Login

तिच्या त्यागाच्या पाऊलखुणा

तडजोड करणं हेच प्रत्येक स्त्रीच्या नशिबात मुख्यत्वे लिहिलेलं असतं. सर्वांना आपलं मानून, वेळप्रसंगी स्वतःकडे दुर्लक्ष करून प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी, कर्तव्यपूर्तीसाठी झटत असते. पण तिच्या कष्टाची आणि त्यागाची दखल खरंच घेतली जाते का...?


अनवाणी पावलांनी पुढेच जात होती ती... अखंडपणे !
नाती, समाज, रूढींचं ओझं खांद्यावर घेऊन

'आपल्या' माणसांनी घातलेले कर्तव्याचे बंध ओढत नेत होते तिला..... दूर कुठेतरी

ती चालत होती, धावत होती
धडपडत होती, ठेचकाळत होती...

खाचखळग्यांच्या नागमोडी वळणावरून चालताना
पावलं माखली होती तिची
रक्ताने...!

तरीही सुरूच ठेवलं तिने
चेहेऱ्यावर हसू ठेवून काळजात वेदना दाबत पुढे जाणं.... तिच्या 'आपल्यांसाठी'

काळ पुढे सरकला
खांद्यावरचं ओझं असह्य होत गेलं, बंधांचं रूपांतर पाशात झालं... अन् ती थांबली !!!

विचारलं स्वतःला, " आपण हे करतोय... का ? कशासाठी ?"

मनाजोगतं उत्तर मिळेल म्हणून
मागे वळून पाहिलं तिने
भाबड्या आशेने

तर...
वाटेवरच्या तिच्या रक्ताने भिजलेल्या पाऊलखुणा पुसून टाकल्या होत्या
तिच्याच 'आपल्यांनी'....!!!
0