Login

तिने त्याला बिघडवलं - भाग ५

लग्न जुळतांना त्याला ती भेटली आणि मग त्याच्या आयुष्यातलं सगळंच बदललं.
टेरेसवर सायंकाळची हवा मंदपणे फिरत होती. सूर्यास्ताच्या किरणांनी तिच्या चेहऱ्यावर हलका सोनेरी रंग पसरवला होता. ती समोर बसली होती, शांत, पण आतून हलकासा वादळ सुरू असलेली.

त्याने खुर्चीच्या हँडलवर हात ठेवला आणि एक मिनिट तिला न पाहता फक्त तिचं अस्तित्व अनुभवत होता. त्याने आधीच होकार दिला होता, त्यामुळे त्याला त्याच्या शब्दावर कायम रहायचं होतं. पण त्याला स्वतःच्या अस्तित्वातही काही कमीपणा आणायचा नव्हता.

जसं काही लोकांना पाहून मन शांत होतं, पण काहींना पाहून मन प्रश्न विचारू लागतं. देविका त्या दुसऱ्या प्रकारातली होती.

"तू खूप विचार करतेस, नाही का?"

त्याचा आवाज मृदू पण नेहमीसारखा आत्मविश्वासपूर्ण होता. ती थोडीशी दचकली, पण काही बोलली नाही, फक्त नजर त्याच्याकडे वळाली.

"मीही विचार केला होता, आज सगळं सोपं होईल... एक होकार, काही हसू, काही शुभेच्छा..." तो मनाशीच हसला, "पण तुला बघून वाटतंय, काही गोष्टींना वेळ द्यायलाच हवा असतो."

तिच्या केसातली क्लिप थोडीशी चमकली. त्याने ते शांतपणे पाहिलं, चेहऱ्यावर एक हलकीशी बट तिने कानाच्या मागे सारली आणि दिर्घ श्वास घेत एक आवंढा गिळला. तिची प्रत्येक हालचाल जशी काहीतरी सांगू पहात होती! तिने गळ्यात घातलेली नाजूकशी चैन, कानातले डूल, हातातील लाल बांगड्या आणि पायातील पैंजण!

अजून काही ठरलंही नाही, पण तिच्या 'मला थोडा वेळ हवा' या वाक्याने जणू त्याच्यातलं सगळंच थांबलं होतं.

"देविका..." तो हलक्या आवाजात बोलला.

"हम्..."

"मी तुला काही सिद्ध करायला इथं आलो नाही... तुला जे जाणून घ्यायचं आहे, ते तू मला डायरेक्ट विचारू शकतेस... पण असं समजू नकोस की मी तुझ्या आयुष्यात जबरदस्तीने यायचं ठरवलंय..."

ती त्याच्याकडे बघत होती, त्या नजरेत शंका नव्हती, पण शोध होता.

त्याने एक दिर्घ श्वास घेतला, "तू म्हणालीस ना, ‘तुम्ही कोण आहात हे समजल्या शिवाय हो कसं म्हणू?’ तुझं बरोबर आहे. पण मीही विचारू का काही?" तिने किंचित मान झुकवत त्याच्याकडे पाहिलं, "तुला मंदिरातला मी आवडलो... होय ना!"

त्या प्रश्नाने त्यांच्या दरम्यानचं अंतर थांबलं. वाऱ्याने दोघांच्या कपड्यांच्या किनाऱ्यांना एकाच दिशेने हलवलं. देविकाची नजर पुन्हा झुकली, पण यावेळी ती गोंधळलेली नव्हती, ती विचारात पडली होती.

तो शांतपणे तिच्याकडे पहात होता. तिचं उत्तर शब्दात नव्हतं पण तिच्या या शांततेतच होकार होता. त्याने उठून गॅलरीकडे पाऊल टाकलं, "मी खाली जातो, देविका. तुला वेळ हवा आहे ना! घे तुझा वेळ. पण निर्णय असा घे, की मंदिरातला मुलगा तुला मिळेल आणि तु खुश रहाशील."

तो जिन्याच्या दिशेने निघून गेला. मागे राहिली फक्त ती आणि त्याचे शब्द. 'निर्णय असा घे, की मंदिरातला मुलगा तुला मिळेल आणि तु खुश रहाशील.'

हॉलमध्ये वातावरण एकदम शांत होतं. सर्वांच्या नजरा दाराकडे वळल्या. दरवाज्याची कडी हलक्या आवाजात उघडली, आणि समरजित आत आला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी सारखं काहीच नव्हतं. न हसू, न राग, फक्त एक निर्विकार शांतता होती. त्याच्या पावलांचा आवाज फर्शीवर उमटत होता.

त्याच्या मागून देविका आत आली. तिच्या चेहऱ्यावर थोडासा ताण दिसत होता, पण नजरेत निर्धार होता. ती थोडी सावकाश चालत त्याच्या मागे उभी राहिली.

त्या दोघांना तिथं पाहून कोणीही बोललं नाही. त्या दोघांतून कोणीतरी काहीतरी बोलेल याची वाट बघत होते सर्व. फक्त घड्याळाचा काटा टकटक करत राहिला, पण कोणी पुढे येईना. सगळ्यांना जाणवत होतं, काहीतरी होणार आहे, पण नेमकं काय, हे कुणालाच माहित नव्हतं.

देविकाचे काका पुढे झाले, पण तेही तिच्या समोर शांतच उभे होते. ती काहीतरी बोलेल आणि या हॉल मधलं टेन्शन दूर करेल. पण ती फक्त समरजितच्या पाठीला बघत उभी होती.

"पोरी... काय ठरवलंस तू...?"

"मी ह्यांना जेवायला वाढते. काका... ह्यांना सांगा, हे मला पसंत आहेत."

काकांनी थोडं हसत मान डोलावली.

ही तर समरजितसाठी एकदम धक्का देणारी पण सुंदर क्लोजर लाईन होती. त्याने मागे वळून पाहिलं, तेव्हा परत तिची नजर झुकली, पण यावेळी तिच्या ओठांवर लाजरं हसणं उमटलं होतं.

हॉलमध्ये दाटलेल्या शांततेचा ताण कमी झाला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक छानसं हसणं खुललं होतं. तो काही बोलला नाही, फक्त हात जोडून थोडा मागे सरकला.