Login

तिढा.. गूढ मृत्यूचे (भाग ३)

हत्या की आत्महत्या? रहस्य मृत्यूचे..


मागील भागात आपण पाहिले, त्या दोन्ही मृतदेहांची ओळख काही पटली नाही. प्रत्येकजण वेगवेगळे अंदाज बांधत होता. नेमकी ही हत्या की आत्महत्या? असा प्रश्न निर्माण झाला होता सर्वांसमोर. आता पाहुयात पुढे.

पुणे श्वान पथकातील अत्यंत हुशार श्वान "शेरू" याची निवड केली होती या तपासकार्यासाठी.

शेरुने आजूबाजूच्या अंदाजे शंभर ते दोनशे मीटरच्या परिसरात खूपदा चकरा मारल्या. मात्र जवळच दोनशे मीटर अंतरावर असलेल्या रस्त्याच्या पलिकडे काही तो जाईना. सकाळपासून जास्त कोणी फिरकलेही नसेल त्या भागात.

रामूच्या सांगण्यानुसार काल सायंकाळी पाचपर्यंत इथे असे काहीही घडले नव्हते. मग एका रात्रीतून हा सगळा प्रकार घडला तरी कसा काय? जर ही हत्या आहे तर मग काहीतरी पुरावा सुटलाच असेल गुन्हेगाराच्या हातून आणि आत्महत्या म्हणावी तर ह्यांच्याकडे एकही वस्तू नाही.

सारे काही मोठे गूढ होते.

"राऊत...तुम्ही एक काम करा, ताबडतोब पोलिस स्टेशनला फोन करून पवारांना शहरातल्या तसेच आजूबाजूच्या प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये फोन करून चौकशी करायला सांगा की, एखादी मिसिंग कंप्लेंट दाखल झाली आहे का? पुढच्या अर्ध्या तासात मला सगळे डिटेल्स हवेत."

"येस सर," म्हणत राऊतांनी लगेचच त्यांची जबाबदारी पार पाडली.

"ही मुले कोणत्या गावची? कोणत्या कॉलेजमध्ये शिकायला होती? इकडे ह्या आडबाजूला नेमके कशासाठी आले होते ते?  याची काहीतरी माहिती मिळाल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही."
पोलिस इन्स्पेक्टर सारंग देसाई यांनी शक्य तितक्या सर्व ट्रिक वापरून पाहिल्या. पण अजूनतरी एकही धागादोरा त्यांच्या हाती लागला नव्हता.

आता खूप वेळ होत आला होता. घटना नेमकी केव्हा घडली? याचा काहीच अंदाज येत नव्हता. पण शक्यतो मध्यरात्री घडलेला हा प्रकार असावा. कारण दोन्ही मृतदेह  आता बऱ्यापैकी अकडत चालले होते.

साधारणपणे दीड दोन तास होत आले होते तपास सुरू होऊन. जास्त वेळ मृतदेह असे उघड्यावर ठेवणे योग्य नव्हते.

फॉरेन्सिक लॅबवाल्यांनी दोन्ही मृतदेहांच्या हातांचे ठसे तसेच इतर गरजेचे सर्व नमुने घेतले होते तपासासाठी.

थोड्याच वेळात पंचनामा पूर्ण करून दोन्ही बेवारस मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी लोणावळा सरकारी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

तितक्यात सारंग सरांच्या मोबाईलवर पवारांचा फोन आला .

"सर आंबेगाव आणि आळंदी या दोन पोलिस स्टेशनमध्ये दोन मुलींच्या मिसिंग केस ऑलरेडी दाखल आहेत. पण त्याचा या केसशी काही संबंध असेल असे वाटत नाही. कारण दोन्ही कंप्लेंट साधारणपणे दोन आठवड्यापूर्वीच्या आहेत."

"बरं आणखी एक काम करा. मी तुम्हाला दोन्ही मृतदेहांचे फोटो पाठवतो. त्यावरून न्यूज रेडी ठेवा. आज रात्रीच वर्तमानपत्रात बातमी द्यावी लागेल. तरच उद्यापर्यंत बातमी पसरेल ही सर्वत्र. त्यातूनच काहीतरी क्ल्यू मिळू शकतो."

"ओके सर." म्हणत ठाणे अंमलदार पवार यांनी फोन ठेवला आणि ते लगेचच सांगितलेल्या कामाला लागले.

"थोड्याच वेळात दोन्ही मृतदेह सरकारी दवाखान्याच्या शवविच्छेदन गृहात (पोस्ट मॉर्टम रूममध्ये) पाठण्यात आले. तिकडे पोलिस टीम मात्र अजूनही आजूबाजूच्या परिसराचा शोध घेण्यात व्यस्त होती.

"बरं ऐका, आता इथे जास्त वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला निघायला हवं." पी.आय. सारंग देसाई यांनी आदेश दिला. त्याआधी घटनास्थळापासून जवळपास दोनशे मीटरचा परिसर सील करण्यात आला. कुरवंडे गावचे सरपंच तसेच पोलिस पाटील यांनाही काही सूचना देण्यात आल्या.

"जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत या परिसरात कोणालाही फिरकू देऊ नका. आणि चुकून काही संशयास्पद हालचाली जाणवल्या किंवा गावात एक जरी नवीन व्यक्ती विनाकारण फिरताना आढळली तर लगेच आम्हाला कळवा."

सर्व गोष्टी बारकाईने समजावून सांगितल्यानंतर पोलिस पथक तेथून रवाना झाले. सर्वांच्याच पोटात मात्र भुकेचा डोंब उसळला होता.  दुपारच्या जेवणाची वेळही निघून गेली होती. जाता जाता सर्वांनी मग वाटेत एका ठिकाणी हलकासा नाश्ता केला आणि चहा घेऊन सर्वजण पुढच्या कामासाठी निघाले.

सकाळपासून सर्वांचीच इतकी धावपळ झाली होती की ते दोन्ही मृतदेह राहून राहून सर्वांच्याच डोळ्यांसमोर दिसत होते.

पी.आय. सारंग देसाई मात्र खोल विचारांत गुंतले होते.
"असे नेमके काय घडले असेल त्या दोन मुलांसोबत? जर दिघेही पुण्यातील किंवा जवळपासच्या परिसरातील असते तर आज सकाळपर्यंत एक तरी मिसिंग कंप्लेंट दाखल व्हायलाच ही होती. नक्कीच ही दोन्ही मुले बाहेर गावाहून शिकायला आले असावेत पुण्यात, हे मात्र नक्की. पण असे असले तरी त्यांच्या घरच्यांनी कालपासून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न केला असणार. पण अजून तरी सारे काही गुलदस्त्यातच होते.

क्रमशः

आता पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधून तरी येईल का सत्य उघडकीस? जाणून घ्या पुढील भागात.