Login

कानामागून आली आणी तिखट झाली - भाग -1

Tikhat Jhali
कानामागून आली आणि तिखट झाली


जलदलेखन स्पर्धा- नोव्हेंबर - 2025


एक शांत गाव – सायले, त्या गावातले एक कुटूंब - पाटील कुटुंब.


सगळ्यांना आदर्श वाटावं असं कुटुंब होतं ते. सगळी छान मिळून - मिसळून राहतं असतं.


मोठा मुलगा — संजय, सुशील, गावातला आदर असलेला.

त्याची बायको वैशाली – घरची मोठी सून, शिक्षिका, बोलण्यात गोड.

घरात तिचं म्हणणं म्हणजे नियमच. सासू-सासरे वृद्ध झालेले, सगळं घर तीचं चालवत होती.



दुसरा मुलगा — अमोल नुकताच नोकरीला लागला होता, आणि दोन वर्षांनी त्याचं लग्न झालं मीरासोबत.


शहरात वाढलेली, सुशिक्षित, पण थोडी मनाने मोकळी, मनातलं स्पष्ट बोलणारी.


लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच सगळे म्हणत होते,
“वैशालीसारखी जाऊ सापडणं नशिबाची गोष्ट आहे… पण ही नवी आलेली मीरा, बघू कशी आहे!”



सुरुवातीचे काही दिवस अगदी गोड गेले.

वैशालीने मीराला सगळं शिकवलं — “घरात कसं वागायचं, सासूबाईंना काय आवडतं, आणि पाटील कुटुंबातले रीती - रिवाज.”


मीराही आदराने ऐकत होती, पण तिचं मन मात्र थोडं अस्वस्थ असायचं,
“आपलं स्वतःचं मत इथं चालेल का?” कारण वैशालीच सगळं प्लॅनिंग करत असे.


पहिल्या सणाला मीरा उत्साहाने सगळं सजवून ठेवते. पण वैशाली म्हणते,

“बघ मीरा, असं नाही करत आम्ही. तुला अजून कळेल थोड्या दिवसात. घरात आमची पद्धत आहे.”
त्या वाक्याने मीराचं मन थोडं दुखावतं. ती हसते, पण आतून ती राग गिळते.


दिवस पुढे गेले.

मीरा घरात स्थिरावू लागली, आणि सासूबाईंना तिचं बोलणं, तिचं हसणं आवडू लागलं.

अमोल तर तिच्या खोड्यांनी अगदी आनंदात असायचा.
पण वैशालीला हळूहळू जाणवू लागलं —
“ही मुलगी माझ्या शब्दाच्या बाहेर जातेय!”


एक दिवस सासूबाई आजारी पडल्या.
वैशाली बाहेर मीटिंगला गेली होती.


मीरा लगेच सगळं सांभाळते — औषधं, जेवण, कपडे, डॉक्टरला फोन.

संध्याकाळी वैशाली परत आली, तर सासूबाई म्हणाल्या,
“मीरामुळे मी बरी झाले गं… किती छान काळजी घेतली बघ!”
ते ऐकून वैशालीच्या चेहऱ्यावर हसू आलं, पण डोळ्यांत जळजळ.


रात्री संजयने विचारलं,
“वैशू, मीरा छान सांभाळते सगळं, ना?”
ती फक्त एवढंच म्हणाली —
“हं, पण थोडं जास्त बोलते… सगळ्यांत नाक खुपसते.”



हळूहळू घरात दोन गट तयार झाले.

सासू आणि लहान सून मीरा एकीकडे,
तर मोठी सून वैशाली दुसरीकडे.

लहानसहान गोष्टींवर वाद व्हायचे.
फ्रिजमध्ये ठेवलेल्या मिठाईवरून, पूजा कधी करायची यावरून, अगदी सणाच्या साड्यांवरूनही.


एकदा गावात जत्रा होती. सगळे तयार झाले.
मीरा म्हणाली, “आपण एकसारख्या कलरच्या साड्या घेऊया, फोटो पण छान येतील ”
वैशालीने हसत उत्तर दिलं, “आम्ही लहानपणीच असे फोटो आहेत. आता एवढी लहान मुलगी नाही मी.”


मीराला त्या टोमण्याने चटका बसला.
तिने पर्स उचलली आणि आत गेली.
त्या दिवसानंतर दोघींचं बोलणं कमी झालं.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- हे नातं पुढे जाऊन सुधारतं की अजून दुरावतं)


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
0

🎭 Series Post

View all