चहाचा घोट घेण्यासाठी समरजितचा हात पुढे आला, पण बशीतल्या त्या कपाचा कान होता विरूद्ध बाजूला, त्यामुळे त्याचा हात गरम कपावर पडताच तो हात चटका लागून चटकन मागे सरकला. तत्क्षणी तो थोडासा दचकला आणि त्याने मान झुकवून पाहिलं. तिला पाहून स्वतः ला असं भुलवू दिलं होतं त्याने, तो गालातल्या गालात हसला.
त्याच्या हालचालींना बघणारे हॉलमधले इतर सर्व थोडेसे हसले, पण अगदी गालातल्या गालातच. मुलाला मुलगी पसंत होती, हे तर सगळ्यांना दिसलं होतं.
"मुलीला काही विचारायचं असेल तर विचारा." सिंधूचा आवाज त्या स्थिर वातावरणात नाजूकपणे तरंगला.
"आम्ही सर्व माहिती काढूनच आलोत. फक्त या दोघांनी एकमेकांना पसंत केलं म्हणजे बस... काय थोरले चिरंजीव, तुम्हाला मुलगी पसंत आहे का?" सर्जेरावांनी समरजितला पहात विचारलं.
तितक्यात चहाचा एक घोट घेऊन त्याची नजर उठली, पण ती नजर थेट देविकेकडे गेली. गप्पांची पुटपुट थांबली, चहाच्या वाफेतले गोल हवेत विरले, आणि फॅनचा किर्र आवाजही मंदावला.
"पसंत आहे मला."
त्याचा होकार आणि त्या होकारातील आवाज तिच्या मनाला भिडला. नजर झुकवून ती जशी खुर्चीवर बसलेली होती. तिच्या हालचालींनी पायातील पैंजण एक हलका नाद करीत होती. तिने एक नजर वर करून त्याला पाहिलं आणि परत तिची नजर झुकली.
"काय ग...! तुला पसंत आहे ना मुलगा?" सिंधूने देविकाकडे पहात थोडंसं हसत विचारलं.
"मला थोडा वेळ हवा." ती शांतपणे बोलली.
यावर तिथल्या सगळ्यांचं कॉन्स्ट्रेशन हललं!
सगळे एकमेकांना संशयाने पाहू लागले. कोपऱ्यात बसलेल्या दोघी बहिणींची कानाफूसी सुरू झाली. आत किचन मधल्या बायका खुसूपूसू करत बोलू लागल्या. देवीकाचे आई वडील मान झुकवून शांतच होते.
"नाही म्हणजे, आमच्या मुलाविषयी काही शंका आहे का...? आम्ही अशी खात्री करूनच आलोय, की हा संबंध जुळेल... मग आता वेळ कशासाठी हवाय!" सुनैनाबाईंनी विचारलं.
त्यांच्या प्रश्नाला ती शांतच होती. समरजितही शांत नजरेने तिला पहात होता. तिचा होकार त्याने तिच्या नजरेत पाहिला होता, तर मग्?
"हरकत नाही, तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या." असं तो शांतपणे बोलला.
त्याच्या बोलण्यावर तिथं थोडीशी शांतता पसरली. देविकाचे काका आणि वडील एकमेकांत काहीतरी बोलले आणि मग काका पुढे आले, "मी काय म्हणतोय, तुम्हाला बोलायचं असेल तर, तुम्ही दोघंही टेरेसवर जाऊन बोलू शकता. तोपर्यंत आपण इथे जेवणाची तयारी करू."
त्यांच्या बोलण्यात मुलीकडील सगळ्यांनी हो ला हो मिळवला. पण समोर बसलेल्यांना याचा थोडा इश्यू वाटत होता. नेमकं काय बोलायचं आहे? आणि तेही एकट्यात? इथं येऊन आपलं नाक कापायचं होतं, तर बोलवायचंच कशाला?
"हे पहा... या दोघांचं जुळतंय तर आम्हालाही जेवण गोड लागेल. आणि नाही तर, नुसतंच इथे येऊन खाऊन गेलो, असं नको व्हायला." सुनैनाबाई जरा मोठ्या आवाजात बोलल्या.
त्यांच्या थेट बोलण्यावर देविकाने एक नजर समरजितला पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक उदासीनता दिसत होती. तरीही आता तिचं मन पुढे धजेना? तिचा जो प्रश्न होता, त्याचं समाधान होणं गरजेचं होतं.
"अहो इतक्या डायरेक्ट बोलायची गरज आहे का...! यात जेवण गोड न लागण्याचा विषयच कुठून आला...! जे असेल ते एकमेकांशी बोलून सॉल्व्ह होतंय, तर तेच बरं..." सर्जेराव सुनैनाबाईंकडे पहात बोलले आणि जागेवरून उठले.
