5
इकडून रिवाने गोड बातमी देण्यासाठी माधवला फोन केला तर तिलाच माधवने गोड बातमी दिली. त्याला हवी तशी नोकरी मिळाली. काही असाईनमेंटस् साठी त्याला कंपनीकडून सहा महीने लंडनला जावं लागणार. त्याने दोघांची जायची सर्व तयारी केली. मात्र रिवाला घर व गावासाठी बरंच काही करायची इच्छा होती. तसंच गर्भारपणात कोणीतरी जवळ हवं असतं. तिकडे परदेशात माधव आपल्या कामात गुंतल्यावर रिवा एकटी पडेल. त्यापेक्षा इथंच सर्वांसोबत राहणे बरं. हे रिवाचं म्हणनं माधवला पटलं. अन् तो नवीन 'ए आय सॉफ्टवेअर' बनवण्यात खरंच खूप बिजी राहणार होता.
लंडनला जायच्या आधी माधवने काही दिवस घरी सर्वांसोबत घालवले. घर व गावात झालेला बदल पाहून माधव चकित झाला. रिवाचे आईबाबा त्यांना भेटायला आले. रिवाच्या पुढील योजना ऐकून माधव त्यांना गंमतीने म्हणाला,
"समाजसुधारणेचे डोहाळे लागले वाटतं बाबाच्या वाघीणबाईला." तसे सर्व हसु लागले.
"समाजसुधारणेचे डोहाळे लागले वाटतं बाबाच्या वाघीणबाईला." तसे सर्व हसु लागले.
रिवाने स्वतः गावविकासासाठी राबवण्यात येणाऱ्या सरकारी योजनांची माहिती काढली. या योजना अंमलात आणनाऱ्या संस्थांसोबत संपर्क साधला. सरपंचकडून विविध योजना (हागणदारीमुक्त गाव, प्रौढ शिक्षण, बि बियाणे माहिती शिबीर, स्वच्छता अभियान) राबवून घेतल्या. गावाचे नाव होऊ लागले. सरपंच खूश!
रिवाचा सातवा महीना सासरी मस्त साजरा करण्यात आला. जूळे असल्याने सातव्या महिन्यातच पोट नवव्या महिन्यासारखे मोठे दिसू लागले. आईने माहेरी न्यायचा आग्रह केला पण रिवा नववा महिना लागताच येईल म्हणाली. कारण जानेवारी महिना आला होता. फेब्रुवारी महिन्यात ननंदची बारावीची परिक्षा. त्याआधी एकदा तिचा सराव रिवाला घ्यायचा होता.
एका संध्याकाळी रिवाला खूपच बेचैन वाटू लागलं. जाऊ आणि जेठ एका नातेवाईकाकडे मरणावर गेलेली. मनीषा रिवाजवळ बसून अभ्यास करत होती. "आई ग....." रिवा कन्हू लागली. मनीषाने आईबाबांना बोलावलं. गावातील डाॅक्टर आज आली नव्हती. सासरे शहरात जाण्यासाठी ऑटो शोधत असतांना त्यांना सरपंच भेटले. सासर्यांकडून परिस्थिती कळताच ते स्वःताच शहरात डाॅक्टरकडे रिवाला घेऊन जाऊ म्हणाले. रिवाला प्रसव वेदना सुरू झाल्या. आठव्या महिन्यातील बाळ सहसा वाचत नाही. त्यामुळे सर्वांचे प्राण गळ्याशी आले. डाॅक्टरांनी रिवाला तपासले.
"थोडं लवकर आले असते तर ऑपरेशन करून सर्व सुखरूप झाले असते. पण आता परिस्थिती हाताबाहेर वाटत आहे. आम्ही बाळ किंवा आई, कोणा एकालाच वाचवु शकू असं दिसतेय."डाॅक्टरांनी सासू सासर्यांना सांगितलं आणि विचारलं,"तुम्हाला कोण हवं आहे? हा फॉर्म भरून द्या."
सासू सासरे पेचात पडले. त्यांनी कर्तबगार सुनेला निवडलं. बाळ होईलच परत आणि नाही झालं तर? मनीषाला स्वःताचा खूप राग आला, कारण तिच्या अभ्यासासाठीच रिवा गावात थांबली होती. ती धावतच दवाखान्यातील गणपतीच्या मुर्तिपुढे जाऊन, हात जोडून मृत्युंजय मंत्राचा जप करू लागली.
तिचा तो स्वर सर्वांना आरपार चिरत देवाला ऐकु गेला की डाॅक्टरांनी त्यांच्या प्रयत्नांची शर्यत लावली, की वाघिनीला तिच्या छाव्यांना जन्म द्यायची इच्छा प्रबळ होती, कोण जाणे. थोड्याच वेळात दोन्ही नवजात बालकांना घेऊन डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आले.
''रिवा ठीक आहे ना!'' सासुसासऱ्यानी चिंतातुर आवजात विचारले.
''हो, ती छान आहे आणि हे तुमचे नात, नातू सुद्धा! आज पहिल्यांदा सुनेसाठी इतके प्रेम पाहिले. धन्य तुमची सून.'' पाणावलेल्या डोळ्यांनी डॉक्टर बोलले.
''ती पोर आहेही तितकिच गुणाची! माझ्यासारख्या माणसाला रस्त्यावर आणले तिने.'' सरपंच स्मितहास्य करून म्हणाले. मग गणपतीपुढे डोळे मिटून, हात जोडून बसलेल्या मनीषाला बोलवायला गेले, "मनीषा, पोरी घे तुझ्या भाचा भाचीला.''
एव्हाना रिवाचे आईबाबाही दवाखाण्यात पोहोचले. तिच्या सासु सासऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे त्यांनाही कौतुक वाटले.
''बापरे 2-2 छावे. वाघिनीचे बाबा तुमचे काही खरे नाही.'' रिवाची आई वातावरणातील ताण कमी व्हावा म्हणून गमतीने म्हणाली. सर्व बाळांचे लाड़ करू लागले.
..............................................................
..............................................................
मनीषा बारावीत चांगल्या गुणांवर पास झाली. माधव प्रशिक्षण घेऊन भारतात परत आला व पुण्याला सेटल झाला. रिवा आणि दोन्ही मुलांना घेऊन पुण्याला निघाला तेव्हा सर्व गाव त्यांची पाठवनी करायला जमा झालं. त्यांचे उदासीन चेहरे पाहून रिवा त्यांना म्हणाली,
"अरे हे काय? मी चक्कर मारेलंच परत. काय आहे ना माझा PHD चा विषय, गावातील मानसिक आरोग्य! हा आहे. रिसर्चचा प्रस्ताव मंजुर होताच येईल मी."
"खरंच!" सर्व एकसुरात आनंदाने ओरडले.
तर इथे वाघीणीच्या आयुष्याचं एक नवीन पर्व सुरू झालं.
समाप्त:
आशा करते सर्व वाचकांना कथा आवडली असेल.
टिका टिपणींचे स्वागत.
समाप्त:
आशा करते सर्व वाचकांना कथा आवडली असेल.
टिका टिपणींचे स्वागत.
धन्यवाद!
©®अर्चना सोनाग्रे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा