असतो माझ्याकडे वेळ

वेळ काढण्याची कला
असतो माझ्याकडे वेळ


मी आणि सखीने महिनाभरापूर्वी, एक योगाचा पाच दिवसाचा कॅम्प केला होता .त्यात ओमकार ध्यान आणि काही प्राणायाम तसेच काही ध्यानाचे प्रकार शिकवले होते.
अर्थात अस्मादिक खूप बिझी असल्याने ,आठवड्यातून एखाद-दुसरा दिवस ,असाच ,अशा प्रकारच्या व्यायामाला देऊ शकत होते. त्यामुळे मी काही फार मोठ्या प्रमाणावर, त्या शिबिरात शिकलेलं अमंलात आणलं नाही.
काल सखीच्या घराच्या जवळून जात होते, त्यावेळेला मला आठवण झाली, ती घरी असेल तर विचारूनघेऊया, तिला कसा चाललाय योगा ?, खरंतर तिनेही काही फार केलं नसेल अशीच मला अपेक्षा होती.कारण मुलांच्या शाळा,बुटिकचे काम,घरातले काम,त्यात आठवड्यातून दोनदा वृध्दाश्रमातजाणे,इ.बरेच तिचे व्याप होते. मी फोन केला तेव्हा तिला तिच्या बुटीक मधनं घरी आली होती त्यामुळे येना घरी म्हणत तिने मला लगेच बोलवलं
पाचच मिनिटात तिच्या घरी पोहोचले मी तेव्हा ती मुलांसाठी म्हणून तिखटमिठाच्या पुर्‍या करत होती आणि मी आल्याबरोबर म्हणाली चल आपण दोघी पण या पुऱ्या खाऊया आणि सोबत छान पैकी आल्याचा चहा घेऊया ठेवतेस मी चहा
सखी काम करता करता रेडिओवरची गाणी ही ऐकत होती मी आल्यावर तिने रेडियो बंद केला आणि पुऱ्या करता करता एकीकडे चहा ठेवला आणि माझ्याशी गप्पाही करायला लागली .
"काय ग! आपण मग गेल्या महिन्याचे योग शिबीर केलं, काही करते का त्यातलं "मी विचारले.
"हो अगर रोज करते. सकाळी मॉर्निंग वॉक करून आले की माझ्याकडे असतो वेळ ,पंधरा मिनिटे तरी, त्यांनी शिकवलेल्या पाच ध्यानांपैकी ,एक तरी ध्यान नक्की करते ,आणि थोडा पाच सहा मिनिटं प्राणायामही करते. दिवस इतका फ्रेश जातो म्हणून सांगू ."
सखी उत्साहाने बोलत होती .
खरंतर सकाळच्या घाईगडबडीत, वॉकसाठी पंधरा-वीस मिनिटं काढणं ,पुन्हा पंधरा वीस मिनिटं ध्यान आणि इतर गोष्टींसाठी काढणं ,कसं काय हिला जमतं ?,मी आपला विचारच करत होते.
"अग पण सखी एवढ्या धावपळीमध्ये तू वेळ काढतेस तरी कसा" मी
"हे बघ राणी ,आपण सुरुवातच करतो की ,आपल्याकडे वेळ नाही. अशी केली ना तर मग कशालाच वेळ मिळत नसतो त्यापेक्षा आहे माझ्याकडे सर्व ॲडजस्ट करण्याची क्षमता आहे,असा विचार कुठलीही नवीन गोष्ट करताना केला ,तर काहीच अवघड नसते, अग आपण स्त्रिया खरे तर टाईम मॅनेजमेंट चागंली जाणतो." सखी उत्साहाने बोलत होती.
"मी ज्यावेळी ,आपल्याला ,स्वतःसाठी म्हणून काही करायचं असतं, त्यावेळेला तर माझ्याकडे वेळ नाही ,अशी सबब बिलकुलच विचार करत नाही.त्यापेक्षा इतर दोन काम कमी करून, मी स्वतःसाठी वेळ काढते,आणि स्वतःला आनंदी ठेवेण्याचा विचार करते.मग योगा असो किंवा इतर कार्यक्रम असो.
आता बघ ना ,सकाळी मला पंधरा वीस मिनिटं योगाभ्यास आणि ध्यानासाठी जास्त हवी ,म्हणून मी सकाळच्या नाश्त्याची आणि स्वयंपाकाची अर्धवट तयारी , आदल्या दिवशी रात्री करून ठेवते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी, मी आरामात वेळ देऊ शकते."सखीचे बोलणेप्रेरणादायक होते.
खरंच मैत्रिणींनो !माझ्याकडे काही करण्यासाठी वेळ नाही ,अशी सबब ,दरवेळी पुढे करण्यापेक्षा सखीसारखं ,काहीतरी जुळवाजुळव करून ,आपण स्वतःला वेळ द्यायलाच हवा .त्यासाठी सगळ्यात पहिली पायरी म्हणजे,' माझ्याकडे वेळ नाही 'असं म्हणण्यापेक्षा, कुठलीही नवीन कल्पना डोक्यात आली की ती अमलात आणण्यासाठी,' आहे माझ्याकडे वेळ 'असा सकारात्मक विचार करायचा ,म्हणजे आपोआपच त्यासाठी कशा पद्धतीने वेळ काढता येईल, ह्याची योजनाही करता येते. म्हणून बघा तुम्हीही "असतो माझ्याकडे वेळ "



भाग्यश्री मुधोळकर