Login

तिने त्याला बिघडवलं - भाग ७

लग्न जुळतांना त्याला ती ती भेटली, आणि मग त्याचं सगळंच बदललं.
घराच्या ओसरीत पिवळसर दिव्यांचा उजेड पसरला होता, तिथेच सर्वजण जमले होते. पाहुण्यांना निरोप देत देविकाचे बाबा थोडे नमत, पण नम्र हसत सगळ्यांशी बोलत होते.

सुनैनाबाई हळूच देविकाच्या आईजवळ आल्या आणि हसत म्हणाल्या, "ताई, खूप मनापासून व्यवस्था केलीत. सगळं अगदी घरगुती पण एवढ्या आपुलकीने भरलेलं की खूप छान वाटलं. तुमची मुलगी... काय सांगू... सोन्यासारखी दिसते!"

आईच्या चेहऱ्यावर थोडंसं समाधान पसरलं. तेवढ्यात सिंधू देविकाच्या बाबांना म्हणाली, "आम्हाला तर सुरुवातीपासूनच वाटत होतं हे नातं पक्कं व्हावं. आता लवकर तारीख पक्की करा..."

तिच्या बोलण्यातून तिने सगळ्यांना थोडं अलगद हसवलं. देविका घराच्या चोपड्यावर उभी होती, आवाज तिच्यापर्यंत स्पष्ट येत होता. समरजित तिथे शांत उभा होता, पण त्याने तिच्याकडे एक शांत कटाक्ष टाकला तेव्हा तिच्या गालांवर लालसर लाज चमकली. तिच्या छातीत एक नाजूक धडधड उमटली. लग्नाची तारीख ठरत होती. तिला जाणवलं तिच्या आयुष्याचा मार्ग आता खरंच बदलतोय.

आलेल्या पाहुण्यांनी निरोप घेतला आणि सर्व गल्ली थोडीशी आपसातील बोलचालीतून अशांत झाली. कोण काय बोलू लागलं तर कोण काय! आपल्या या छोट्याशा गल्लीत एवढी मोठी माणसं येऊन जाणं म्हणजे आपली देविका जशी परदेशी निघाल्या सारखं वाटत होतं सगळ्यांना.

समरजित कारच्या मागच्या सिटवर बसलेला होता. बाजूला जागा होती, तरीही त्याने तिथं कुणालाच बसू दिलं नव्हतं, तो एकटाच रेलून बसला होता. हातात मोबाईल धरून त्या स्क्रिनवरचा फोटो बघत.

लांबचा प्रवास होता पण मध्येच कुठेतरी गाडी थांबली आणि त्याने उठून पाहिलं, "मम्मी काय झालं गं...?"

"काही नाही... या दोघींना काहीतरी खायचंय..."

"एवढं खाल्लं ना तिथं... आता काय राहिलंय...?" त्याने जरा ओरडून विचारलं.

बाहेर अंधार वाढत चालला होता, लवकर कोल्हापुरात पोहचायचं होतं, त्यात इथं उगाच वेळ जाणार होता.

"दादा तू येणार आहेस का...?" पिंकीने विचारलं.

त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं, एका हॉटेल समोर कार उभी होती. वर बोल्ड अक्षरात लिहीलं होतं, 'चिकन करी – चिकन फ्राय – तांबडा रस्सा – पांढरा रस्सा – भाकरी.'

"मला नाही भूक... मी जेवलो पोटभर." त्याने आता शांतपणे उत्तर दिलं.

"हो ना... जेवण वाढणारी तशीच होती, मग भरणारच ना तुझं पोट!" पिंकीने हसत हसत चिडवलं.

"तु जातेस का आता...?" त्याने जरा रागीट टोनमध्ये बोलताच ती गुपचूप गाडीतून बाहेर निघून गेली.

बाहेर रस्त्याच्या कडेला छोटे-छोटे दिवे पिवळसर उजेड पसरवत उभे होते. त्या मंद उजेडात समरजित बाहेर येऊन कारजवळ उभा राहिला. कानांवर अजूनही तिच्या बांगड्यांची खणखण ऐकू येत होती की काय, त्याला स्वतःलाच कळेना. त्याने काचेला टेकलेल्या हाताकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात थोडासा थकवा होता, पण मनात एकच गोष्ट सतत उसळत होती — देविका.

तिच्या गालांवर उमटलेली लाज, तिचा नजरेचा साधा कटाक्ष, तिचं शांत उभं राहणं. त्या वेळेने त्याच्या सगळ्या आतल्या अस्वस्थतेला नवा आकार दिला होता, "तिच्या सोबतच आयुष्यभर रहायचं."

त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. पण लगेचच त्याचे अंगठे पुन्हा मोबाईलवर तिच्या फोटोवर थांबले. तिचे ते पाणीदार डोळे, लाल चुटूक ओठ आणि त्या फोटोतील तिच्या हास्यात त्याला काहीतरी अनामिक ओढ वाटली. ती जशी गालावरील केसांची बट मागे सारत त्याच्याकडे पहात होती, तिरप्या नजरेने! मनान हुरहूर लागली... तिला पुन्हा भेटण्याची.

त्याने सहजच तिचा नंबर शोधला आणि त्यावर एक साधा टेक्स्ट केला, — 'हॅलो...'

देविकाच्या रूममध्ये प्रकाश मंद बल्बचा होता. साडी नीट घडी करून ठेवतांना तिचे हात थोडे थरथरत होते. हृदयाचा ठोका अजूनही समरजितच्या कटाक्षात अडकलेलाच होता. पाहुणे गेले होते, घर शांत झालं होतं, पण तिच्या मनात सगळीकडे आजच्या दिवसाचा धूसर गुलाबी रंग पसरला होता. मंदिरात त्याचं भेटणं आणि पूजेची थाळी अदला बदली होणं. खरं तर तिथेच नियतीने एकमेकांना भेटवलं होतं पण ओळखलं नव्हतं.

तितक्यात तिच्या मोबाईलचा छोटासा ‘टिंग’ आवाज झाला.
ती दचकल्यासारखी वळली. स्क्रीन उजळली.

'हॅलो…'

तिच्या बोटांना अचानक जडपणा जाणवला. एवढे साधे शब्द होते, तरी कसं अनामिक धडधड घेऊन आले होते! तो नंबर सेव्ह नसला तरी त्याचा फोटो दिसत होता. तिने उशीत चेहरा दडवला. स्वतःलाच हसू आलं, 'काय रिप्लाय करू?' तिला काहीच सुचत नव्हतं.

देहभर पसरलेली उब, मनात उगवणारी हळवी गोडशी लज्जा. तिने मन एकवटलं आणि शांतपणे टाईप केलं —
'हाय... तुम्ही पोहोचलात?'

त्या दोन शब्दांमध्येही तिचा संकोच, लाज आणि नव्याने सुरू होणाऱ्या नात्याची गोडशी भीती लपलेली होती.

दरम्यान, समरजित कारजवळ टेकून उभा होता. मेसेजचं नोटिफिकेशन दिसताच त्याच्या चेहऱ्यावर नकळत आलेलं हसू तो लपवू शकला नाही. तिने रिप्लाय केला होता!

तो पुन्हा पुन्हा स्क्रीनकडे बघत राहिला, तिचाही फोटो वर दिसत होता. त्या छोट्याशा वाक्याने त्याच्या थकलेल्या दिवसात एक मऊ, उबदार प्रकाश ओसंडून वाहत होता.

त्याने लगेच मेसेज टाईप केला— 'अजून नाही... पण तुझा मेसेज मिळाला ना, म्हणजे अर्धा प्रवास सुंदर झाला.'

त्याचे शब्द वाचून ती स्वतःशीच हसली — 'ओके'

दोघांनाही कळून चुकलं होतं, आज काहीतरी बदललंय.

फोनमध्ये त्या फोटोतही तो तिच्या डोळ्यांत पुन्हा पुन्हा पाहत होता. जसं तिच्यात एक स्वप्न रंगलं होतं, ज्यात हरून जातांना त्याचं एक वेगळं जग तयार होत होतं.