हिला सासरी पाठवा..

नणंद भावजयीची वेगळी कथा
हिला सासरी पाठवा...

विषयः नणंदेचे सासर


"तुझी हिंमत कशी झाली, ताईला इथे येऊ नको म्हणून सांगायची?" प्रतिक रागाने लाल झाला होता. अनुश्री मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करून चहा गाळत होती. ते बघून प्रतिकचा राग अजूनच वाढला. त्याने रागाने अनुश्रीला आपल्याकडे वळवलं.

"मी तुला काहीतरी विचारतो आहे."

"हात सोड माझा." अनुश्री शांतपणे म्हणाली.

"बघितलंस.. तुझंही ऐकत नाही ती. आमचं काय ऐकणार? बिचारी स्मिता रडत घरी गेली." कुंदाताईंनी स्वयंपाकघरात येऊन प्रतिकसमोर डोळ्याला पदर लावला.

"चहा हवाय?" अनुश्रीने विचारले.

"मला फक्त माझ्या प्रश्नाचे उत्तर हवं आहे."

"चहा घे.. मग बोलू." अनुश्री तिथून बाहेर गेली.

"मगाशी पण असंच वागली रे.." कुंदाताई प्रतिकला म्हणाल्या.

"आई, तू सतत रडू नकोस.. मी बघतो काय ते." प्रतिक तसाच रागाने बेडरुममध्ये गेला. अनुश्री मोबाईल खेळत होती.

"आता तरी सांगणार आहेस, का बोललीस तू ताईला उलटं?" प्रतिक रागावर ताबा मिळवत म्हणाला.

"सांगते ना..बस इथे." नाईलाजाने प्रतिक तिथे बसला. "आपल्या लग्नाला किती महिने झाले?"

"त्याचा याच्याशी काय संबंध?"

"आहे.. तू सांग." अनुश्री हट्टाने म्हणाली.

"सहा महिने. वर्ष पण नाही झालं तुला इथे येऊन.. आणि तू माझ्या ताईला माहेरी येऊ नको म्हणून सांगितलंस." प्रतिकच्या आवाजात वेदना होती.

"त्या सहा महिन्यात ताई इथे किती दिवस होत्या?" अनुश्रीने विचारताच प्रतिक गप्प बसला. "आठवत नाही का? मी सांगू? आधी आपलं लग्न झालं म्हणून. मग नंतर आपण हनिमूनला गेलो म्हणून. नंतर काय? दसरा.. मग दिवाळी.. संपतच नव्हतं. एक दिवस मला आठवत नाही.. सुट्टी आहे आणि त्या इथे नाहीत. आपलं पण आयुष्य आहे की नाही?" मगाशी चिडलेला प्रतिक आता मात्र गप्प झाला.

"ते ताईच्या सासरी अडचणी असतात म्हणून.." तो कसाबसा म्हणाला.

"अडचणी कोणाला नसतात? आधी ठिक होतं. आपलं लग्न झालं नव्हतं. पण आता मी आहे ना? मला नाही आवडत त्या सतत इथे आलेल्या. शेवटचं सांगते आहे." अनुश्री ठामपणे म्हणाली.

"अगं पण तिचा सासरी छळ होतो. सासूबाई खूप बोलतात. मग कधीतरी भाऊजी तिच्यावर हात उचलतात. म्हणून मग ती इथे येते." प्रतिक काकुळतीने अनुश्रीला समजवू लागला.

"ते तुमचं तुम्ही बघा. यापुढे त्या सतत इथे आलेल्या मला चालणार नाही." निर्वाणीचे बोलून अनुश्री खोलीबाहेर गेली. बिचारा प्रतिक मात्र ताईशी या विषयावर कसं बोलायचं यावर विचार करत राहिला.

सदर कथेचा व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई


🎭 Series Post

View all