मधोमध आले जिथे देविका बसली होती आणि एका बाजूला चिरंजिव, "हे पहा मुलांनो, तुमच्या दोघांच्या भवितव्याचा प्रश्न आहे हा... त्यामुळे निर्णय घेण्याआधी काही गोष्टी स्पष्ट होणं गरजेचं असेल, तर तसं झालं पाहिजे... सर्वांसमोर बोलण्यात काही अडचण असेल, तर तुम्ही दोघं वर जाऊन निवांत बोला... तुमचं जे काही ठरतंय ते आम्हाला कळवा, तोपर्यंत आम्ही वाट बघतो."
त्यांच्या बोलण्याला मान देत देविका खुर्चीवरून उठून आत निघून गेली. आणि काकांनी जिना दाखवताच समरजित त्यांच्या मागे पायऱ्या चढून वर आला. तिथं एक ऐसपैस गॅलरी होती, छोटंसं गार्डन आणि चार पाच खुर्च्या. देविका उभी होती तिथेच तो आला, पण ती तिची नजर लपवूनच उभी होती.
"देविका, आज पाहुणे जेवण करूनच जायला हवेत."
काकांच्या बोलण्याला तिने फक्त मान हलवली, समरजित मात्र तिच्याकडे बघून गालातल्या गालात थोडासा हसला. काका तिथून निघून गेले, आता फक्त ते दोघेच होते. तिने हातानेच इशारा करून त्याला खुर्चीवर बसण्याचं सांगितलं.
"तुही बस तिथे."
आधी तो बसला आणि मग समोरच्या खुर्चीवर ती बसली. त्याला थेट विचारणं, काय परिणाम करेल? तिने त्याला न पहाता आज ठरवलं होतं, त्यालाच हो म्हणायचं. पण एक शंका तिच्या मनात राहून जाईल त्याचं काय करायचं?
"तू हो म्हणाली नाहीस, पण नाही ही म्हणाली नाहीस... मग कधी हो म्हणणार आहेस?" त्याने खुप गोड आवाजात विचारलं.
तिची नजर झुकलीच होती. जे तिला विचारायचं होतं, ते फार अवघड होतं. "आज मंदिरात आपलं भेटणं, पूजेची थाळी अदला बदली होणं! आणि मग्,"
तिच्या बोलण्यात एकदमच पॉज आला. तो तिच्या चेहऱ्यावर असणारं कन्फ्युजन समजण्याचा प्रयत्न करत होता, "तिथं आपलं भेटणं योगायोग असेल, असं मला वाटत नाही. ज्याला जे मिळायचं असतं, त्याला दैव कसंही मिळवून देतं. मग ते सुख असो किंवा दुःख..."
त्याच्या बोलण्यावर ती थोडीशी शांतच होती. मग हळूच आवाजात बोलली, "तेव्हा मी तुमच्यासाठी अनोळखी होती, तरीही तुम्ही माझं नाव विचारत होतात. तुम्ही आज मला बघायला येणार होतात, लक्षात होतं ना!"
"हो पण तेव्हा मला हे नव्हतं माहित, ती मुलगी तूच होतीस."
"पण आता समोर आहे मी तुमच्या..! तुम्हाला मंदिरातली ती अनोळखी मुलगी आवडली होती, तर आज माझ्या घरी येणं ऑप्शनला टाकलं तुम्ही... टाईमपास म्हणून यायचंं आणि मला नकार देऊन इथून जायचं, असं ठरवलं होतं तुम्ही."
"मी तुला बघितल्यावर तुला नाकारू कसं शकतो देविका...? नशीबात काहीतरी चांगलं घडणार असेल, तर आधी दैव शूभ शकून देतं, तसाच मंदिरातील तो एक क्षण होता माझ्यासाठी... पण तू तुझं नाव सांगण्याचं दूर ठेवलं, साधं मला वळूनही पाहिलं नाहीस."
"पण तुम्ही कोण आहात? हे समजल्याशिवाय मी तुम्हाला हो कसं म्हणू शकते समरजित? मी तुमच्यातील दोघांनाही कसं निवडू शकते?"
तिचे शब्द ऐकून त्याच्या चेहऱ्यावर न राग, न दुःख आलं. फक्त समजुतीचा भाव उमटला. तो हलक्या आवाजात बोलला, "मी जो कुणी आहे, यापेक्षा मी यावेळी तुझ्यासाठी काय अनुभवतोय ते सांगणं महत्त्वाचं नाही का, देविका?"
"असं म्हणणं सोपं आहे, पण प्रत्येक संबंधाची सुरुवात खऱ्यानेच व्हायला नको का?"
तिच्या शब्दांनी त्याच्या मनावर एक भार पडला.
क्रमशः...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा