Login

तिढा.. गूढ मृत्यूचे (भाग ४)

हत्या की आत्महत्या? रहस्य मृत्यूचे..


मागील भागात आपण पाहिले की, दोन्ही मृतदेह पोस्ट मॉर्टेमसाठी लोणावळा सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आले. आता पाहुयात पुढे.

थोड्याच वेळात पोलीस इन्स्पेक्टर सारंग देसाई, पी.एस.आय पाटील मॅडम आणि दोन कर्मचाऱ्यांसह सरकारी दवाखान्यात हजर झाले. बाकी सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये पुढच्या कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले.

"पाटील मॅडम तुम्हाला कसली घाई नाही ना? म्हणजे मुलगा लहान आहे ना तुमचा म्हणून विचारले."

"नाही सर, सासूबाई आहेत ना त्याला सांभाळायला. देईल थोडा त्रास तो पण करतील आई मॅनेज. आता इथेही माझी गरज आहेच ना. तशीही त्याला आता सवय झाली आहे माझ्या घरात नसण्याची." हसूनच मॅडमने रिप्लाय दिला.

"अहो माझी मुलगी तर तिच्या आईला न सांगता कितीतरी कॉल करत असते मला. कामाच्या गडबडीत कॉल रिसिव्ह करणंही शक्य होत नाही. आताच चार मिस्ड कॉल ऑलरेडी झालेत. जोपर्यंत तिला मी रिप्लाय करत नाही तोपर्यंत ती काही थांबायचे नाव घेणार नाही."

"सर आधी बोलून घ्या मग तिच्यासोबत. तेवढेच तिच्या मनाचे समाधान होईल. पुन्हा पोस्ट मॉर्टम सुरू झाले की मग बोलता येणार नाही."

"हो आलोच मी."

"घरच्यांशी आणि आपल्या दहा वर्षांच्या लेकीशी बोलून सारंग सर दहा मिनिटात पुन्हा आले. पण ह्यावेळी त्यांच्या डोळ्यांत मात्र आसवांची दाटी झाली होती."

सर्वांनीच सरांचे हे रूप पहिल्यांदाच पाहिले होते. सर इतके हळव्या मनाचे असतील असे कोणालाही वाटले नव्हते.

"काय झाले सर? झालं का बोलणं मुलीसोबत?"

"हो झालं मॅडम. मुलीसोबत बोलत होतो पण राहून राहून मनात एकच विचार येत होता, आज ज्या मुलीसोबत हा असा प्रकार घडला आहे तिच्या आईवडिलांना तर या गोष्टीची दूरदूरपर्यंत कल्पनादेखील नसेल. आणि जेव्हा त्यांना हे सर्व समजेल तेव्हा त्यांची काय अवस्था होईल? नुसत्या विचारानेच मन अगदी सुन्न झाले ओ. आणि आपला तरुण मुलगा गमावल्याचे दुःख कसे सहन करतील त्याचे आई वडील?"

"अवघड आहे ओ सर आजकालच्या या तरुणाईचे. सगळेच जण आपल्या आई वडिलांचा विचार करतातच असे नाही. क्षणिक सुखासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावते ही आजची पिढी. पण सगळेच तसे असतात असेही नाही म्हणा. काहींना असते परिस्थितीची आणि आई वडिलांची जाण पण काहीजण हे असे वागून आपल्या आई वडिलांचा खूप मोठा विश्वासघात करतात."

"अहो पण मॅडम, आई वडिलांना किती मोठी शिक्षा आहे ही. रक्ताचे पाणी करून पालक मुलांना वाढवतात. त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे हा एकच हेतू डोळ्यासमोर ठेवून पाण्यासारखा पैसा खर्च करून उत्तम शिक्षणासाठी मुलांना शहरात पाठवतात. त्याबदल्यात हे असे फळ द्यावे मुलांनी त्यांना. आता हे असे दोन्ही मृतदेह एकत्र आढळून आले यातच बरचसे अर्थ निघतात. काय वाटेल त्या आई वडीलांना जेव्हा त्यांना समजेल की, आपली मुलगी शिक्षणाच्या नावाखाली मुलासोबत फिरायला गेली होती."

"सर ह्यांच्या अशा वागण्यामुळे ग्रामीण भागातील कितीतरी पालक मुलींना शहरात शिक्षणासाठी पाठवताना खूप विचार करतात. ह्या अशा घटनांमुळे पालकांनी त्यांच्या मुलांवर विश्वास तरी कसा ठेवायचा?"

"तेच तर मॅडम, मुले बाहेर शिकायला जातात पण घोर मात्र आई वडिलांच्या जीवाला लागतो. वाईट वाटते ओ हे असे काही समोर आल्यावर. अजून तर रिपोर्ट आल्यावर काय काय समोर येणार आहे देवच जाणे."

सारंग सर आणि पाटील मॅडम दोघेही आजच्या या प्रकाराबद्दल  हळहळ व्यक्त करत होते.

तेवढयात पोस्ट मॉर्टम करणारा मुलगा सलीम तिथे हजर झाला. आणि चर्चेला तात्पुरता ब्रेक लागला.

दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करता करता अडीच ते तीन तास गेले. रात्रीचे आठ वाजले असतील. सर्वांचे लक्ष आता पोस्ट मॉर्टमच्या प्राथमिक अहवालाकडे लागले होते. खऱ्या अर्थाने आता नक्कीच काहीतरी धागादोरा हाती लागणार, याची  सर्वांनाच खात्री पटली होती.

पण असे असले तरीही केस थोडी गुंतागुंतीचीच होती. हा तिढा इतक्यात काही सुटणारा वाटत नव्हता. कारण अजूनही ते दोन्ही मृतदेह बेवारस म्हणूनच पडून होते शवागृहात.

तिकडे पोलिसांच्या दुसऱ्या टीमने मात्र वर्तमानपत्रात देण्यासाठी बातमी रेडी केली होती. स्थानिक पत्रकारांशी संवाद साधून त्यांच्या ताब्यात ती बातमी देण्याआधी पवारांनी बातमीचा मसुदा सारंग सरांना पाठविला.

त्यांचा "डन.." असा रिप्लाय येताच महत्त्वाच्या वर्तमान पत्रात ती बातमी छापून आणण्यासाठी पत्रकारांच्या ताब्यात देण्यात आली.

दुसऱ्या दिवशी संपूर्ण शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरणार होती. त्यातून तरी त्या दोन्ही मृतदेहांची खरी ओळख पटेल अशी आशा होती. रात्रीचे आठ नऊ होत आले होते तरी अजूनही शहरातील एकाही पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंट दाखल झाली नाही, याचेच नवल वाटत होते सर्वांना.

इकडे दवाखान्यात पोस्ट मॉर्टमचा प्राथमिक रिपोर्ट समोर आला आणि सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.

क्रमशः

काय असेल त्या प्राथमिक अहवालात? ही केस आता कोणते नवीन वळण घेणार? अखेर कसा आणि केव्हा सुटेल हा तिढा?जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.