टिट फॉर टॅट भाग 1
©️®️ शिल्पा सुतार
ईरा चॅम्पियन ट्रॉफी 2025
मनाला सांभाळा. मन प्रसन्न तर सगळं चांगलं. कधी कधी स्वतःसाठी थोडं स्वार्थी झालं तर काय हरकत आहे? शेवटी आपण महत्त्वाचं. संगिता पोळ्या करत रेडिओ ऐकत होती. ती थोडी हसली. या नुसत्या बोलायच्या गोष्टी आहेत. इथे कोण कोणाला जपतं? सगळे सात जन्माचे वैरी असल्यासारखं करतात.
कुठे असतील हे असे प्रोग्राम करणारे लोक? जे दुसऱ्याचं मन जपत असतील. इकडे तर सगळा आनंदी आनंद आहे. माझ्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे, समजत नाही.
तिने मुलांचे डबे भरले. राकेशचाही डबा बाहेर काढला. भरू का? आज तरी हे माझ्या हातचं खातील का? माहिती नाही. तिला टेन्शन आलं होतं.
संगिता मुलांना सोबत बसस्टॉपवर उभी होती.
"पिंकी, राजू ऑफ पिरियडमध्ये अभ्यास करा. परीक्षा जवळ आली आहे. राजू, होमवर्क टीचरला दे."
"हो आई." राजू म्हणाला.
"आई, तू ही काळजी घे. आजी आणि बाबांकडे लक्ष देऊ नकोस." पिंकी म्हणाली.
"हो बेटा, माझी काळजी करू नकोस." तिने तिला जवळ घेतलं. अगदी नऊ वर्षांची लेक पण कशी समजूतदार आहे.
बस आली. मुलं शाळेत गेली. पिंकीच्या वर्गात असलेली श्रुतीची आई राधिका तिच्या सोबत बोलत होती. संगीताला घरी यायची घाई झाली होती. तिचं बोलणं झालं. ती पटकन घरी निघाली.
कामाच्या वेळी ही काय ही राधिका बोलत बसते, समजत नाही. किती रिलॅक्स दिसते. त्यांच्याकडे काही टेन्शन नसेल का? तिच्यावर कोणी ओरडत नसेल का? किती कॉन्फिडंट, सुंदर दिसते.
मी मात्र नेहमी घाबरलेली असते. आमच्याकडे वातावरण तसंच आहे. हे असं का करतात, समजत नाही. मला बरोबरीचं समजत नाही. नेहमी रागात असतात.
चार दिवस झाले, तिचा नवरा राकेश तिच्याशी बोलत नव्हता. सासुबाई मीनाताई ही नीट वागत नव्हत्या. त्या नेहमी राकेशला भांडायला प्रोत्साहित करत होत्या. ते दोघं मिळून मला त्रास देतात. ते कमी तर नणंद रश्मी येतेच अधूनमधून.
काय करावं? आयुष्य असंच वाया जात आहे. मुलंही घरात घाबरलेली असतात. मी पण.
देवाचं नाव घेत ती घरी आली. बाजूच्या मावशी बाहेर रांगोळी काढत होत्या, त्यांच्या सोबत ती थोडं बोलली. त्या खूप समजूतदार आणि चांगल्या होत्या.
मीनाताई आवरून पुढच्या कॉटवर बसल्या होत्या. राकेश आत असेल, ती बघायला गेली नाही. तिने उपमा, चहा पुढे ठेवला.
"दोघांना एकदम देशील. चहा घेऊन जा. उपमा खाऊन झाला की गरम करून आण. तुला अजूनही सगळं सांगावं लागतं का संगीता? लग्नाला इतकी वर्षं झाली, अजून समज नाही. आमच्या माथी हा मठ्ठ गोळा आला." मीनाताई डाफरल्या.
संगिता दोन्ही कपबश्या घेऊन आत गेली. ओट्याजवळ उभी राहिली. तिला काय करावं, सुचत नव्हतं. कोणत्या गोष्टीवरून काय होईल? कोण चिडेल? सांगता येत नाही. तिला धडधड होत होती. तिच्यात कॉन्फिडन्स नव्हता.
लग्नाला दहा वर्षं झाली. तेच सुरू होतं. एकही दिवस नीट शांततेत गेला नव्हता. राकेश, मीनाताई कसेही वागत होते. नेहमीच होतं. काहीही झालं की तो तिच्याशी बोलत नव्हता. त्याला तशीच घाण सवय होती. प्रत्येक गोष्टीत तिलाच दोष द्यायचा. आठवडाभर तेच चालायचं. किती हा मानसिक त्रास! किती सहन करणार? तिलाच मनधरणी करावी लागायची. त्याचा ही फारसा उपयोग व्हायचा नाही.
---
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा