Login

टिट फॉर टॅट भाग 2

जश्यास तसे वागावे
टिट फॉर टॅट भाग 2

©️®️ शिल्पा सुतार

ईरा चॅम्पियन ट्रॉफी 2025

संगीताला संसार वाचवायचा होता. कितीही केलं तरी तो तिच्या मुलांचा बाबा होता. बिचारी त्याच्या मागे-मागे करत असायची. हे घ्या, ते घ्या. त्याच्या आवडीच्या वस्तू बनवायची. पण तो ही हिडीस-फिडीस करायचा. ती मुलांना सांभाळून चांगला संसार करत होती, पण आता ती खूप कंटाळली होती.

असे लोक कधी बघितले नव्हते. ती सुखी कुटुंबातून आली होती. माहेरी बाबा, दादा किती समजूतदार अगदी घरात मदत करणारे, प्रेमाने वागणारे. इथे राकेश तिरसटासारखा वागायचा. तिला काय करावं असं व्हायचं.

राकेश आवरून बाहेर आला. प्लेट हातात घेऊन थोडा उपमा खाल्ला. संगीताने पटकन चहा गरम केला. कप घेऊन ती पुढे आली. चहा समोर ठेवला. त्याचा डबा भरला, तो पुढे नेऊन ठेवला.

ती तशीच सोफ्याजवळ उभी होती. तिला कोणीही "खा" असं म्हणालं नाही. चहा घेऊन राकेश निघाला. त्याने डबा घेतला नाही. उपमा तसाच पडला होता.

"अहो..." ती त्याच्या मागे डबा घेऊन धावली. त्याने तिच्याकडे पाहिलंही नाही. तो लिफ्टमध्ये शिरला.

तिला खूप वाईट वाटत होतं. नेहमीच असंच होतं. याची सुरुवात लग्नाच्या पहिल्या महिन्यापासूनच झाली. काही झालं की अबोला धरायचा. तेव्हाच तिला वाटत होतं, यांच्यासोबत राहूच नये, कुठेतरी निघून जावं.

एक चान्स देऊ, म्हणता-म्हणता मुलं झाली. उगीच या सगळ्यांमध्ये मन अडकवलं. उगीच इतका संसार वाढवला आणि आता दिवसेंदिवस त्याचा त्रास वाढत होता.

प्रत्येक वेळी माहेरी कार्यक्रम असला की हे चिडलेलेच असतात. कुठे जायचं म्हटलं की धडकी भरते. आज तिला खूपच राग आला होता. सगळं नको-नको वाटत होतं.

बाजूच्या मावशी दारातून तिच्याकडे बघत होत्या. त्यांना समजलं, आजही काहीतरी झालं आहे.

ती आत आली. मीनाताई डब्याकडे बघत होत्या. एक कुत्सित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर होतं की कस, माझ्या मुलाने तुझ्याकडे लक्ष दिलं नाही. तुला तुझी जागा समजली का?

"संगीता, हा उपमा आतमध्ये ने. एक पदार्थ धड बनवत नाहीस. म्हणून राकेशने डबा घेतला नाही."

"मी काय करू, आई? सांगा ना. हे माझ्याशी बोलत नाहीत. तुम्ही तरी त्यांना समजावून सांगा." आता ती कधीही रडेल असं वाटत होतं.

इथे लोकांच्या मुलांचे संसार नीट होत नाहीत म्हणून आई-वडील किती टेन्शनमध्ये असतात. आमच्याकडे उलट आहे, आईच भांडण करायला उकसवतात. त्यांना वाटत नसेल का माझा मुलगा, सून सुखात राहावं?

"तू त्याच्या मनाप्रमाणे वागत नाहीस. तो कंटाळला असेल," मीनाताई म्हणाल्या.

"आमच्यात एवढंही भांडण झालं नाही. हे इतक्या छोट्या-छोट्या गोष्टींवरून धरून ठेवतात. तुम्ही त्यांना समजावून का सांगत नाहीत?" संगीता म्हणाली.

"मी तुमच्या दोघांमध्ये बोलणार नाही," मीनाताईंनी नकार दिला.

"तुम्ही आमच्यात भांडण लावत राहता ना," आज शेवटी ती बोलली.

"माझ्यावर का आरोप लावतेस, संगीता? तुमचंच एकमेकांशी पटत नाही. तुझंच वागणं नीट नाही. स्वतःत सुधारणा कर," त्या बराच वेळ बडबड करत होत्या.

ती आत गेली. ती खूप रडत होती. काहीच काम करावंसं वाटत नव्हतं. "मुलं आली की मी त्यांना घेऊन माहेरी निघून जाईन. आता मला सहन होत नाही. हे आणि त्यांची आई आरामात राहोत," ती स्वतःशीच पुटपुटली.
0

🎭 Series Post

View all