Login

तिढा.. गूढ मृत्यूचे (भाग ८)

रहस्य मृत्यूचे.


मागील भागात आपण पाहिले की, मृत मुलीची अखेर ओळख पटली. पुण्यातील नामांकित कृषी महाविद्यालयाची ती विद्यार्थीनी होती. पण अजूनही मुलाची ओळख काही पटलेली नव्हती. आता पाहुयात पुढे.

पुढील तपासासाठी पोलिसांची एक टीम पुण्यात तर दुसरी टीम कालच्या घटनास्थळी पोहोचली.

हा हा करता बातमी आता शहरभर पसरली होती. कॉलेजमध्ये देखील सर्वांनाच आता या गोष्टीची कुणकुण लागली होती.

पी.आय.सारंग देसाई आणि पी.एस.आय. पाटील मॅडम दोघेही सर्वात आधी कॉलेजचे प्राचार्य शैलेंद्र बनसोडे याच्या केबिनमध्ये गेले. अचानक पोलिसांना कॉलेजमध्ये पाहून सर्वचजण हादरले.

सारंग सरांनी सायलीच्या जवळच्या मैत्रिणींशी बोलण्याची परवानगी बनसोडे सरांकडे मागितली.

त्यांनीही लगेचच होकार दिला. तिच्याशी अत्यंत क्लोज असणाऱ्या पूर्वा आंधळे आणि साक्षी मंडलिक या दोन्ही विद्यार्थिनींना प्राचार्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले. दोघीही खूपच घाबरल्या होत्या.

पाटील मॅडमने सर्वात आधी दोघींनाही धीर दिला. त्यानंतर पुढील तपास सुरू झाला.

"पूर्वा आणि साक्षी, तुमचे गाव कोणते ग? म्हणजे इथल्याच आहात तुम्ही की बाहेरगावाहून आलात पुण्यात शिकायला?"

"मॅडम मी शिरुरची" साक्षीने घाबरतच उत्तर दिले.

"आणि मॅडम मी नगर पारनेरची." पाठोपाठ पूर्वाही भीत भीतच उत्तरली.

"अच्छा! बरं पूर्वा आणि साक्षी मला एक सांगा, तुम्ही दोघीही सायलीच्या अत्यंत जवळच्या मैत्रिणी आहात. मग तुम्ही राहायला देखील एकाच रूममध्ये असाल ना?"

"हो मॅडम," घाबरतच साक्षीने उत्तर दिले.

"ओके गुड, बरं मला एक सांगा मुलींनो तुम्हाला हेही माहिती असेल ना की, शनिवारी सायली कुठे आणि कुणासोबत गेली ते?"  मधेच सारंग सरांनी प्रश्न केला.

"सर तिने तर आम्हाला ती गावी जात असल्याचे सांगितले होते. कारण शुक्रवारी तिच्या आईचा फोन आला होता आणि गावी येण्यासाठी आई खूप आग्रह करत आहे. असे सांगून ती सकाळी  साडे अकराला कॉलेज सुटल्यानंतर लगेचच निघून गेली. त्यानंतर तिचा आणि आमचा काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही."

"बरं आता आणखी एक खूप महत्त्वाचा प्रश्न, सायलीचा कुणी बॉयफ्रेंड होता का?"

हा प्रश्न कानी पडताच पूर्वा आणि साक्षीने घाबरतच एकमेकींकडे पाहिले.

"बॉयफ्रेंड! असं काही नाही सर, पण आमच्याच क्लासमधील पार्थ ब्रम्हे याच्यासोबत छान मैत्री होती तिची. पण त्यांची मैत्री प्रेमात वगैरे बदलली की काय? हे नाही माहीत आम्हाला. दोघांमध्ये काहीतरी असेल असेही नेहमी वाटायचे पण.

"ओके, पण मग आज आला आहे का पार्थ कॉलेजला?"

"नाही सर." दोघीही मैत्रिणी एकाच सुरात बोलल्या.

आता, तो पार्थच आहे, याची पोलिसांच्या टीमला पूर्णपणे खात्री पटली होती. पण तरीही इतक्यात मनसुबे बांधण्यात काहीच अर्थ नव्हता.

