लेडी कॉन्स्टेबल धोत्रे यांनी क्षणाचाही विलंब न लावता सारंग सरांना फोन करून हाती आलेली इत्यंभूत माहिती कथन केली.
"ओके, मी पंधरा ते वीस मिनिटात पोहोचतो पोलिस स्टेशनला." म्हणत सरांनी घाईतच मग फोन ठेवला. बायकोने समोर धरलेला चहाचा कपही बाजूला सारत सरांनी अवघ्या पाच मिनिटात अंगावर युनिफॉर्म चढवला.
"सॉरी ग अनु, पण मी खाईल बाहेर काहीतरी. तू काळजी करू नकोस आणि कुहू उठली की तिला माझ्या वतीने थोडे समजावून सांग हा."
"काय हे, रात्रीही किती उशीर केला तुम्ही. लेकरू वाट पाहून शेवटी झोपी गेलं आणि आता पुन्हा ती उठायच्या आत तुम्ही घराबाहेर पडताय."
"प्लीज ग, तू माझी समजूतदार बायको आहेस. म्हणून तर अशी मोठमोठी आव्हाने पेलण्याचे बळ निर्माण होते माझ्यात."
"आता नका मस्का मारू मला. पण चहा घ्या ना थोडा. मलाही तेवढेच बरे वाटेल."
शूज पायात चढवता चढवता सारंग सरांनी बायकोकडे पाहून एक हलकीशी गोड स्माईल दिली. बायकोचा आग्रह त्यांना काही मोडवेना. तिच्या समाधानासाठी त्यांनी घाईतच चहा घेतला आणि ते घराबाहेर पडले.
मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सर्वप्रथम शिवाजीनगरच्या कृषी महाविद्यालयात तात्काळ फोन लावला. बराच वेळ फोन वाजत होता पण पलीकडून काहीच रिप्लाय येईना. कदाचित एवढ्या सकाळी कॉलेजचे दैनंदिन कामकाज सुरू झाले नसावे. म्हणून सारंग सरांनी गुगलवरून कॉलेजच्या प्रिन्सिपलचा नंबर शोधून त्यावर फोन लावला.
दोन रिंगमधेच फोन उचलला गेला.
"हॅलो, मी पोलिस इन्स्पेक्टर सारंग देसाई, लोणावळा पोलीस स्टेशन मधून बोलतोय. आपण शिवाजीनगर ॲग्री कॉलेजचे प्राचार्य मिस्टर शैलेंद्र बनसोडे बोलत आहात का?"
"हो सर मी शैलेंद्र बनसोडे बोलतोय. काही काम होतं का सर?"
"ॲक्च्युअली सर, मला थोडी माहिती हवी होती."
"बोला ना सर. मी काय मदत करू शकतो तुमची?"
"सायली राजेंद्र सुर्वे ही तुमच्या कॉलेजची विद्यार्थिनी आहे का? एवढे फक्त जाणून घ्यायचे होते."
"सर कोणत्या वर्षात होती ती? हे समजले तर मी दोन मिनिटात सांगू शकतो तुम्हाला. काय आहे ना एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये प्रत्येक स्टुडंटचे नाव लक्षात ठेवणे कठीण असते ना."
"हो अगदीच समजू शकतो मी. सर ती मुलगी चौथ्या वर्षात शिकत आहे."
"दोनच मिनिट सर मी लगेच सांगतो तुम्हाला."
बनसोडे सरांनी मग लॅपटॉप मधून लगेचच फोर्थ इयरच्या स्टुडंट्सची लिस्ट ओपन केली. त्यात चेक केले असता, दुर्दैवाने त्यात "सायली राजेंद्र सुर्वे" हे नाव सापडले.
"हा हॅलो सर, सायली राजेंद्र सुर्वे ही आमच्याच कॉलेजची विद्यार्थिनी आहे. पण झालंय काय सर नेमकं?"
सारंग सरांनी मग काल घडलेला सर्व प्रकार बनसोडे सरांना सविस्तर सांगितला. त्यांनाही खूप मोठा धक्का बसला. कारण थोड्या वेळापूर्वीच त्यांनी पेपरमध्ये ही बातमी वाचली होती. पत्नीसोबत ते याच विषयावर चर्चा करत होते. पण ती मुले आपल्याच कॉलेजची असतील असे स्वप्नातही त्यांना वाटले नव्हते.
आता केस अजून पुढच्या टप्प्यात पोहोचली होती. तपासाला त्यामुळे खूप मोठी दिशा मिळाली होती. आता त्या मुलाचीही ओळख पटणार म्हणून सारंग सरांनाही थोडे हायसे वाटले. मुलगी ज्या कॉलेजमध्ये शिकत होती मुलगाही त्याच कॉलेजमध्ये शिकत असणार, याचे जास्त चांसेस होते.
पण बनसोडे सरांना मात्र खूपच टेन्शन आले होते. कारण त्यामुळे नाहक कॉलेजची बदनामी होणार. पोलिस तपासाला आता सामोरे जावे लागणार. त्यामुळे कॉलेजचे रेप्युटेशन खराब होण्याची दाट शक्यता होती. ग्रामीण भागातील खूप मुले मुली आपल्या कॉलेजमध्ये शिकायला येतात. या गोष्टीमुळे मात्र ॲडमिशनवर परिणाम होणार हे नक्की होते.
"सर आम्ही थोड्याच वेळात पुढील तपासासाठी कॉलेजमध्ये येत आहोत. प्लीज आम्हाला तुम्ही सहकार्य कराल अशी आशा करतो."
"हो नक्कीच सर पण आमच्या कॉलेजची जास्त बदनामी होणार नाही याची काळजी घ्या सर."
"आता सर त्यात आमचाही दोष नाही ना. नियमानुसार पुढील तपास तर करावाच लागणार आहे आम्हाला."
"ओके सर या तुम्ही."
"पुढच्या एक तासात पोहोचतो आम्ही." म्हणत सारंग सरांनी फोन ठेवला.
सर्व ऑफिसर आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पुढच्या अर्ध्या तासात सगळेचजण हजर झाले.
"बरं सचिन तुम्ही राऊत, कोळी ,जोशी आणि लेडी कॉन्स्टेबल चव्हाण यांना घेऊन कालच्या घटनास्थळी जा आणि परवा रात्रीचा त्या एरियातील सर्व मोबाईलचा डंप डेटा मिळवा." सारंग सरांनी पी.एस.आय सचिन निघोट यांच्यावर ही महत्त्वपूर्ण कामगिरी सोपवली.
"बरं कांबळे आणि धोत्रे मला समजतंय तुमची काल नाईट ड्युटी होती. पण आज सुट्टी नका घेऊ कारण तुमची गरज पडणार आहे. तुम्ही दोघी, हवालदार शिंदे, पाटील मॅडम आणि पवार तुम्ही माझ्यासोबत येताय."
"आज जर कोणाच्या सुट्ट्या असतील तर प्लीज कॅन्सल करायला सांगा आणि त्यांनाही ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश द्या. कारण सगळ्यांनाच बाहेर जाऊन नाही चालणार."
" हो सर, आज ए.पी.आय भुजबळ सर पण हजर होतील ड्युटीवर. आजच त्यांची सुट्टी संपली आहे. आणि बाकीचे पाच सहा कर्मचारी इथले कामकाज पाहतील." शिंदेंनी लगेचच माहिती दिली.
सर्व नियोजन मार्गी लावून पोलिस स्टेशनच्या दोन गाड्या दोन दिशेला रवाना झाल्या.
क्रमशः
गुंतागुंतीचा हा तिढा आता हळूहळू सुटत चालला होता. पण अजूनही त्या मुलाची ओळख काही पटलेली नव्हती. तो मुलगाही त्याच कॉलेजचा विद्यार्थी होता का? या सर्व घटनेमागे नेमकी कोणाचा हात असेल? जाणून घेण्यासाठी वाचा "तिढा.. गूढ मृत्यूचे."
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा