संसार नावाच्या जंगलातील वाघीण! (लव विथ ऑल अरेंज्ड) भाग -१
"रिवा हा तुझा २५वा वाढदिवस. आता मी तुझं काहीच ऐकणार नाही. तुला मी म्हणेल त्या मुलाशी लग्न करावे लागेल." रिवाचं आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून तिची आई तिच्यावर चांगली चिडली, "अगं ए बापाची वाघीण तुझ्याशी बोलतेय मी."
"हो गं ऐकलं मी आई. तु म्हणशील त्याच मुलाशी लग्न करेल मी. येते क्लिनीकला जाऊन." काहीशा बेफीक्रीनेच रिवा म्हणाली अन् गाडीला किक मारून रवाना झाली.
"कसा सांभाळेल ही संसार? काहीच गंभीरतेने घेत नाही." रिवाची आई तिच्या बाबाला म्हणाली.
"मला विश्वास आहे ऊत्तम संसार करेल माझी वाघीण!" बाबा म्हणाले.
"घ्या! लोकं लाडाने पोरीला पिलू , कोकरू, पाखरू, प्रिन्सेस, परी म्हणतात, अन् एक तुम्ही, वाघीण बोलता." आई चिडली.
"आहेच ती वाघीण. पोरं तिच्याशी बोलायला सुद्धा भितात बरं." रिवाचे बाबा अभिमानाने म्हणाले.
"हेच म्हणते मी अशा पोरीसोबत कोण लग्न करणार? शोधा एखादा वाघ लवकर." आई मात्र आणखी चिडून त्यांच्या खोलीत निघून गेली.
रिवाच्या घरी हा संवाद रोजचाच. मात्र रिवा कधीच मनावर घेत नसे. पण तिच्या आईनेही यंदा कर्तव्य ऊरकायचा निश्चय केला. रिवाला आवडतील अशा पोरांची यादी बनवून संध्याकाळी रिवाच्या हातात १० फोटोसह ती मुलांच्या बायोडाटाची यादी दिली. रिवा तिच्या आईबाबांचे एकुलते एक अपत्य. गव्हाळ वर्ण असला तरी नाक नक्श उठावदार होते, लांबसड़क केस आणि सडसड़ित बांधा. पंचवीसची झाली तरी अठरा विस वर्षाचिच वाटनार. लाडात वाढलेली, पण संस्कारीत. मुलीची जात म्हणून कोणी वाईट नजर टाकू नये यासाठी बाबांनी तिला कराटे व बॉक्सिंगचे ट्रेनिंग दिले. एकदा कॉलेज समोरील काही रोडरोमिओंना तिने चांगलं सुतलं, तेव्हापासून ती काॅलेजमधेही वाघीण म्हणून प्रसिद्ध झाली.
रिवाने सायकोलाॅजीमधे 'एम ए' पुर्ण केलं. त्यातच तिला पुढे 'पी एच डी' करायची होती. मार्गदर्शन मिळावे म्हणून ती एका सायकोलाॅजीस्टकडे ट्रेनी म्हणून काम करु लागली. रिवाला तिच्यासारखाच मनमिळाऊ, स्वावलंबी, तिला समजून घेइल व तिच्या आईबाबांना आपलं समजणार असा लाईफ पार्टनर हवा होता.
आईने दिलेले फोटो व बायोडाटाचे काय करू या अविर्भावात तिने तिच्या बाबांकडे पाहीलं. त्यांनी नजरेनेच पाहा फोटो नाहीतर काही खरं नाही आपलं असा इशारा केला. नाइलाजाने पाहीलेल्या फोटोंमधील माधवचं निर्मळ हास्य स्मित तिला भावलं. माधव पुण्याला एका मल्टी नॅशनल कंपनीत सॉफ्टवेयर इंजीनीयर, ४५ हजार पगार, आई, वडील, एक लहान बारावीला असलेली बहिन, एक मोठा भाऊ, भावाचे लग्न झालेले व त्याला एक वर्षाची मुलगी. नाशिक जवळ एका खेड्यात त्यांचं वडिलोपार्जित घर व शेती, भाऊ व बाबा शेती पाहत.
रिवाने आईच्या हातात त्याचा फोटो दिला आणि म्हणाली एकदा भेटून मग नक्की काय ते सांगते. पण आई ती आई, तिला रिवाला कोणीतरी आवडले लग्नासाठी, यातच आनंद झाला. तिने जराही वेळ न दवडता मुलाच्या घरच्यांना ही बातमी दिली. मुलगी पाहण्याचा म्हणा की त्यांची भेट करायचा कार्यक्रम अकोल्याला, रिवाच्या घरीच झाला. दोघांना बोलण्यासाठी माळीवर बसवले गेले.
दोघेही गप्पच होते पाच दहा मिनिट. मग काहीतरी बोलायला हवे म्हणून माधवने सुरवात केली.
माधव: तु खूप सुंदर दिसत आहेस.
रिवा: मला माहीत आहे.
माधव: हो तु तर मनाची डाॅक्टर आहेस, तुला सर्वच माहीत असेल.
रिवा: नाही, काही आहे जे मला विचारायचे आहे.
माधव: विचारा मग.
रिवा : स्वयंपाक बनवता येतो का ?
(माधव गप्प होता. कनफ्यूज होता काय उत्तर देऊ म्हणून. हो म्हटल आणि ह्या बाबाच्या वाघिनीने आपल्यालाच स्वयंपाकिन बनवून टाकले म्हणजे.)
रिवा: मी सहज विचारत आहे. कारण माझ्या नवऱ्याला खिचडी आणि चहा तरी बनवता यायला हवा. त्याने भाजी बनवली नाही चालेल पण पालेभाज्या तोडून द्यायला हव्या. कधीतरी मलाही सुट्टी हवी किचनमधून, मीही घरीच बनवलेले गरम गरम जेवण जेवावे.
माधव: बरं बरं, मला येतो सर्व स्वयंपाक. पण मिही कंटाळलो आता स्वतःच्या हातचे खाऊन खाऊन.
रिवा: ठीक आहे समजले मी. तुम्ही भाजी कापून देत जा मी फोडणी देईल. तुम्ही कणिक मळून देत जा मी पोळ्या लाटेल.
माधव अनिमिष नजरेने तिला एकटक पाहू लागला.
"काय झालं?" रिवाने त्याला विचारलं.
"काही नाही, लग्नाला हो म्हणायची पद्धत छान आहे तुमची." माधव उत्तरला तसे दोघेही एकमेकांकड़े पाहून खूप हसले.
कावेरीताई चहा घेउन आली. तो घेऊन संवाद परत सुरू झाला.
कावेरीताई चहा घेउन आली. तो घेऊन संवाद परत सुरू झाला.
माधव: आणखी काही ?
रिवा: हो आहे ना. अत्यंत महत्वाचा प्रश्न....
माधव: ??????????
रिवा: तंबाखू, गूटखा, दारू, सिगरेट यापैकी काय घेता?
माधव: (हसतच) फक्त बियर घेतो, कधीतरी मित्रांसोबत. बाकी तु म्हणशील तर ट्राय करून बघू.
रिवा: काय? (हसतच तिने त्याच्या खांद्यावर जोरात चापट मारली.)
तोंड वासुन माधव उठून उभा झाला.
रिवा: साॅरी (रिवा कान पकडून म्हणाली.)
क्रमश :
©®अर्चना सोनाग्रे
धन्यवाद!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा