Login

तिलाही तिचे मत आहे : भाग ४ (अंतिम भाग)

एका सुनेची व्यथा
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलद लेखन

"अरे कायं चाललंय तुमचं? आईच ठीक आहे पण दादा तू सुद्धा आईच्या बोलण्याला संमती दर्शवतो आहे याची कमाल वाटते. मी कायं पुन्हा येणारच नाही आहे कायं?
आणि तुम्ही जाऊन आल्यावर सुद्धा मी इथेच असणार आहे तुम्ही दोन दिवस तर जाणार आहात मग वहिनीने का नाही यायचं तुझ्याबरोबर?" निकिता तावातावाने बोलत होती.

" अगं निकिता तू एवढी का चिडचिड करतेय पण? जरा हळू बोल नाss " सदानंद राव निकिताचा आरडाओरडा पाहून बोलतात.

" बाबा सॉरी माझा आवाज वाढलाय माझ्या लक्षात येतेय पण ही दोघे बघा ना कशी बोलत आहेत. " निकिता वैतागून बोलते.

" कायं गं असे आम्ही बोललो?" मालती ताई निरागसतेचा आव आणून बोलतात तेव्हा
रोहिणी हे सगळे पाहून विषय वाढायला नको म्हणू म्हणते,

"निकिता तू शांत होss...हे बघ आई बरोबर बोलत आहेत. यांना जाऊन येऊ दे.. आम्ही दोघे नंतर जाऊन येऊ. "

" बघ निकिता तू उगाच पराचा कावळा करतेय.. रोहिणीला काहीच अडचण नाहीये." मालती ताई रोहिणीच्या बोलण्याची री ओढत बोलतात.

"आई तू एक मिनिट थांब.. मला माहित आहे वहिनी अशी का बोलतेय ते, या दोन चार दिवसात तर तिचा जास्त सहवास लाभला आहे अगदी त्यामुळे मला चांगलेच लक्षात आले आहे तिच्या स्वभावातील काही गुण " निकिता मालती ताईकडे पाहून बोलते.

"नक्की कायं म्हणायचं आहे तुला निकिता?" नितीन निकिताकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो.


" अरे दादा मी इथे आल्यापासून पाहतेय ना रोहिणी वहिनीला आई सतत काही ना काही सुचना देत असते, बोलत असते, ती एका शब्दाने उलट उत्तर देत नाही आईला.

वहिनी सुद्धा शिकलेली आहे माझ्यासारखीच, मी वहिनीला पाहते तेव्हा लक्षात येते की ती किती शांत असते, उलट मी मात्र सुरूवातीला खूप चिडचिड करायचे. अरे आई सारखे तिला सुचना देत असते, हे असे कर तसे कर, मान्य आहे आईला सगळे माहित आहे सगळ्यांच्या सवयी वगैरे पण वहिनी सुद्धा शिकेल ना हळूहळू.

आत्ताही आई तिच्या वतीने निर्णय घेऊन मोकळी झाली किती सहजपणे आणि तू पण दुजोरा दिला दादा त्याला चुकले तुझे. अरे ती स्वतंत्र आहे, तिचे निर्णय ती घेऊच शकते एकटी.

हे बघ आई तू तिला थोडी मोकळीक दे आणि दादा एक सांगू ती नवीन आहे घरात ती फार बोलत नाही पण तुच तिला समजून घ्यायला हवे. तिच्याही काही इच्छा असतील आणि सुरूवातीला एकमेकांना वेळ द्या.

आई तुच विचार कर जर उद्या तिकडे माझ्या सासूबाईंनी असेच केले आणि मला न विचारता तू माहेरी जायचे नाही म्हटले तर कसे होईल? " निकिताने तिच्या परखड बोलण्याने सर्वांच्याच डोळ्यात अंजन घातले.

" खरंच आहे बाळा तुझं मला लक्षातच आले नाही. मी आपलं माझं इतके वर्षांच जपलेले घर तिच्या हातात सोपवताना कचरत होते म्हणून असे वागत होते. आता तू अगदी डोळे उघडले. रोहिणी तू जा नितीनसोबत. इथून पुढे हवे तसे वाग आता." मालती ताईंचे बोलणे ऐकून रोहिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले तिने रोहिणीला खूप घट्ट मिठी मारली.

" थँक्यू सो मच! " निकिता आणि रोहिणीचे प्रेम पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला.

" मी आईस्क्रीम घेऊन येतो. चल रोहिणी "असे म्हणत नितीन कान पकडून रोहिणीची माफी मागतो आणि ते आईसक्रीम आणायला जातात.

*समाप्त*

प्रत्येक मुलगी सासरी येते तेव्हा थोडीशी बावरलेली असते त्यामुळे शांत असते किंवा काही बोलत नाही परंतु तिलाही तिचे मत असते स्वतंत्र आणि हे त्या घरातील प्रत्येकाने समजून घ्यायला हवं आणि तिला त्या घरात आपलेपणाची जाणीव करून द्यायला हवी.

©®ऋतुजा कुलकर्णी ✍️
0

🎭 Series Post

View all