तिला ही स्वाभिमान आहे भाग ४

तिला ही स्वाभिमान आहे भाग ४
तो पर्यंत प्रतिक त्याच्या बेडरूम मध्ये गेला. तर तिथ हि शीतल दिसली नाही. त्याने घर भर बघितलं. कुठेच दिसत नव्हती. गेली कुठ ? त्याने तिचा फोन लावला तर तो तिथेच वाजत होता. समोर बेड वर उशी पाशी तर ठेवला होता तिने.

" अरे काय करू मी शीतलच. किती निष्काळजी आहे. साधा फोन पण सांभाळता येत नाही. सकाळ पासुन आहे कुठं. घरात नाही. बाहेर पण नाही गेली " स्वतः शी बडबड करत तो तिला घरात शोधत होता.

" वरद,रेवा अरे आई कुठं आहे." मुलांच्या खोलीत जावून त्यांना विचारलं. मुलं नुकतीच झोपेतून जागी झाली होती.
" नाही माहीत. किचन मधे असेल." वरद म्हणाला.

" नाही तर भाजी आणायला खाली गेली गेली असेल." रेवा म्हणाली.

" बर मी बघतो. तुम्ही फ्रेश होवून या." अस म्हणत प्रतिक किचन मध्ये गेला. तर दरवाज्याच्या मागे जिथं कापडी पिशव्या लावलेल्या असतात. त्या तिथेच होत्या. म्हणजे शीतल भाजी आणायला खाली गेली नाही. मग गेली कुठं ?

" सौरभ, अरे या श्लोक कडे बघ रे. किती पळा पळी करतो." आई सौरभला उठवत श्लोक ची जबाबदारी त्याच्या कडे देत म्हणाली.

" आई वहिनीला सांग ग.त्याच्या कडे बघायला. मला झोपू दे. आज सुट्टी आहे. तर जरा म्हणून आराम नाही करू देत. नाही तर तु बघ ना ."

सौरभ कुस बदलून झोपत म्हणाला.त्याने डोक्यावर पांघरून घेतल. पुन्हा झोपी गेला. हे सगळं प्रतिक ने दरवाज्यातून बघितलं. तो आईला विचारायला आला होता.

तिला माहिती आहे का ? शितल कुठं गेली असेल ?

पण समोरच दृष्य बघून त्याला आईला विचारण्याची हिंमत नाही झाली. आई श्लोकला सांभाळत होती. आता जर आई समोर गेलं तर आई श्लोकला आपल्याकडे सोपवून निवांत होईल. श्र्लोक आताशी कुठे दोन वर्षांचा मुलगा आहे. एक वेळ मोठ मूल सांभाळणं सोप असत.

त्याला त्याच्या आवडीच काम करायला दिलं की ते रमत. आपल्याला त्रास नाही देत जास्त. पण ही छोटी छोटी लबाड मुल दिसायला अगदी गोंडस असतात. पण त्यांना सांभाळणं आणि एका गोष्टी मध्ये त्यांचं मन रमवण सर्वात अवघड असत
सतत त्याच्या वर लक्ष ठेवावं लागतं.

त्याने पटकन आपला मोर्चा वरद आणि रेवाच्या रुम कडे वळवला. शीतल अजुन आली नव्हती. त्यामुळे सगळ्यांचा चहा नाष्टा सगळच बाकी होत. सकाळचा मॉर्निंग वॉक करून बाबा घरात आले.

" शितल चहा दे ग जरा घोटभर." न्यूज पेपर उचलून बाल्कनी मध्ये त्यांच्या आवडत्या खुर्चीवर बसून त्यांनी ऑर्डर केली.

" आई दूध." रेवा म्हणाली

" आई मला चॉकलेट मिल्क हवं." वरद ने फरममाईश केली.

ते दोघ फ्रेश होऊन हॉल मध्ये येवून बसले
नेहमी प्रमाणे आईला हाक मारली.

" काय ए रे. काय चालू आहे. सगळे नुसते हुकूम सोडत आहेत." श्र्लोक ला कडेवर घेऊन वनिता बाई म्हणाल्या.

" वनिता अग काय झालं माझ्या चहाच. जरा बघ बर." सासरे अशोक म्हणले.

