Login

तिढा.. गूढ मृत्यूचे (भाग १५)

रहस्य मृत्यूचे.


मागील भागात आपण पाहिले की, या केसमधील मुख्य संशयित असलेल्या सिद्धराम आणि कृष्णप्पाला पोलिसांनी अटक केली. सिद्धरामने नाही पण कृष्णप्पाने मात्र तोंड उघडले आणि बऱ्याच गोष्टी समोर आल्या. आता पाहुयात पुढे.

कृष्णप्पा जरी त्या व्यक्तीचे नाव सांगत नसला तरी ती व्यक्ती म्हणजे या केसमधील तिसरा संशयितच असणार, याची सारंग सरांना आता खात्री पटली.

हाती आलेल्या माहितीवरून सारंग सरांनी त्या तिसऱ्या संशयिताला पकडण्यासाठी देहू पोलीस स्टेशनची मदत घेतली. कारण तिसरा संशयित हा देहू गावातीलच होता. ऑलरेडी पोलिसांची एक टीम कर्नाटकला गेली असल्याने आता पुन्हा दुसरी टीम लगेचच देहूला पाठवणे शक्य नव्हते. त्यात सिद्धराम आणि कृष्णप्पाची देखील चौकशी सुरु होती.

सारंग सरांनी लगेचच देहू पोलीस स्टेशनचे इन्चार्ज कांबळे साहेब यांना फोन करून सर्व माहिती दिली.

क्षणाचाही विलंब न लावता त्यांनीही लगेचच एक ऑफिसर आणि दोन कर्मचाऱ्यांना दिलेल्या पत्त्यावर पाठवले.

घटनेतील तिसरा संशयित "नीरज पटेल" याच्या घरी तात्काळ पोलीस पोहोचले. योगायोगाने तो घरीच असल्याने लगेचच त्याला ताब्यात घेण्यात आले.

देहू पोलीस स्टेशनच्या गाडीतून त्याला तात्काळ लोणावळा पोलीस स्टेशनला रवाना करण्यात आले.

आता हा सर्व तिढा हळूहळू सुटण्याच्या मार्गावर होता. कारण ह्या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार नीरज पटेलच असणार, याची पोलिसांना खात्री पटली.

थोड्याच वेळात देहू पोलीस स्टेशनच्या लोकांनी नीरज पटेल याला लोणावळा पोलिस स्टेशनच्या ताब्यात सुपूर्त केले.

सारंग सरांनी कांबळे साहेबांना फोन करून त्यांचे आभार मानले आणि नीरजला घेवून आलेल्या कर्मचार्यांचा मनापासून पाहुणचार केला आणि त्यांचेही आभार मानले.

पंचवीस वर्षीय नीरज पटेल याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली.

"कृष्णप्पा आणि सिध्दराम याला कसे ओळखतोस?" असे विचारताच त्यानेही खरे खरे सांगितले.
सुरुवातीला तर तो काही बोलायलाच तयार नव्हता. परंतु पोलिसांनी बळाचा वापर करून अखेर त्याला बोलते केलेच.

"ते दोघेही शिवाजीनगर येथील आमच्या कापड दुकानात गेल्या दोन वर्षांपासून कामाला आहेत."

आता हळूहळू पोलिसांना लिंक लागत होती. सिद्धराम आणि कृष्णप्पा ज्या कापड दुकानात काम करत होते त्या दुकानाच्या मालकाचा नीरज हा मुलगा होता.

"सायली सुर्वे आणि पार्थ ब्रम्हे यांना कसे ओळखतोस? त्यांचा आणि तुझा काय संबंध?" सारंग सरांनी पुढचा प्रश्न केला.

"साहेब माझा आणि त्यांचा काहीच सबंध नाही."

"मग त्या या दोघांना त्यांच्यावर पाळत ठेवायला सांगण्याचे कारण काय? कोणाच्या सांगण्यावरून केलंस हे सगळं?"

आता मात्र नीरज काहीच बोलायला तयार नव्हता. पण पोलिसांनाही चांगलेच माहीत होते त्याला कसे बोलते करायचे ते.

काही वेळातच तो पोपटासारखा बोलायला लागला.

