Login

तिने आत्महत्या केली म्हणे.. भाग एक

सुनिधीची मैत्रीण आत्महत्या करते



सकाळी सकाळी सुनिधी नेहमीप्रमाणे व्हाट्सअ‍ॅपचे स्टेटस पाहण्यात मग्न होती. कोणाचं गुड मॉर्निंग, कोणाचं स्टेटस देवाचं फोटो, तर कोणाचं सेल्फी होती. ती स्क्रोल करतच होती कि अचानक तिच्या डोळ्यासमोर तिच्याच वर्गमैत्रिणीचा स्टेटस आला.

क्षणभर तिला काहीच कळलं नाही.

त्या स्टेटसवर एकच ओळ होती,

“भावपूर्ण श्रद्धांजली "

सुनिधी मुळापासून हादरली.

तिचे हात पाय थरथरू लागले... आणि हृदय ते तर जोरजोरात धडधडू लागलं होत...

“नाही… हा फोटो तिचा असू शकत नाही.....,”

ती स्वतःशीच पुटपुटली. खात्री करून घेण्यासाठी तिने तीन-चार वेळा तोच स्टेटस पाहिला.
तिचा चेहरा नीट पाहिला.
बोलके डोळे, चेहऱ्यावर हसू, कपाळावरची तीच छोटीशी टिकली......तो चेहरा तिच्या ओळखीचा होता.
खूप ओळखीचा. तिच्याच बेंचवर बसणारी
तिच्यासोबत खेळणारी
तिच्यासोबत भविष्याची स्वप्ने रंगवणारी तिचं होती...

अचानक सुनिधीच्या  हातातून फोन खाली पडला.
तिला एकदम गुदमरल्यासारखं झालं....

“मागच्याच तर आठवड्यात तिच्याशी बोलले होते मी …”

सुनिधीच्या डोक्यात आलं...

तिने पटकन फोन उचलला....त्या मैत्रिणीचा नंबर डायल केला.

रिंग गेली…तिने कॉल उचलला,

" बोल सुनिधी..... "

पलीकडून आवाज आला, इकडे हिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते... कसाबसा आलेला हुंदका तिने आवरला...


“तुझा स्टेटस....... ते खरं आहे का?”

ती कशीबशी बोलू शकली....


" हो... अग... खरं आहे...तिचा भाऊ माझ्या भावाचा मित्र ना... तेव्हा समजलं... "

पलीकडून ती वर्गमैत्रीण म्हणाली....


"पण कस काय.... म्हणजे काय झालं होत तिला...."


सुनिधीने विचारलं... कारण ती आजारी असती तर समजलं असतंच तिला... पण पलीकडून जे उत्तर ऐकायला मिळाल त्यावर तिला विश्वासच बसला नाही.....


" अग... तिने आत्महत्या केली म्हणे..... "


तिने कसातरी कॉल कट केला आणि ती खुर्चीत बसली.
तिच्या डोळ्यांत पाणी तरळू लागलं.

तिला आठवलं, ती किती हुशार होती. किती स्वप्नं बघायची...किती सुंदर दिसायची.. काय येत नव्हतं तिला, drawing, खेळ, मेहंदी, गॅदरिंग सगळ्यात पुढे असायची...अगदी नावाप्रमाणेच मनाने देखील मृदू होती.... मृदुला...

“इतकी कमजोर नव्हती ती मनाने कि आत्महत्या करेल....…”


सुनिधी मनात म्हणाली.

"मग असं काय झालं,की तिला हा मार्ग निवडावा लागला? एका ही शब्दात मला बोलली नाही... कि तिच्या मनाचा थांग मला लागला नाही..."


त्या सकाळी व्हाट्सअ‍ॅपचं ते एक स्टेटस
सुनिधीच्या आयुष्याला कधीच न विसरणारी जखम देऊन गेलं.


काय वाटत काय केली असेल मृदुलाने आत्महत्या?
सुनिधी शोधेल काय कारण??