोलण्याने आजी सुखावली.
पण तिच्या बोलण्याकडे अनंताचं लक्ष नव्हतं.

इतक्यात बाहेर पावलांचा आवाज झाला.
"काय हे किती वेळ? मी तुला सांगितलं होतं ना लवकर यायला."

"मी आईंना फोन केला होता." कल्पना आत येत म्हणाली. ती फार आनंदात दिसत होती.

"आई, आपण जाऊबाईंना साडी घेतली अगदी तशाच दोन साड्या आपल्याला मिळाल्या. चिनूला पाकीट नि यांनाही पाकीट दिलंय त्यांनी. कल्पना बराच वेळ तिथल्या गमती -जमती सांगत राहिली."

"साडी? पण मी तर पाकीट दिलं होतं." अनंत म्हणाला.

"मी त्यात भर घालून साडी घेतली." कल्पना हळूच म्हणाली.
तसं अनंताने आईकडे पाहिलं.
"अरे, असू दे. बायकांना हौस असते."

"हौस कसली? उगीच खर्च नुसता." अनंत रागाने म्हणाला.
आता विषय वाढायला नको म्हणून सासुबाईंनी कल्पनाला आत जायला सांगितलं.

"आई, हे घर मी चालवतो, मी कमावतो. पैसा मी पुरवतो या घराला म्हणून तुम्हाला काही कमी पडत नाही. पण म्हणून आता घरचे सगळे निर्णय तुम्हीच घेणार की काय?"

"अनंत, आजवर खूप ऐकलं तुझं. आजवर मी तुला काही बोलले नाही. पण निदान जिथे स्त्रियांचा हस्तक्षेप अपेक्षित असतो, तिथले निर्णय तरी घरच्या बाईला घेऊ दे.
मान्य आहे, तू हे घर चालवतोस. मात्र काही निर्णय घेण्याचे अधिकार घरच्या स्त्रीला सुद्धा असतात हे लक्षात ठेव. केवळ पैसे कमावले म्हणजे निर्णय सगळे घेण्याचे अधिकार मिळतात असं होत नाही." अनंत गोंधळून आईकडे बघू लागला.

"बघितलंस ना, तुझी बायको किती आनंदात दिसते आहे! साडी घेण्याच्या एका छोट्याशा निर्णयाच्या स्वातंत्र्यामुळे तिचं मन किती हलंक झालं आहे. सगळेच निर्णय घरच्या पुरुषाने घेतले तर बाईने काय करायचं? फक्त त्याच्या हो ला हो करायचं? तिच्या स्वातंत्र्याची किल्ली तिच्याच हातात आणि पुरुषांच्या विचारात असावी.
तिला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असावं आणि त्याचं समाधानही तिला मिळायला हवं. घरच्या स्त्रीने आपल्या निर्णयात आनंद शोधावा असं वाटत असेल तर आधी तिला मान द्यायला शिक. अनंता जरा विचार कर..तुझ्या पदरात एक मुलगी आहे."

आईच्या बोलण्याने अनंत विचारात पडला आणि हे सगळं बोलणं ऐकणारी कल्पना मनोमन सुखावली. कारण एक स्त्री म्हणून सासुबाईंना आपली बाजू कळते हे तिला आज नव्याने उमगलं होतं आणि आता आपणही एक पाऊल आणखी पुढं टाकावं या तिच्या विचारांना पाठबळ मिळालं होतं. आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहून तिने मनात एक गोष्ट पक्की केली. आपण स्वतः साठी उभं राहायचं. पण कोणालाही न दुखावता. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून अनंत शांत झाला. तिच्या स्वातंत्र्याची किल्ली तिच्याच हातात असावी हे आईचं वाक्य त्याच्या कानात हळुवार ऐकू येत होतं.


समाप्त.
सायली धनंजय जोशी.



🎭 Series Post

View all