"साहेब, पार्थ हा माझा मित्र वेदांतचा रुममेट आणि क्लासमेट होता. वेदांतला सायली मनापासून आवडायची. पण सायलीचे मात्र पार्थवर प्रेम होते. बऱ्याचदा वेदांत मला फोन करून त्यांच्या बद्दल सांगायचा. सायली पार्थला लाईन देत होती पण वेदांतला मात्र खूपच ॲटीट्युड दाखवायची. त्याच्याशी कधीच सरळ बोलायची नाही. वेदांतला मात्र या गोष्टीचा खूपच त्रास व्हायचा. तो फोनवरून मला सर्व सांगायचा आणि बऱ्याचदा तो या गोष्टीवरून रडलादेखील आहे माझ्याजवळ."

आता सारंग सरांच्या सर्व प्रकरण लक्षात येत होते. कॉलेजमध्ये पार्थच्या दोन मित्रांना त्यांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्यातील एक वेदांत होता.

"आणि म्हणून तुझे मित्र प्रेम इतके उफाळून आले की शेवटी तू सायली आणि पार्थचा जीव घेतलास? कोणी दिला तुला हा अधिकार? बरं तू फक्त तिला फक्त मारलेच नाहीस तर तिच्यावर रेप करून त्या दोघांनाही मारून टाकलेस."

"नाही सर, मी नाही केले हे सर्व."

"नाही का, बरं राहू दे. पण मला एक सांग वेदांतची आणि तुझी मैत्री केव्हापासूनची आहे? म्हणजे तुम्ही एकमेकांना कसे ओळखता?"जरा खोचकपणे बोलतच सारंग सरांनी पुढचा प्रश्न केला.

"सर त्याच्या वडिलांचा सुद्धा कापड व्यवसाय आहे. त्यांचे वडील माझ्या वडिलांचे खूप जवळचे मित्र आहेत. बिझनेस निमित्ताने त्यांच्या नेहमी गाठीभेटी होत असतात. पहिल्यापासून वेदांत त्याच्या वडिलांसोबत आमच्या घरी आणि दुकानात यायचा. त्यामुळे आमच्यातदेखील घट्ट मैत्री झाली."

"आणि हि मैत्री इतकी घट्ट होती की मित्राला समजवायचे सोडून त्याला चुकीच्या गोष्टीत साथ दिलीस तू. ती मुलगी त्याची होऊ शकत नाही तर मग दुसऱ्या कोणाचीच नाही. आणि म्हणूनच तू तिला मारून टाकलेस."

"नाही साहेब हे सर्व सिद्धराम आणि कृष्णप्पाने मिळून केले आहे. मी फक्त त्यांना धमकवायला सांगितले होते त्या दोघांना. पण का कोण जाणे, मुलगी पाहून त्यांची मती फिरली आणि त्यांच्याकडून हे असे वाईट कृत्य घडले."

सुरुवातीला तर नीरज काहीच बोलायला तयार नव्हता. परंतु पोलिसांनी बळाचा वापर करून अखेर त्याला बोलते केलेच.

"म्हणजे तुझे म्हणणे आहे की, खून आणि रेप यांच्याशी तुझा काहीच संबंध नाही."

"हो साहेब. अगदी खरं आहे हे."

"याचा अर्थ सिद्धराम आणि कृष्णप्पाने त्या दोघांनाही मारहाण केली. त्या मुलीवर रेप केला, त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केली. आणि एवढेच नाही तर मेल्यानंतर त्यांना दूर जंगलात नेऊन फासावर देखील लटकवले. जेणेकरून ही हत्या नसून आत्महत्या आहे, असे वाटावे. आणि हे सगळे सुरू असताना तू बाजूला उभा राहून फक्त मजा पाहत होतास?" सारंग सरांनी नीरजला आता शब्दांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकवले होते.

"नाही साहेब, मला तर यातील काहीच माहिती नाही. आणि त्या दिवशी मी घरीच होतो. सिद्धरामने फोन करून त्यांच्या हातून हे असे सर्व घडल्याचे सांगितले."

नीरजचा खोटारडेपणा आता सारंग सरांना कळून चुकला होता. त्या रात्री तो त्याच एरियात होता. अजूनही तो पोलिसांची दिशाभूल करण्याचाच प्रयत्न करत होता.

क्रमशः

खरंच या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार कोण? कोणी केला असेल सायलीवर रेप आणि त्यानंतर दोघांची हत्या? जाणून घ्या पुढील भागात.