किचनमध्ये एकदमच सगळ्या बायकांचा घोळका जमला होता. चहा पाणी देत पुढे पुढे करण्यासाठी लहान मुलीला पाठवलं. हॉलमध्ये सगळे बसले होते, तेवढ्यात अनन्या पाणी घेऊन आली. एकेक करत तिने हातातील ट्रे सगळ्यांसमोरून फिरवला, तसं ग्लास उचलले गेले. थोड्या वेळाने ती किचनकडे आली.
"दोन्ही मुलं हॅन्डसम आहेत, नक्की कोणता बघायला आला तुला...?" अनन्या हलक्याशा आवाजात देविका जवळ येत फुसफूसली.
देविका शांतच होती. तिला समजलं होतं, पण तरीही अजून नक्की कोण ते माहित व्हायचं होतं. हॉलमध्ये सगळे एकमेकांना बघत ग्रीट करत होते.
देविकाचे वडील थोडे शांत स्वभावाचे असल्याने सिंधूने बोलायला सुरूवात केली, "आप्पा... तसं मी तुम्हाला आधीच सगळं सांगीतलंय, पण तरीही एक रित आहे म्हणून आपली ओळख करून देते... हे आहेत सर्जेराव इनामदार, आणि या त्यांच्या पत्नी सुनैना इनामदार... हे त्यांचे थोरले चिरंजीव समरजित इनामदार, यांच्यासाठीच आपल्या देविकाला मागणी घालायला आलेत..."
सिंधूचा आवाज देविकाच्या कानावर अस्पष्ट होत गेला आणि ती दरवाजातून थोडीशी बाजूला सरकली. सरला काकी आणि मामी तिला थोड्याशा हसल्या, तेव्हा तिही थोडंसं हसली आणि आत निघून गेली. तिला त्याचं नाव समजलं होतं, आणि त्याला तिचं नाव समजलं होतं.
देविका आणि समरजित...
तिने स्वतःला एकदा आरशात बघितलं, टिकली थोडीशी कपाळावर मधोमध सरकवली आणि केसांमधला गजरा मोकळा केला. लांब वेणीचा शेंडा थोडासा झटकला आणि पुन्हा ती वेणी तिच्या पाठीवर सोडली.
"चल, चहा घे..." मामीने हळूच येऊन तिला सांगीतलं.
मान झुकवून ती किचनमध्ये आली, तिच्यावर सगळ्या बायकांच्या नजरा होत्या. कुणी तिचा पदर निट करून देत होतं, कुणी निऱ्यांच्या निट घड्या दाबून देत होतं तर कुणीतरी चहाचा ट्रे तिच्या हातात आणून दिला.
हॉलमध्ये बसलेल्या पाहुणे मंडळीत महत्वाच्या गप्पा सुरू होत्या. अधून मधून छताकडे मान करत, गरगर फिरणारा फॅन बघत आणि एक मोठा सुस्कारा सोडत. कोपऱ्यात कॉर्नर टेबलवर असलेल्या एका फोटोला बघण्यासाठी समरजित थोडासा पुढे सरकला, पण त्या फोटोत साडी नेसलेली मुलगी कोण होती? हे त्याला दिसेना!
"किती कोंदटलेलं घर आहे ना!" दोघी बहिणी जवळ येऊन खुसूपुसू बोलू लागल्या. ओढणीने तोंडावर मानेवर वारा घालत होत्या, मधूनच घामाचे थेंब पुसत आणि दरवाजातून बाहेर बघत, "मी आणखी थोडा वेळ इथेच बसली ना, तर मला सफोकेशन व्हायला लागेल."
"मुलगी कधी येईल ती येवो, आधी त्या खिडकीचा पडदा बाजूला सार." तिने हात करून हळूच सांगीतलं आणि दुसरीने लगेच हात पुढे करत तो पडदा बाजूला सरकवला.
तेवढ्यात तिथं त्या खिडकीच्या फर्शीवर तेलाचे डाग दिसले, त्यावर धूळ चिटकलेली होती. दिवाळीच्या दिव्यांचे ते काळपट रंगाचे डाग पाहून त्या दोघींनीही एकमेकांना बघत ओठ बाहेर काढले, "काय ए हे...?"
त्या दोघी बहिणींचं आपलं वेगळंच सुरू होतं. तितक्यात चहाचा ट्रे घेऊन देविका हॉलमध्ये आली आणि समरजितचं तोंड आश्चर्याने उघडलं गेलं.
जी मुलगी त्याने मघाशीच मंदिरात पाहिली होती, तिलाच बघायला तो आला होता. तिचं नाव देविका होतं. तिचा आणि त्याचा योगायोग जुळून येणार हे तर देवीनेच ठरवलं होतं.
तो मनातल्या मनात हसला.
तिचं येणं आणि त्याचं मनात हसणं! सगळ्यांना भावलं!
एक गोड हसणं तिथं सगळ्यांच्या ओठांवर दिसत होतं, पण कोणीच काहीच बोलत नव्हतं. तिच्या हातून चहाचा ट्रे सगळ्यांसमोरून फिरवला आणि नंतर तो टेबलवर ठेवून ती समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली. थोडंसं मान वर करून तिने त्याला पाहिलं, तेव्हा तो पुन्हा एकदा मनातल्या मनात हसला. पण कुणीतरी तिच्या तोंडावर थंड पाणी मारल्यासारखं ती शांतच बसली होती.
एक मिनिटासाठी ती नजर झुकवून साडीचा कोपरा हातात धरून खोल विचारात गढून गेली. त्याचं तिला मंदिरात भेटणं आणि इथे परत भेटणं फार वेगळी गोष्ट होती. त्याला आज इथेच यायचं होतं, आपल्यासाठी. तर तो मंदिरात एका अनोळखीला तिचं नाव का विचारत होता? तिथं त्याच्या डोळ्यांत जे दिसलं होतं, ते काय होतं?
'आपल्याला एक ऑप्शन समजून इथे आला का तो?'
तिने परत एक नजर वर करून त्याला पाहिलं आणि यावेळी तो थोडासा पाठ टेकून बसला, तिच्या नजरेला गोड प्रतिसाद दिला. तिच्या गोऱ्या गालावर थोडीशी लाली पसरेल, किंवा खळी खुलेल असं त्याला वाटलं. पण ती साधं एक स्माईल देत नव्हती त्याला! मंदिरातही असाच ॲटिट्युड दाखवत होती.
ती त्याला तिथेच खुप आवडली होती, आणि इथे आल्यावर तिच्याशीच आपलं जुळणार हे मनाशी ठरवलं होतं.
क्रमशः...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा