Login

तिला वेगळे नियम भाग १

तिला वेगळे नियम भाग १
" काय बाई म्हणायचं आजकालच्या सुनांना."

" हे तर नेहमीचच झालं आहे. आज माहेरी अमुक कार्य क्रम आहे. आज काय तमुक प्रोग्रॅम आहे."

" मुलगी पण काय अशी ! की काही विचारायची सोय नाही."

" माहेरून फोन आला की लगेच निघाली."

" एखाद वेळेला तरी म्हणेल , कधी तरी नकार देईल. म्हणेल आई यावेळी यायला जमणार नाही."

सुषमा बाई सोफ्यावर बसुन टीव्ही बघत बडबडत होत्या. समोर टीव्ही वर कौटुंबिक मालिका सुरू होती. टीव्ही वरच्या कार्यक्रमात आदर्श सुनबाई कशी असते. ती कशी सगळी काम एकटी सांभाळते. सासू सासऱ्यांची सेवा करते. सासू बाईंच्या आज्ञेत राहते. याचं उत्तम उदाहरण दाखवत होते. कुठे तरी सुषमा बाईंनी मनात त्यांच्या सुनेची अशीच काहीशी प्रतिमा तयार केली होती. पण वास्तव ?

ते तर असं नव्हतं ना!

" इतकं पण काय माहेर माहेरचा जप करायचा. सारखं लक्ष आपलं माहेरीच असतं. लग्न झालं आहे. तर सासरी मन रमवाव . सासर हे पहिल्या पायरीवर ठेवावं. माहेर जरा दुरच ठेवावं. म्हणजे आपला मान जपून ठेवावा. ते काहीच नाही. सासरी कसं वागायचं हे शिकवलच नाही. संस्कार हे करावे लागतात.

" सारखं सारखं काय माहेरच कौतुक ? "

" आज काय काकाच्या मुलाचा वाढदिवस आहे."

" आज काय मावशी कडे पुजा आहे."

" आज काय दूरचा भाऊ वहिनी आले आहेत."

" आज काय आजीचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहोळा आहे."

" आज काय सोळा सोमावरच्या व्रताच उद्यापन आहे."

" आज काय बहिणीच डोहाळ जेवण आहे."

" एक ना अनेक कारणं.एक ना अनेक कार्यक्रम."

" एक संपत नाही तो दुसरा कार्यक्रम येतोच. "

" तिकडून काय एक फोन आला. की, सुनबाई पायाला चाक लावून पळाल्या.

कधी तरी म्हणेल आज यायला जमणार नाही."

" सासरी काम आहे.

आता मी सासुर वाशीण आहे. तर यायला जमेल अस वाटतं नाही.

सुनबाई कधीच नकार देत नाही."

सुषमा बाई टीव्ही वरचा कार्यक्रम बघत बडबडत होत्या.त्यांच्या सुरात सुर मिसळत त्यांची मुलगी पण बसली होती.

" आई वहिनीला काही समजत नाही का ग , आता लग्न झालं आहे तर सुनेने सासरी कसं वागायचं ?

सुनेने सासरी जास्त आणि माहेरी कमी जायच असत.

सारखं सारखं काय ग प्रोग्रॅम असतात ? "

तिची नणंद आईच्या सुरात सुर मिसळत बोलतं होती. जी स्वतःच आता तिच्या माहेरी राहायला आली होती.

कारण म्हणावं तर काही खास नाही. सहज म्हणून भेटायला आली होती. आता वहिनीला  घरात न बघून आईच्या बोलण्याला दुजोरा देत होती.

" अग इतकी समज कुठं आहे तिच्यात. तिला समजत नाही. आधी सासरच बघायचं असत. सासरच्या मंडळींना प्राधान्य द्यावे. पण नाही. सासरी कस् वागायचं याची काही रित भातच नाही.

सासरच्या घराला म्हणजे नुसत लोजिंग बोर्डिंग बनवून ठेवलं आहे. खायचं प्यायच इथ आणि कौतुक करायचं माहेरचे. रात्री झोपायला सासरी परत येते हे काय ते उपकार म्हणायचे.