"बरं आता मला सांगा, हाच आहे का पार्थ?"
कालच्या मृतदेहांचे मोबाईलमधील फोटो सारंग सरांनी त्या दोघींसमोर ठेवले.

फोटो पाहताच दोन्हीही मुली खूपच घाबरल्या. कारण हे असे काही घडले असेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता त्यांनी.

"हो सर, हा पार्थच आहे आणि ही सायली."

अखेर दोन्ही मृतदेहांचे गूढ उलगडले.

"बरं, तुम्ही आता गेलात तरी चालेल. पण वेळ पडली तर पुन्हा तुमची गरज पडेल तेव्हा बोलावल्यावर लगेच या?"

"हो सर" म्हणत दोन्हीही मुली मग त्यांच्या क्लासमध्ये निघून गेल्या.

"बरं सर ह्या पार्थ ब्रम्हेची माहिती मिळेल का?"

"हो सर नक्कीच."

बनसोडे सरांनी लगेच लॅपटॉप मधून सर्व मुलांची यादी काढली. त्यातून पार्थचे सर्व डिटेल्स शोधून सारंग सरांसमोर ठेवले त्यांनी.

"पार्थ संदीप ब्रम्हे. पत्ता-नगर मनमाड हायवे, निअर ऑल इंडिया रेडिओ सेंटर, सावेडी, अहमदनगर."

त्यावर असलेला पार्थचा फोटो पाहून सारंग सरांना त्याचा तो लटकलेला मृतदेह लगेचच डोळ्यांसमोर उभा राहिला.

अखेर अथक परिश्रमानंतर दोन्हीही मृतदेहांची ओळख पटली.

पाटील मॅडम तोपर्यंत तुम्ही सायलीच्या घरच्यांना फोन करून बोलावून घ्या, मी पार्थच्या घरी फोन करतो.

सारंग सरांनी क्षणाचाही वेळ न दवडता पार्थच्या वडिलांना फोन लावला.

"हॅलो, संदीप ब्रम्हे बोलत आहात का?"

"हो बोलतोय, आपण?"

"मी पोलीस इन्स्पेक्टर सारंग देसाई फ्रॉम लोणावळा पोलीस स्टेशन पुणे."

"काय झालं सर? कशासाठी फोन केलात आपण?"

"हे पहा मी जे काही सांगतोय ते एकदम शांतपणे ऐकून घ्या.
पार्थ तुमचाच मुलगा ना?"

"हो सर. पण त्याने काय केलं? आणि मुळात तो लोणावळ्याला नाही, तो तर पुण्यात शिवाजीनगरच्या ॲग्री कॉलेजमध्ये शिकतो."

"हो, माहित आहे मला. पण काल सकाळी त्याचा मृतदेह लोणावळ्याजवळच्या डोंगर भागात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे."

सारंग सरांनी मोठ्या हिमतीने सत्य कथन केले. दुसरा पर्यायच नव्हता त्यांच्याकडे.आता लपवालपवी करण्यात काहीही अर्थ नव्हता. कारण आता उशीर करून अजिबात चालणार नव्हते.

"काय??? नाही सर हे शक्यच नाही. तो माझ्या परवानगी शिवाय कुठेही जात नाही. त्यात तो आत्महत्या कधीही करणार नाही. त्याची मोठी मोठी स्वप्न होती सर. नक्की तो पार्थच आहे हे खात्रीने कसे काय सांगू शकता तुम्ही?" पार्थचे वडील धक्कादायक स्वरात विचारणा करत होते. पण अजूनही त्यांचा विश्र्वास बसत नव्हता या गोष्टीवर.

"हे पहा तुम्ही शक्य तितक्या लवकर लोणावळा पोलीस स्टेशनला या. आल्यावर आपण बोलू सविस्तर."

इकडे पाटील मॅडमनेही सायलीच्या घरी फोन करून त्यांनाही तिच्या मृत्यूची बातमी दिली आणि तिच्या घरच्यांनाही बोलावून घेतले.

क्रमशः

काय अवस्था झाली असेल दोन्ही मुलांच्या घरच्यांची? कसा पचवू शकतील ते आपल्या तरुण मुलांच्या मृत्युचा हा एवढा मोठा धक्का? जाणून घ्या पुढील भागात.