हॉलमधील तणाव ओसरला, पण वातावरणात अजूनही एक नाजूकसा कंप होता. कुणीतरी भिंतीच्या कोपऱ्यात मंद आवाजात कुजबूज करत होतं. स्वयंपाक घरातून हलक्या वाफेसोबत वेलचीचा, तुपाचा सुगंध येत होता.
"मला वाटलं होतं, की तांबडा पांढरा रस्सा असेल! पण कसल्यातरी गोडाचा वास येतोय." नाक मुरडत दोघी बहिणींची हळूच कुजबूज सुरू होती, "आपण जातांना चिकन सिक्स्टी फाइव्ह खाऊन जाऊ."
"अगं पण इथे कुठे मिळतंय चिकन?"
"आहे... तिकडे हायवेच्या कॉर्नरला, जिथून आपली कार आतमध्ये वळाली. मला लक्षात आहे ते हॉटेल."
"बरं मग, इथे कमीच खा... तिकडे गेल्यावर पोटभर खाऊ."
कुणी पाहिलं तर हसायचं आणि हळूहळू खुसुफूसू करायचं सुरू होतं त्यांचं. आपल्या भावाला शोभेल तशी मॉडर्न देविका दिसत नव्हती, तरीही आता पुढचं काय ते सगळं मोठीच माणसं ठरवणार होती.
फर्शीवर सतरंजी अंथरली होती, त्यावरच सगळ्यांना जेवणासाठी बसायचं होतं. मुलीचं घर पाहूनच परिवाराची साधीसूधी परिस्थिती समजली होती, पण आपल्या घरी एवढे मोठे पाहूणे येणार असल्यावर तरी ह्यांनी तशी व्यवस्था करायला हवी होती!
फर्शीवर बसून नातेवाईकांची कुजबूज सुरू होती, प्लेटांची खणखण, आणि बाहेरून येणाऱ्या वाऱ्याचा हळवा स्पर्श. सगळं रोजच्या सारखं, पण आज काहीतरी वेगळंच भासत होतं.
देविका स्वयंपाकघरातून ताटं घेऊन बाहेर आली. तिच्या चालण्यात घाई नव्हती, पण संकोच आणि जबाबदारीची एक सुंदरशी साखळी पैंजणांसारखी तिच्या पावलांना बांधली होती. तिने पहिलं ताट सर्जेरावांसमोर ठेवलं.
"गरम आहे अजून... सावकाश घ्या," ती हळू आवाजात बोलली.
समरजित उजव्या बाजूला बसला होता. चेहऱ्यावर शांतता होती, पण मनात एक अनामिक धडधड सुरु झाली. देविका पुढचं ताट घेऊन त्याच्यापाशी आली. तिच्या हातांनी ताट ठेवताना येणारा हलका थरथरता कंपन त्याला जाणवला. तिच्या बांगड्या मंद स्वरात खणखणल्या. तिने भाजीचा वाडगा उचलून त्याच्या ताटात वाढताना सगळ्यांचे कान त्यांच्याकडेच थांबले.
"बस... एवढं पुरे," तो बोलला.
तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याचा आवाज कठोर नव्हता, खूप सभ्य, पण एक अंतर राखूनही काळजी दाखवणारा होता.
"थोडं अजून घ्या... तिची सवय आहे कमी वाढायची," काकूने हसत म्हटलं आणि तिथे हलकीशी हशा पसरली.
तिने पुन्हा हसून त्याच्याकडे पाहिलं, आणि तिच्या डोळ्यात एक न सांगता येणारी उबदार चमक दिसली. तोही हळूच हसला, पण त्याच्या हसण्यात आज पहिल्यांदा एक मुलगा म्हणून मऊपणा जाणवत होता.
सगळे जेवत होते, पण देविका फक्त वाढत होती. तिची नजर अधूनमधून समरजितकडे जात होती. कधी त्याच्या पाण्याच्या ग्लासाकडे, कधी ताटाकडे. त्याने एक घास घेतला आणि तिला नजरेनेच पाणी मागितलं. तिने लगेच ग्लास पुढे धरला.
त्या दोघांच्या न बोलल्या जाणाऱ्या नात्याची पहिली दोरी तिथेच बांधली गेली. तिची नजर त्याच्या ताटावर गेली, त्यातील भाकर संपलेली होती. तिने प्लेट मधून भाकरी आणून त्याच्या ताटात ठेवली.
समरजितने तिला पहिल्यांदाच साधं "थॅन्क यू" म्हटलं.
त्या एक शब्दाने तिच्या चेहऱ्यावर लाजरं हसू उमटलं. जसं पहिल्या पावसात मोगरा फुलतो.
त्या एक शब्दाने तिच्या चेहऱ्यावर लाजरं हसू उमटलं. जसं पहिल्या पावसात मोगरा फुलतो.
आजुबाजूला सर्वच बोलत होते, हसत होते. पण त्या दोघांचं जग एका छोट्याशा वर्तुळात थांबून पाहत होतं, पुढे काय उगवणार आहे ते शांतपणे जाणून घेण्यासाठी.
जेवण होताच तो बाहेर आला आणि मग हलकेच पडद्याच्या आत डोकावून तिला बाहेर येण्यासाठी खुणावलं. ती थोडीशी लाजली, इकडे तिकडे पाहिलं आणि त्याच्या जेवणाचं ताट आत नेऊन ठेवलं. आता तिला त्याला भेटायला कोणीही नाही म्हणू शकत नव्हतं, की तिच्यासाठी सगळ्यांची परमिशन मिळण्याची तिने वाट बघावी, अशी सिच्युएशन नव्हती ही.
ती मागच्या दरवाजाने बाहेर आली, तिथून तिने अंगणातून चालत येत त्याला पाहिलं. तो फोनमध्ये काहीतरी बघत होता आणि ती समोरून आली. तिच्या ओठांवर लाजेचा साज चढला होता, त्याच्या नजरेला प्रतिक्रिया देत ते ओठ थोडेसे थरथरत होते, तिची नजर थोडीशी लपत होती.
"थॅंक्स..." तो हळूच आवाजात बोलला. ती फक्त मान झुकवून उभी होती तिथे, आणि तो तिच्या हातांकडे बघत उभा होता. ती जशी हातांना एकमेकांत गुंफून उभी होती, तो तिच्या बाजूला येऊन उभा राहिला, "एक सेल्फी घेऊ..."
तिने हळूच नजर वर करून त्याच्या फोनच्या कॅमेरात पाहिलं. त्याने हात तिच्या खांद्यांपर्यंत आणला होता, पण तो हात तिच्या खांद्यावर ठेवायला शरम वाटत होती. तिला त्याचा थोडासाही टच् न होऊ देता त्याने एक सेल्फी क्लिक केला. पण एकमेकांच्या इतक्या जवळ उभं राहिल्याने एक अनामिक ऊब जाणवली होती, ती दोघांच्याही मनाच्या कोपऱ्यात नवीन काहीतरी खुलवत होती.
तिने वळून त्याच्याकडे पाहिलं. त्या फोनमधली ती आणि त्याच्या समोर उभी असलेली ती. फोटो पाहतांना त्याच्या चेहऱ्यावर नकळत एक मऊ असं हास्य उमटलं, "तू माझ्या बरोबर येईपर्यंत हा फोटोच बघून खूश होईन मी."
त्याच्या बोलण्यावर ती थोडीशी हसली, "मी… आत जाते आता. सर्व शोधतील मला."
त्याने तिच्या शब्दांच्या पलीकडे काहीतरी ऐकल्यासारखं वाटलं. ती ‘जाते’ म्हणत होती. पण तिच्या आवाजात ‘थांब’ असं काहीतरी दडलेलं होतं.
"देविका..." तो पुन्हा एकदा तिला हाक मारत, दोन-तीन पावलं तिच्याकडे पुढे सरकला.
ती थांबली. वाऱ्याने तिच्या केसांची एक बट अलगद गालावर आली होती. तिने ती बट कानामागे करत वर पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक शांत प्रश्न होता. त्याला हा प्रिशियस मोमेंट साठवून ठेवायचा होता.
"नंबर एक्सचेंज करतेस का?" त्याचा आवाज खूप मंद, पण अगदी आदराने भरलेला होता.
त्याच्या प्रश्नाने तिचे डोळे मोठे झाले, "नंबर!"
त्याने एक छोटीशी खळी पडेल अशी हसू मिसळलेली कळीदार स्मित दिली, "म्हणजे, तुला द्यायचा असेल तरच... लग्न जुळतंय आपलं, काहीतरी केव्हातरी महत्वाचं बोलायचं असतं, त्यासाठी."
"९७६५******..." तिने मान झुकवली. तिच्या पैंजणाचा एक छोटासा झंकार आला.
"माझा मेसेज येईल तुला."
ती छानसं हसणं चेहऱ्यावर आणत आत निघून गेली. अजूनही काहींची जेवणं सुरू होती, आणि बाकीचे उठून सोफ्यावर बसले होते. समरजित बाहेरच बसलेला होता, त्याचा आणि तिचा एकत्र फोटो बघत.
क्रमशः...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा