सौ .ज्योत्स्ना लोकप्रिय गायकवाड
लघुकथा
विषय- स्त्रीला समजून घेणे खरंच इतकं अवघड असतं का हो?
उपविषय- तिला खरंच काही समजते का?
टीम - सोलापूर
" नीता, उशीर होतोय मला. लवकर टिफिन दे " , आशिष म्हणाला.
" दोनच मिनिट हा आशिष. फक्त थंड व्हायला ठेवलं आहे भाजी आणि पोळी. लगेच टिफिन भरून देते. तोपर्यंत पाण्याची बाटली भरून घेते " , नीता म्हणाली.
नीताने टेबलावर नाश्त्याची सगळी तयारी करून ठेवली होती.
" आशिष, नाश्ता थंड होतोय लवकर करून घ्या " , नीता म्हणाली.
" नीता, तुला कळत नाही का? आज माझे पहिलेच लेक्चर असते. त्यामुळे मला रोजच्यापेक्षा आज लवकर पोहोचावे लागते. तुझ्या विचाराने मी जर चाललो तर मला ही घरी बसावे लागेल. तुझ्यासारखं ? " , आशिष जरा वैतागूनच म्हणाला.
नीताच्या डोक्यात एकदम वीज चमकल्यासारखे ते शब्द घुसले.
तिला काय करावे हेच कळत नव्हते.
तिने कसं बसं स्वतःला सावरत आशिषचा टिफिन भरून ठेवला व पाण्याची बॉटल ही ठेवली.
आशिष फक्त चहा घेऊन , टिफिन बॅगेमध्ये भरून निघूनही गेला.
नीता ला हे कळाले ही नाही. ती किचनमध्ये आपलं काम करत होती . ती स्वतःच्याच तंद्रीत हरवून गेली होती.
नीताही शिक्षिका म्हणून शाळेमध्ये शिकवत होती. लग्न झाल्यानंतर तिने तिथे दोन वर्ष नोकरी केली. पण सोहमच्या जन्मानंतर तिने ती नोकरी सोडली होती. घरी लहान बाळाला सांभाळायला कोणीच नव्हते व पाळणाघरात सोहमला ठेवून नोकरीवर जाणे तिच्या जीवावर आले असल्याने तिने नोकरीवर पाणी सोडले होते.
सोहमच्या आवाजाने ती भानावर आली.
" आई ऽऽ आई, तुझं लक्ष कुठे आहे मी कधीपासून तुला आवाज देतोय?", सोहम म्हणाला.
" हम्म, अरे बाळा आज तुला उठवायचंच राहून गेलं माझं . बघ , हे असं होतं. एकदा किचनमध्ये घुसलं की मला कशाचंही भान राहत नाही " , नीता जरा गांगारूनच म्हणाली.
सोहमला तिचा आता राग आला होता. एका तासामध्ये त्याला आवरून शाळेला निघायला लागणार होते. त्याची स्कूल बॅग पण भरलेली नव्हती व थोडासा होमवर्क ही बाकी होता.
सोहम फक्त इयत्ता पहिली मध्ये शिकत होता. पण त्याचा अविर्भाव जसा काय कॉलेजला आहे असा वाटत होता.
नीता त्याला रोज उठवत असे. आशिष गेला की सोहमला उठवून त्याचे आवरणे हे काम पहिलं हाती घेत असे. पण सकाळी झालेल्या प्रसंगामुळे ती किचनमध्ये शिरली व विचाराच्या तंद्रीतच हरवून गेली असल्याने तिला सोहमचेही भान राहिले नाही.
सोहम थोडासा वैतागून च आज आपली तयारी करू लागला होता.
नीता ला आपल्या हातून कोणता तरी मोठा अपराध झाल्यासारखं वाटत होतं. तिने हातातले काम बाजूला ठेवून सोहमच्या तयारीकडे लक्ष देऊ लागली पण सोहम आज तिच्याकडून काहीही करून घेण्याच्या मूडमध्ये नव्हता.
रोज गोड बोलणारा सोहम आज तिला वेगळाच भासत होता. सकाळी जेव्हा ती त्याला उठवायला जात असे तेव्हा तो लाडातच येत दोन्ही हाताची कडी तिच्या गळ्याभोवती घालून कडेवर बसूनच उठत असे. पण आज चित्र मात्र वेगळे होते. त्याचे परिणाम नीता ला दिसत होते.
नीता त्याला गोड बोलून समजावण्याचा प्रयत्न करत होती पण सोहम तिला झिडकारतच राहिला.
नीताला वाटले, ' ज्यांच्यासाठी मी माझ्या करिअरला दुर्लक्ष केले. त्या लोकांना माझ्याबद्दल काहीही वाटत नाही. फक्त मी त्यांच्या सेवेसाठी स्वतः हजर असूनही ते दुर्लक्षित करत आहेत. जर मी माझं करिअर सुरूच ठेवलं असतं तर आज त्यांच्या वेळेत मी घरी हजर ही राहिली नसते तरी त्यांनी त्यांचं आवरून घेतलं असतं. माझ्यावर त्यांना रागवताही आलं नसतं . खरंच मी घरी थांबले हीच माझी मोठी चूक आहे का? '.
नीताला आता, ' स्वतःबद्दल विचार करायला हवा ' , असं वाटायला लागले होते.
सोहमने पटापट आवरून घेतले व तो शाळेला निघूनही गेला.
नीताने पटकन घर आवरून घेतले. कपाटातून लॅपटॉप काढला व स्वतःचा बायोडाटा तयार करायला हाती घेतला.
तिने आज ठरवले होते , ' उद्यापासून जवळच्या स्कूलमध्ये आपला बायोडाटा देऊन यायचं व संधी मिळाली की लगेच जॉईन करून टाकायचं '.
नीताला आज दोन्ही प्रसंगा मधून खूप थकल्यासारखं वाटत होतं पण करिअरच्या विचारानेच तिचे मन परत प्रफुल्लित झाले.
कारण तिला कळून चुकले होते की, ' मी ह्यांच्यासाठी कितीही राबले तरी हे शेवटी असेच बोलणार आहेत त्यामुळे आपण ह्या चौकटीतून बाहेर पडून स्वतःचा विचार करायला हवाच '.
नीताने योग्य वेळी पाऊल उचलले त्यामुळे तिला जास्त दिवस पश्चाताप करण्याची वेळ आली नाही.
कारण ही तर तिची सुरुवात होती. अजून पुढे- पुढे तिच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येत गेले असते व पावलो- पावली तिचा अपमान झाला असता आणि काळाप्रमाणे तिच्या हातातून वेळ ही निघून गेली असती. वेळीच तिने स्वतःचे करिअर परत सुरु करण्याचे ठरवले.
नीता ला आठवत होते की, ' सोहमच्या जन्मापासून आशिष ने तिला किती वेळा हे वाक्य बोलून दाखवले होते. जेव्हापासून ती घरी राहिली होती तेव्हापासून आशिष तिला टोमणे च मारत असायचा. मुलांना जन्म देणे हे नैसर्गिक स्त्रीकडे असल्यामुळे तिला तिच्या करिअर मधून ब्रेक घ्यावा लागतो पण त्याचा अर्थ असा नाही की तिला काहीच कळत नाही म्हणून ती घरी राहत आहे '.
घरातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वेळी स्त्रीला गृहीत धरूनच चालतात त्यामुळेच तिला बोलणे खावे लागते. तिला जर समजून घेऊन प्रत्येकाने वागले तर ती दोन्ही बाजू खूप चांगल्या प्रकारे सांभाळू शकते. फक्त मुले लहान आहेत म्हणून तिने करिअर मधून ब्रेक घेतला असला तरी तिला दुबळी समजू नये. त्या जागी पुरुषांनी स्वतःच्या करिअर मधून ब्रेक घेऊन मुलासोबत घरी थांबून बघावे. कोणकोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते हे स्वतः अनुभवावे. त्यानंतरच स्त्रीला दोष द्यावा.
नैसर्गिक मातृत्व स्त्रीला नसते तर तिनेही करिअर कधीच सोडले नसते व पुरुषाप्रमाणेच ती स्वतंत्र राहिली असती.
नीताने जवळच्या स्कूलमध्ये बायोडाटा देऊन आठ दिवस झाले होते. त्यापैकी दोन स्कूल मधून तिला बोलावणे आले. दोन्ही स्कूलमध्ये तिने डेमो लेक्चर दिले. एका स्कूलमध्ये तिचे सिलेक्शन झाले व ते स्कूल सोहमचे होते. योगायोगाने तिला सोहमचा वर्ग शिकवायला भेटला.
तिने मुद्दाम नोकरीचे सोहमला सांगितले नाही फक्त आशिषला कल्पना दिली होती. तरी ही आशिषच्या चेहऱ्यावरचे अविर्भाव बदलून गेले नव्हते.
नीताने सोहमच्या क्लासमध्ये पाऊल ठेवला व सोहम तिच्याकडे पाहतच राहिला. नीताने ही शिक्षक म्हणूनच क्लासमध्ये सोहमला वागणूक दिली. नीताने सोहमच्या चेहऱ्यावरचे बदलले भाव जाणून घेतले व सोहमला आपली चूक कळाली होती हे तिच्या लक्षात आले होते.
आज खूप आनंदाने नीता घरी परतली. स्वतःचा स्वाभिमान काय असतो हे तिला आज नव्याने उमगले होते. पण तिने मनाशी पक्क ठरवलं होतं की हळूहळू आशिष ला ही आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायची.
नीता रोजच गाणे गुणगुणत आपले किचन चे काम आवरून नोकरीवर निघून जायची. आशिष स्वतःचे व सोहम चे आवरून त्याला स्कूलमध्ये सोडून मगच नोकरीवर जायचा. आता त्याची तारेवरची कसरत होत होती.
आशिषला आता आठवत होते की, ' आपण नीताला किती गृहीत धरून चालत होतो. जोपर्यंत ती घरामध्ये आपली सगळी जबाबदारी पार पाडत होती तोपर्यंत तिला मी कधीही चांगलं बोलून तिचे कौतुक केले नाही. आता ती घरात नसताना मात्र तिची उणीव भासते '.
समाप्त.