" अहो मला के विचारता. आज अजुन माझा चहा पण नाही झाला. सकाळ पासून हि शीतल कुठं आहे ते माहीत नाही. कुठं गेली आहे रे प्रतिक तुला माहीत आहे का ? सौरभ तुला काही माहित आहे."

सोफ्यावर बसलेल्या आपल्या मुलांना वनिता बाई विचारल. त्या दोघांनी नकार दिला.

" सौरभ तू गेला होता ना रचिताला सोडायला सकाळी ?"

" नाही आई. ती नको म्हणली. मी नाही गेलो. जातांना तिने मेसेज केला होता."

" तिला फोन करून विचार. तिला माहित आहे का. सकाळी शीतल तिला काही सांगुन गेली आहे का. कुठं जाणारं आहे ते ?" अशोक म्हणले

सौरभ ने रचिताला फोन लावला. तर तो स्विच ऑफ केला होता. पण तिने फोन बंद करून ठेवण्या आधी त्याला मेसेज पाठवला होता. ऑडिट मुळे फोन बंद केला आहे. काही कॉन्फिडन्शियल रेकॉर्ड चेक करायचे आहेत. त्यामुळे दिवस भर मोबाईल बंद असेल.ते त्याने आईला सांगितलं.

" वनिता जरा चहा दे ग." अशोक त्यांच्या बायकोला म्हणाले.

वनिता बाई चिड चिड करत किचन मध्ये गेल्या. त्यांनी सगळ्यांच्या साठी चहा बनवला. मुलांना दूध गरम करून दिलं.

" आई वहिनी येई पर्यंत नाष्टा करून दे. मस्त पैकी पोहे कर. " सौरभ म्हणाला.

" आई मला पोहे नाही आवडत. माझ्या साठी उपमा कर." प्रतिक म्हणाला.

" वनिता मला साधी भाकरी आणि कोरडी चटणी दे. मला पोहे उपमा वगेरे काहीचं नको." अशोक म्हणले.

" आजी मला डोसा खायचा. " वरद लाडाने म्हणाला.

" आजी मला डोसा नको. इडली सांबार कर " रेवा.

" आजी मन्ना पण ईड्डी " छोटा श्र्लोक बोबड्या बोलीत म्हणाला.

" बरं करते. पण वेगवेगळ काही नाही. एकच काहीतरी मिळेल. सांगा पोहे करू? चालतील खायला सगळ्यांना ? " वनिता बाई म्हणाल्या. त्यांच्या आवाजातील चिड लपत नव्हती.

त्यांचा राग रंग पाहून सगळ्यांनी पोहर खायला संमती दर्शवली. वनिता बाईनी श्र्लोक ची जबाबदारी अशोक यांच्या वर सोपवली. त्या वेळी सौरभ आणि प्रतिक आवरायचं म्हणून आपल्या आपल्या बेडरुम मध्ये पळाले होते.

वनिता बाईनी चिड चिड करत पोहे बनवले. पण शीतल असताना त्यांनी किचन मधलं लक्ष कमी केलं होत. त्यामुळे त्यांना बऱ्या पैकी गोष्टी मिळतं नव्हत्या. त्यात स्वयंपाक करायची सवय मोडली होती. त्यामुळे पोहे भिजवताना पाणी जास्त झालं. फोडणी करपली. पोहया मध्ये लिंबु पिळायचं विसरल. तिखट मिठाचा अंदाज चुकला.

मुलांनी तर पोहे खायला नकार दिला. म्हणून त्यांच्या साठी झटकन होणारी मॅगी बनवावी लागली. वनिता बाईना. बाकिच्या मंडळींनी तर कसे बसे पानात वाढेलेले पोहे संपवले. पण अजूनही शीतलचा पत्ता नव्हता.

इतकचं काय कमी होत की वनिता बाईचा मोबाईल वाजला.

" हॅलो वहिनी सुधा बाई बोलतं आहे."

" हॅलो सुधा बाई बोला "

" वनिता बाई,वहिनी फोन नाही उचलत. कुठं आहेत. कामात आहेत का ?"

" तू कशाला फोन केला सकाळ सकाळी " तिच्या प्रश्नाला बगल देत वनिता बाईनी विचारलं.

" ते आज मला कामावर यायला जमणार नाही. हेच सांगायला फोन केला आहे."

क्रमशः


🎭 Series Post

View all