पण असं किती दिवस चालणार ?

तिच्या आई वडिलांच्या सोबत या विषयावर बोलायला पाहिजे." सुषमा बाई म्हणाल्या.

" आता हेचं बघ ना, मला तर बटाटे वडे खाण्याची इच्छा झाली आहे. मी इथ माहेरी आली आहे. आणि वहिनीच घरी नाही. आता कोण बनवणार बटाटे वडे ?

मी माझ्या सासरी असती तर मलाच बटाटे वडे बनवून सगळ्यांसाठी तळावे लागले असते. मग कुठे मला खायला मिळाले असते. गरम गरम आणि आयत खाण्याच सुखच नाही मला.

म्हणल आज माहेरी आली आहे. तर वहिनी बनवून देईल गरम गरम बटाटे वडे आणि आलं घातलेला चहा.

माहेरची चव वेगळी असते. स्वतः करून स्वतः खाण्यात काय मजा ?

आता वहिनीच इथ नाही म्हणजे मला उपाशीच राहावं लागेल. बटाटे वडे खाण्याची इच्छा मारावी लागणार."  प्रीती बडबडत होती.

" अग माझी सोनी, तु कशाला तुझी इच्छा मारते. तुला बटाटे वडे खाण्याची इच्छा झाली आहे ना ! "

" वहिनी घरात नाही म्हणून काय झालं. मी आहे ना. तुझी आई असताना तुला तूझ्या इच्छा मारण्याची काहीही गरज नाही."

" मी बनवून आणते." अस म्हणत त्यांनी टीव्हीचा रिमोट लेकी कडे दिला.

थोडया वेळाने किचन मधून कूकरच्या शिट्ट्या ऐकु येत होत्या. काही वेळातच सुषमा बाईंनी प्रीती साठी गरमा गरम बटाटे वडे चटणी बनवली. सोबतीला आलं घालून चहा पण बनवला.

त्यांचं काम होई पर्यंत प्रीती आणि तिचा धाकटा भाऊ प्रतीक एकमेकांशी गप्पा मारत टीव्ही बघत होते.

सुषमा बाईंना तीन मुलं आहेत. अमोल आणि प्रीती आणि प्रतीक. ती दोघं जुळी मुलं आहेत. अमोलच्या लग्नाच्या आधी त्यांनी प्रितीच लग्न केलं होत.

तिच लग्न करताना त्यांनी एक गोष्ट विचार पूर्वक केली होती. ती म्हणजे प्रितीच सासर हे एकाच शहरात असेल. म्हणजे मुलीला माहेरी ये जा करता येईल. आपली मुलगी आपल्या डोळ्या समोर राहिलं.

देवानं त्यांची हि इच्छा पूर्ण केली होती. प्रितीचं सासर आणि माहेर एकाच शहरात होत. आठवडा पंधरा दिवसात प्रिती माहेरी चक्कर टाकत असायची.

देवानं त्यांची हि इच्छा पूर्ण केली होती. प्रितीचं सासर आणि माहेर एकाच शहरात होत. आठवडा पंधरा दिवसात प्रिती माहेरी चक्कर टाकत असायची.

प्रितीच्या लग्ना नंतर अमोलच लग्न स्वराली सोबत झालं. त्या दोघांच्या बहिण भावांच्या लग्नामध्ये जेमतेम सात आठ महिन्यांच अंतर होत.
स्वराली एकत्र कुटुंबातून आलेली मुलगी होती.
तिचं माहेर पण एकाच शहरात होत. तिच्या नणंद सारखं.

एकत्र कुटुंब असल्याने घरात बरेच कार्यक्रम साजरे केले जाात. तिचं सासर जवळ असल्याने साहजिकच तिला पण बोलवलं जात असे. आता त्यांच्या लग्नाला सहा महिने उलटून गेले होते. तरी देखील या दरम्यानच्या कालावधीत ती कधीच माहेरी राहायला म्हणून गेली नव्हती.