Login

टिंगू नानाची करामत! भाग 1

गोष्ट बाळाची
"अभिनंदन! मुलगा झाला." हे ऐकून स्वीटीच्या सासुबाईंचा, आनंदीबाईंचा आनंद गगनात मावेना. त्या चक्क बातमी सांगणाऱ्या डॉक्टरांच्या गळ्यातच पडल्या.

"बाळ कसं आहे?"

"एकदम उत्तम."

"आणि बाळंतीण?"

"उ..त्त..म. ती शुद्धीवर आली की तुम्ही भेटू शकता." असं म्हणत डॉक्टर बाई निघून गेल्या.

काही वेळाने स्वीटीला रूममध्ये शिफ्ट केलं. त्याआधीच मावशी बाळाला घेऊन तिथं बसली होती.

"ए, हा कोणासारखा दिसतो रे? आई की बाबा?"

"ते आत्ताच कसं कळेल?" स्वीटीचे सासरे, गोविंदराव म्हणाले आणि त्यांनी बाळाला अलगद कुशीत घेतलं.

"माझ्याआधी तुम्ही का घेतलंत? आणा त्याला इकडं." आनंदी बाई लटक्या रागाने म्हणाल्या. तसे सगळे हसायला लागले.

"शु..$$ हे हॉस्पिटल आहे. इथं दंगा नको." कोणीतरी म्हणालं. मग आळीपाळीने सगळ्यांनी बाळाला जवळ घेतलं.

"ए टिंगू.. इकडं बघ." अभिषेक टिचकी वाजवत म्हणाला.
"असं काय बोलवतोस? घे त्याला. तुझंच बाळ आहे ना!" आनंदी बाई लेकाला म्हणाल्या.
"कित्ती छोटं आहे ते! मला घेता येत नाही गं. " अभि चेहरा पाडून म्हणाला.
"हे बघ असं घ्यायचं. आपल्या हाताच्या कोपरावर त्याचं डोकं यायला हवं." स्वीटीचा भाऊ, निहार म्हणाला. त्याप्रमाणे अभिषेकने बाळाला जवळ घेतलं.
"आई, हा आपल्या नानांच्यासारखा दिसतोय ना?
"हो रे. तेच म्हंटलं, कोणासारखा दिसतोय हा?" स्वतःच्या वडिलांचा उल्लेख ऐकून गोविंदराव एकदम पुढं आले.

"आले लगेच." आनंदी बाई पुन्हा लटक्या रागाने म्हणाल्या. तसे गोविंदराव मागं सरकले. "मुलं असतातच आपल्या आजोबांसारखी. म्हणजे त्या कुळातली." ते गालातल्या गालात हसत म्हणाले.

"स्वीटू, बरी आहेस ना?" अभिषेक आपल्या बायकोच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. उत्तरादाखल तिने फक्त मान हलवली.

"चला, आता इथं दंगा नको. बाकीचे पेशंट पण आहेत. मूल काय फक्त आपल्यालाच झालंय का? त्या शेवटच्या रूममध्ये तर जुळी मुलं आहेत. कसं काय करणार बाई त्यांचं?" आनंदी बाई म्हणाल्या.
"आत्ता मी आणि मावशी इथं थांबतो. बाकीचे घरी जा आणि उद्या येताना नाश्त्याचा अन् जेवणाचा डब्बा घेऊन या. स्वीटीला अजून काही खायचं नाहीय. जेव्हा सांगतील तेव्हा बघू."

"अगं, ते बघ बाळ एका अंगावर झोपलाय." अभिषेकची बहीण इरावती किंचाळत म्हणाली.

'Gen beta' जनरेशन आहे ती. उद्या उठून पालथं पडलं तरी आश्चर्य वाटायचं कारण नाही." निहार म्हणाला.

"चला, बाय बाय टिंगू नाना." अभिषेक बाळाची पापी घेत म्हणाला.

"ए, काय नाव हे? त्यापेक्षा मी बंबी म्हणते. ए, बंबू.. शोन्या.. बाय." इरावती फ्लाइंग किस देत म्हणाली आणि सगळे बाहेर पडले.

"आणि मला?" निहार इरावतीला हळूच डोळा मारत म्हणाला.

"तुला कशाला? लहान आहेस का तू?"

"बाळाची मामी व्हायचंय ना तुला?"

"हो. मग? कोई शक?" तसे दोघे हसायला लागले.