Login

कानामागून आली आणी तिखट झाली - भाग -3 ( अंतिम भाग )

Tikhat Jhali
कानामागून आली आणि तिखट झाली - भाग -3 ( अंतिम भाग)



काळ पुढे सरकत होता, मीरा आणि वैशाली आता बहिणी- बहिणी आहेत असं वाटतं असे.

काही दिवसांनी घरात हरतालिकेचा सण होता,

वैशालीने सगळं सजवलं, पण यावेळी ती म्हणाली,
“मीरा, तू सजव पूजा.

मीरा हसली.

घरात पुन्हा हास्य फुललं.
वाद राहिले नाहीत, फक्त नात्यातला गोडवा राहिला.


एके दिवशी सासूबाईंचा वाढदिवस होता.
घर फुलांनी सजलं होतं.

अमोल आणि संजय ऑफिसमधून लवकर घरी आले होते.
मुलं, नातवंडं, सगळं घर गजबजलेलं.


मीरा किचनमध्ये होती, वैशाली तिच्याजवळच होती.

घरभर गोडाचा वास दरवळवत होता.
— दोघींचं हसणं ऐकून घर उजळलं होतं.

दोघींनी मिळून सासूचा वाढदिवस अगदी थाटात केला, सुंदर स्वयंपाक केला होता.


“मीरा म्हणाली, वहिनी आठवतं का माझा पहिला सण, जेव्हा मी सजावट केली होती आणि तुम्ही ओरडलात?”

वैशाली हसून म्हणाली, “आठवतं की नाही! त्या वेळी खरंच मला वाटलं तू खूप तिखट आहेस!”

मीरा छेडत म्हणाली, “मग आता काय म्हणाल?”

वैशालीने तिचा हात धरत म्हटलं,
“आता वाटतं, ह्याच तिखटपणानं आमचं आयुष्य चविष्ट केलं.”


दोघींच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले — आनंदाचे, मोकळेपणाचे.


त्या रात्री सासूबाईंनी दोघींना बोलावलं.
“बाळांनो, मला तुमचं दोघींचं कौतुक करायचं आहे, म्हणून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हांला दोघीना माझ्याकडून भेटवस्तू.. सासूबाईंनी दोघींना पण पैठणी साडया गिफ्ट दिल्या, आणि बोलू लागल्या..


आधी तुम्ही घरासाठी भांडलात, पण शेवटी त्या भांडणातून प्रेम निर्माण केलंत.
माझं आयुष्य आता शांत झालंय.”


त्या दोघी त्यांच्या पायाशी बसल्या, आणि सासूबाईंच्या थरथरणाऱ्या हातात आपले हात ठेवले.

वैशाली म्हणाली, “ आई - आम्ही आज जे काही आहोत, ते तुमच्यामुळेच.”


मीरा म्हणाली, खरंच आई,
“तुम्ही आम्हाला नातं जपायला शिकवलं. नाहीतर आम्ही अहंकारात घर हरवलं असतं. सासर म्हणजे रणांगण नाही, तो नात्यांचा ब्रिज आहे, फक्त काळजी आणि विश्वासानेचं तो आयुष्य पुढे नेतो,“स्त्रिया एकमेकींच्या स्पर्धक नसतात, त्या एकमेकींच्या आधार होऊ शकतात, एकीचं यश दुसरीची हार नसते — ती सगळ्यांची जित असते!” हे तुम्हीच आम्हाला शिकवलंत.


संध्याकाळी घराच्या गच्चीवर बसून मीरा आणि वैशाली चहा घेत होत्या.
वाऱ्याने गारवा आणला होता.


वैशालीने आकाशाकडे बघत म्हटलं,
“मीरा,  हा सूर्यास्त बघ — कधी तिखट केशरी, कधी कोवळं सोनेरी…
जसं आपलं नातं. सुरुवातीला तापलेलं, पण आता किती शांत, किती सुंदर.”


मीरा हसत म्हणाली,
“वहिनी हो ना, काळानुसार आपलं नातं किती सुंदर झालं ना.


दोघी मनमोकळं हसल्या,
आकाशातल्या रंगांप्रमाणे त्यांच्या मनातही उजळलेले रंग मिसळले.


जिथे एकेकाळी भांडणं होती,
तिथे आता एकत्र प्रार्थना, एकत्र हास्य, आणि एकत्र चहा होता.


वैशाली आणि मीराने शिकवलं...
की जरी सुरुवात तिखट असली तरी शेवट गोड असू शकतो… जर मनापासून माफी आणि प्रेम असेल तर!


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
0

🎭 Series Post

View all