Login

कानामागून आली आणी तिखट झाली - भाग -2

Tikhat Jhali
कानामागून आली आणि तिखट झाली - भाग -2



महिने गेले.
घरात वातावरण ताणलेलं.

अमोल आणि संजयही त्रासले.
“तुमच्या दोघींच्या गोष्टींनी घरात शांतता संपलीये,” अमोल म्हणायचा.


पण एक दिवस असं काही घडलं, की सगळं बदलून गेलं.


सासूबाईंना अचानक हार्ट अटॅक आला.

वैशाली घरात होती, पण घाबरून काय करावं हे सुचत नव्हतं.

तेवढ्यात मीरा पळत आली, तिने सासूबाईंचा हात धरला, औषध दिलं, आणि रुग्णवाहिका बोलावली.



वैशालीचा हात थरथरत होता, डोळ्यात पाणी.
हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणाले,
“तुम्ही वेळेत आणलं म्हणूनच त्या वाचल्या.”


वैशाली त्या रात्री सगळं विचार करत बसली.
“मी तिला सतत लहान समजत गेले… पण आज मीराने लगबगिने सगळं सांभाळून घेतलं.


रुग्णालयातून परतल्यानंतर सगळ्यांचं आयुष्य जणू बदलून गेलं होतं.

सासूबाई अजूनही बऱ्या होत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत हसू होतं.
त्या मीराकडे पाहत म्हणाल्या,
“बाळा, तू नसतीस तर मी आज जिवंत नसते.
आता हे घर तुझ्याच हातात सुरक्षित आहे.”


त्या दिवसानंतर वैशाली बदलली.


तिच्या नजरेतून तो हुकूमशाही भाव नाहीसा झाला.
तिनं मीराला “मीरा बाई” म्हणणं बंद करून “मीरा” म्हणूनच बोलावायला सुरुवात केली.



दोघींच्या नात्यात जणू नवा प्रकाश आला.


पण नियतीला अजून एक परीक्षा घ्यायची होती...


एक दुपारी सगळे गावातल्या शाळेच्या कार्यक्रमाला गेले होते.

घरात फक्त सासूबाई आणि मीरा होत्या.
अचानक घरात विजेचा आवाज झाला — मीटरजवळ ठिणग्या उडाल्या, आणि काही क्षणात धुराचा वास.


सासूबाई घाबरल्या.

मीरा पळत गेली आणि पाणी फेकून आग विझवली.


तेवढ्यात वैशालीही कार्यक्रमावरून परत आली.
तिला मीरा जळलेल्या हाताने उभी दिसली.


“मीरा! तुझे हात!”
“काही नाही वहिनी … थोडं लागलंय… पण घर वाचलं! अनर्थ टळला.



वैशालीचं मन भरून आलं.
ती थेट मीराला मिठी मारते, आणि म्हणते-
“कानामागून आली म्हणत होते ना मी तुला… पण तूच या घराचा आधार निघालीस गं.” आज तू आईंसाठी साठी जीव तोडून धावलीसं ”.


मीरा हसली, पण हात जखमी असल्याने अश्रू ओघळले.
त्या दोघींचं आलिंगन जणू घराला नवा आशीर्वाद देत होतं.



दुसऱ्या दिवशी वैशालीने सकाळी सगळ्यांसमोर मीराचा हात धरला आणि म्हणाली,
“मीरा… तू खरं सोनं आहेस गं. मी तुला समजून घेतलंच नाही.


मीराच्या डोळ्यांत पाणी आलं.
ती म्हणाली,
“आपण दोघी एकाच घरातल्या, पण वेगवेगळ्या अनुभवांच्या.
आधी भांडण झालं कारण मी तुम्हाला माझ्या नजरेतून समजून घेत नव्हते.
आता मात्र कळलं — घर टिकवायचं असेल, तर दोघींनी मिळूनच प्रकाश करायचा.”


दोघी एकमेकींना मिठी मारतात.
सासूबाईंचे डोळे भरून येतात.
घरभर मंद दिव्याचा उजेड, आणि मनात शांतता.


पुढच्या भागात आपण बघणार आहोत- मीरा आणि वैशालीचं गोड नातं


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
0

🎭 Series Post

View all