Login

तिढा.. गूढ मृत्यूचे (भाग २)

हत्या की आत्महत्या? रहस्य मृत्यूचे..


मागील भागात आपण पाहिले, लोणावळ्यापासून पाच सहा किमी अंतरावर असलेल्या कुरवंडे गावाच्या हद्दीत अनोळखी तरुण तरुणीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत एका गुराख्याला दिसला. आता पाहुयात पुढे.

काही वेळातच पोलिस घटनास्थळी पोहोचले. कुरवंडे गावचे पोलिस पाटील, सरपंच आणि इतर दोन तीन ग्रामपंचायत सदस्य आधीच हजर होते घटनास्थळी. त्यात घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला रामू गुराखी देखील घाबरतच सर्वांच्या मागे उभा होता. पोलिसांना पाहून तर त्याची घाबरगुंडीच उडाली होती.

"मला नाही अडकायचे या भानगडीत. पोलिस उलट पालट प्रश्न विचारून मलाच दोषी ठरवतील आणि मलाच जेलमध्ये टाकतील. लेकरं बाळं उघड्यावर येतील ओ माझे. नका मला यात अडकवू."

रामू, सरपंच आणि पाटलांच्या हातापाया पडत होता. काहीतरी कारण सांगून तिथून पळ काढण्याचा केविलवाणा प्रयत्न तो करत होता. पण सरपंच आणि पाटील यांनी त्याची कशीबशी समजूत घालून त्याला तिथेच थोपवून ठेवले होते.

"नमस्कार साहेब मी गावचा पोलिस पाटील सखाराम गलांडे आणि हे सरपंच विष्णू वाजे."

"बरं मला एक सांगा तुमच्यापैकी सर्वात आधी ज्याने या डेड बॉडीज पाहिल्या ती व्यक्ती कुठे आहे?"

सारंग सरांचा हा प्रश्न कानी पडताच रामूचे हातपायच पुरते गळाले. रामूची बोबडी वळायचीच बाकी होती आता.

"साहेब या रामूने सर्वात आधी पाहिला हा सर्व प्रकार. तो रोज त्याची गुरे घेऊन येतो या रानात." पाटीलांनी रामूकडे बोट दाखवत इशारा केला.

तसा रामू खूपच घाबरला.

"सा~सा~ साहेब पण मी काहीच नाही केले ओ. मी येतो रोज ह्या बाजूला, पण मला काहीच माहिती नाही यातली."

"अरे घाबरू नकोस रामू. आम्ही  पण माणूसच आहोत ना. अजिबात घाबरू नकोस. आणि तसेही तू गुन्हेगार नाहीस हे आम्हाला तुला पाहताक्षणी कळले आहे. पोलिसांच्या नजरेला माणूस पाहूनच थोडाफार अंदाज येत असतो. तपासाचा एक नियम आहे तो. तू सर्वात आधी पाहिल्या की नाही ह्या डेड बॉडीज म्हणून आमचे हे शिंदे साहेब तुला काही प्रश्न विचारतील. बस त्याची फक्त उत्तरं द्यायची आहेत तुला."

सारंग सरांच्या या अशा धीराच्या आणि प्रेमळ शब्दांमुळे रामूची भीती तर कुठच्या कुठे पळाली. त्याच्या जीवात जीव आला थोडा. पोलिस फक्त मारतात आणि तुरुंगात टाकतात, एवढाच त्याचा समज होता आतापर्यंत.

"साहेब कालही आलो होतो मी इकडं. सायंकाळी पाचच्या दरम्यान मी इथूनच गेलो होतो. पण तेव्हा तर काहीच नव्हतं  इथं".
हळूहळू रामू आता बोलू लागला होता.

थोडयाच वेळात फॉरेन्सिक लॅबवाले आणि श्वान पथक हजर झाले घटनास्थळी.

डेड बॉडीजचे फोटो काढून झाल्यावर दोन्ही डेड बॉडीज खाली घेण्यात आल्या. पंचनामा सुरू झाला.

पाटील मॅडम आणि हेड कॉन्स्टेबल मिस चव्हाण यांनी त्या युवतीच्या डेड बॉडीची बारकाईने तपासणी केली. शरीरावर कुठे काही खुणा आहेत का? याचीदेखील पाहणी सुरू होती.

मुलीने गुलाबी रंगाचा टी शर्ट आणि काळी जीन्स पँट परिधान केली होती. अंदाजे बावीस वर्षांची मुलगी आणि मुलगाही साधारणपणे त्याच वयाचा असावा.

मुलाच्या अंगात पांढरा टी शर्ट आणि गडद निळ्या रंगाची जीन्स पँट होती.

तितक्यात पाटील मॅडम ओरडल्या, "सर...मुलीच्या मानेवर कसले तरी ओरखडे आहेत. त्यातच मुलीच्या कपड्यांवर मातीचे आणि वाळलेल्या गवताचे काही कण देखील दिसत आहेत. पण कोणीतरी ते साफ करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे.  नक्कीच काहीतरी वेगळा प्रकार वाटतोय."

मुलाचीही बारकाईने तपासणी सुरू होती. कदाचित त्याच्या अंगावर पण काही निशाणी सापडते का? याचा शोध सुरू झाला.

त्याच्याही छातीवर आणि पाठीवर लाल, निळ्या पुसटशा खुणा दिसत होत्या. कपड्यांवर मातीचे कण होते. जसेकाही कुणीतरी मारहाण केली असावी. असेच दिसत होते या सर्व प्रकारावरून.

"सर मला तरी वाटतंय ह्या दोघांमध्ये काहीतरी झगडापकड झाली असावी." पाटील मॅडमने शक्यता वर्तवली.

"पण मग नंतर दोघेही आत्महत्या का करतील?" सारंग सरांनी देखील पुढचा प्रश्न उपस्थित केला.

"सर समजा दोघांपैकी एकाने दुसऱ्याचा मर्डर करून नंतर स्वतः फाशी घेतली असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही." पोलिस नाईक कोळी यांनी देखील त्यांचे मत मांडले.

"सर, मला तर वाटतंय ह्या मुलाने तिच्यावर अतिप्रसंग करून तिला मारून टाकले असावे. आणि नंतर स्वतःवर काही यायला नको या भीतीने त्याने स्वतःही आत्महत्या केली असावी." मिस चव्हाण यांनीही त्यांची शक्यता वर्तवली.

"हो कदाचित असेही होवू शकते. पण मला तर वेगळीच शंका येतीये."

"कोणती सर?"

"हा प्रेम प्रकरणातून घडलेलाच प्रकार आहे हे मात्र नक्की. आता मुलगी इतकी सुंदर आहे म्हटल्यावर कोणीही तिच्या प्रेमात पडूच शकते. कदाचित कोणीतरी दोघांवर पाळत ठेवून संपूर्ण प्लॅननिशी हा प्रकार घडवून आणला असावा.नाहीतर ह्या निर्जन स्थळी कोण कशाला येईल ना?" सारंग सरांचे म्हणणेही पूर्णतः चुकीचे नव्हते. बदल्याच्या भावनेतून असे होण्याची शक्यता देखील नाकारता येत नव्हती.

"आणि सर अजून संशयास्पद गोष्ट ती म्हणजे, दोघांकडेही मोबाईल नाहीत आणि ह्या निर्जन स्थळी हे दोघे पोहोचलेच कसे? म्हणजे मुलाकडे किंवा मुलीकडे बाईक वगैरे तर असायला हवीच होती इथपर्यंत यायचे म्हटल्यावर. पण आजूबाजूला टायरच्या निशाणी काही दिसत नाहीत."

जितके खोलात जाऊ तितका आणखीच तिढा वाढत चालला होता सारा.

क्रमशः

नक्की काय प्रकार असेल हा? कसे सापडतील पोलिसांना सर्व धागेदोरे? पुढे नेमकं आता काय घडणार? जाणून घेण्यासाठी  पुढचा भाग नक्की वाचा.