सायलीसोबत जे काही घडले ते डॉक्टरांनी तिच्या नातेवाईकांना समजावून सांगितले आणि तिचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देवून टाकला. सर्व हकीकत ऐकून नातेवाईकांचा मात्र संताप झाला होता.
"आमच्या मुलीला न्याय मिळायलाच हवा" म्हणत नातेवाईकांनी पोलिसांवर रोष दर्शवला. लवकरात लवकर आरोपी गजाआड झालाच पाहिजे. अशी मागणी सायलीच्या घरच्यांनी केली.
पोलिस इन्स्पेक्टर सारंग देसाई यांनीदेखील त्यांना खात्री दिली,
"जोपर्यंत आरोपी आमच्या हाती लागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. काळजी करू नका तुम्ही."
"जोपर्यंत आरोपी आमच्या हाती लागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. काळजी करू नका तुम्ही."
सायलीचे वडील मात्र लेकीला अखेरचे न्याहाळत होते. डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूधाराही आता आटल्या होत्या जणू. अजून काही तासांनंतर हा चेहराही पुन्हा दृष्टीस पडणार नव्हता त्यांच्या. म्हणून मग लेकीला एकटक नजरेच्या कप्प्यात साठवत होते ते. सायलीची पूर्ण बॉडी सफेद कपड्यात गुंडाळलेली होती. चेहराच काय तो उघडा होता फक्त. पण खूप वेळ झाल्यामुळे तोही आता नीटसा ओळखू येत नव्हता.
थोड्याच वेळात अँम्ब्यूलंसमधून सायलीचा मृतदेह तिच्या गावी रवाना करण्यात आला. सोबत हवालदार शिंदे आणि पोलीस नाईक कोळी हेदेखील होते. केस थोडी क्रिटिकल असल्या कारणाने नियमानुसार सायलीचा अंत्यविधी पूर्ण होईपर्यंत पोलिसांना तिथे हजर राहणे बंधनकारक होते.
काही वेळातच पार्थच्या घरचेही पोहोचले लोणावळा सरकारी दवाखान्यात. पार्थच्या आईचे तर अगोदरच रडून रडून बेहाल झाले होते. आता प्रत्यक्षात मुलाचा मृतदेह पाहून काय होईल त्या माऊलीचे? नुसत्या विचारानेच सर्वांच्या अंगावर शहारे उमटले.
त्यात पार्थ हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. लहानपणापासून नगर शहरात तो वाढलेला. त्याचे संपूर्ण बालपण शहरी भागात गेले होते. ग्रामीण भागाशी जास्त संबंध कधी आलाच नाही त्याचा. पण गावची, गावच्या मातीची प्रचंड ओढ होती त्याला.
पार्थचे वडील नगरमधील नामांकित कॉलेजात प्रोफेसर होते. मुलाने डॉक्टर व्हावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. पण पार्थची आवड वेगळीच होती. वडिलांचा आग्रह मोडून त्याने ॲग्रीला जाण्याचे फायनल केले. त्याच्या या विचाराने वडील नाराज झाले खरे, पण "माझ्यावर विश्वास ठेवा बाबा, मी जे काही करेल ते मनापासून असेल.तुम्ही काळजी करू नका," म्हणत त्याने वडिलांची मनधरणी केली आणि अखेर पुण्यात ॲग्रीसाठी ॲडमिशन घेतले.
परंतु, आज त्याच्यासोबत जे काही घडले ते खूपच धक्कादायक होते. थोडयाच वेळात पार्थचे नातेवाईक तिथे हजर झाले.
त्यांनादेखील डॉक्टरांनी त्यांच्या मुलासोबत नेमके काय घडले? याचा वृत्तांत कथन केला. सुरुवातीला तर त्यांना खूप मोठा धक्का बसला. कारण "एका मुलीसोबत आपला मुलगा फिरायला गेला असता हा सर्व प्रकार घडलेला आहे."
पार्थचे वडील थोडे कडक शिस्तीचे होते. "काय गरज होती तुला असे करण्याची? वेळोवेळी सगळ्या गोष्टी समजावून सांगत होतो तुला मी. पण तू कधीच माझे काही ऐकले नाही. बापाचे जर ऐकले असते तर आज ही वेळ आली नसती."रडता रडता त्याचे वडील बोलत होते.
सगळेजण त्यांना समजावून सांगत होते. कारण आता मुलगा तर जिवानिशी गेला होता. आता बोलून काहीच उपयोग नव्हता. बापाच्या डोळ्यांतील अश्रू थांबायचे काही नावच घेईनात.
"अहो, काय करायचे आपण आता? कोणासाठी जगायचे? मी नाही राहू शकत माझ्या पार्थशिवाय." आईने एकच टाहो फोडला.
आज लोणावळा सरकारी दवाखान्याचा परिसर रडणे, आरडाओरडा, किंकाळ्या यांनी हादरवून सोडला होता.
आजूबाजूला लोकांची एकच कुजबूज सुरू होती. "आजकालची मुले किती अविचाराने वागतात. आई वडील विश्वासाने त्यांना बाहेर शिकायला पाठवतात. त्याबदल्यात त्यांनी असे त्यांचे पांग फेडावेत? आता कसा पचवायचा हा एवढा मोठा धक्का त्यांनी?"
लोकही घडलेल्या प्रकारावर खूपच हळहळ व्यक्त करत होते.
लोकही घडलेल्या प्रकारावर खूपच हळहळ व्यक्त करत होते.
डॉक्टरांनी सर्व प्रोसिजर पूर्ण करून पार्थचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात सोपवला.
राऊत आणि जोशी या पोलिस कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली पार्थचा मृतदेह ॲम्ब्यूलंसमधून नगरच्या दिशेने रवाना झाला.
अत्यंत शोकाकुल परिस्थितीत सायली आणि पार्थ दोघांच्याही मृतदेहावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोन्ही घटना इतक्या हृदयद्रावक होत्या की, त्यातून सावरणे सायली आणि पार्थच्या घरच्यांना इतक्यात तरी शक्य नव्हते.
संपूर्ण शहर या घटनेने हादरले होते. बाहेरगावी शिकायला असलेल्या मुलांच्या आई वडिलांच्या काळजात मात्र धस्स झाले होते ही बातमी ऐकून. आणि का होऊ नये? होऊ नये ते होऊन बसले की मग मन नकारात्मकतेच्या गर्तेत धावायला लागतेच.
पोलिसांसमोर मात्र आता खूप मोठे आव्हान होते. मुख्य आरोपी अजूनही मोकाट फिरत होता.
सारंग सरांची टीम मात्र कसून तपास करत होती. अगदी बारीक सारीक गोष्टी बारकाईने तपासल्या जात होत्या. एकदा का डंप डेटा आणि फॉरेन्सिक रिपोर्ट हाती आले की मग तपासाला वेग येणार होता.
क्रमशः
पोलिसांची टीम पोहोचेल का मुख्य आरोपीपर्यंत? जाणून घेण्यासाठी वाचत रहा "तिढा..गूढ मृत्यूचे."
©®कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा