मागील भागात आपण बघितले….
विनिता आणि विराजला प्रचंड मानसिक धक्का लागला होता. कारण त्यांच्या मुलीने म्हणजे मैत्रीने त्यांना कोर्टाकडून नोटीस पाठवली होती की, “तिला आता त्यांच्या सोबत रहायचं नाहीये. तिला तिच्या पालकांन कडून डिवोर्स हवा आहे.” म्हणजे कायद्याच्या भाषेत Emancipation of a minor.
आता पुढे…
विनिताने रागातच मैत्रीला फोन केला. नेमका तो फोन अर्जुनरावांनी म्हणजे विराजच्या वडिलांनी उचलला. त्यांचा आवाज ऐकून विनिता अजूनच भडकली.
“झालं का बाबा तुमचं समाधान? गेली आमची मुलगी आमच्या विरोधात. हेच हवं होतं ना तुम्हाला?”.... विनिता
“विनिता तोंड सांभाळून बोल. काय बोलते आहेस तुझं तुला तरी कळतंय का?”... अर्जुनराव
विनिताचा वाढलेला आवाज ऐकून अर्जुनराव सुद्धा रागावले. त्यांचं बोलणं मैत्री ऐकत होती. तिने लगेच त्यांच्या हातातून फोन घेतला.
“तू आजोबांशी अशा भाषेत बोलू शकत नाहीस.”... मैत्री
“तुझी इतकी हिम्मत की, तू आम्हाला कोर्टाची नोटीस पाठवली. का केलं असं?”... विनिता बोलत होती आणि विराज सगळं ऐकत होता.
"मला तुमच्याशी बोलण्यात काहीच रुची नाहीये. तुला जे काही बोलायचं आहे ते कोर्टात बोल. इथे यायची गरज नाहीये, त्याचा काही उपयोग होणार नाही आणि हो आजी आजोबांना यातलं काही माहीत नाहीये.”....असं म्हणत मैत्रीने फोन कट केला.
तिचं बोलणं अर्जुनराव आणि अनिताबाई म्हणजे मैत्रीची आजी, ऐकत होते. ते काही बोलणार तितक्यात मैत्रीने सांगण्यास सुरुवात केली.
“आजी आजोबा, मी आता इथे कायमची राहणार. मला त्यांच्या सोबत नाही रहायचं. त्यांना तशी रीतसर नोटीस दिली आहे मी कोर्टाकडून. वकील माझ्या मैत्रिणीचे वडील आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसर केलं सगळं मी. तुम्हाला आधी सांगितलं असतं तर तुम्ही मला असं करू दिलं नसतं म्हणून सांगितलं नाही मी. बाकी तुम्हाला कळेलच लवकर"
"मैत्री अगं तुझे आई बाबा आहेत ते." अनिताबाई तिला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या.
"आजी आजोबा, मला समजवण्याचा प्रयत्न करू नका. आई बाबा आहेत पण ते काहीही वागतील आणि मी सहन करावं असे होणार नाही. त्यांना त्यांची चूक कळलीच पाहिजे. त्यासाठी जशास तसे वागावे लागेल." असं म्हणत मैत्री तिच्या खोलीत निघून गेली.
अनिता केविलवाण्या आणि काळजी भरलेल्या डोळ्यांनी अर्जुनरवांकडे बघत होती.
तिच्या नजरेतील प्रश्न अर्जुन रावांनी अचूक हेरला.
“ अनिता हे होणारच होतं एक ना एक दिवस. आता आपणच आहोत तिच्यासाठी सगळं काही.”... अर्जुनराव
“ हो पण अजून मैत्री फक्त सोळा वर्षांची आहे. इतक्या लवकर ती असं पाऊल उचलेल असं वाटलं नव्हतं.”... अनिताबाई.
दुसरीकडे विराज आणि विनिता मैत्रीच्या अशा वागण्यामुळे दुखावले गेले होते. वनिता आणि विराज प्रचंड चिडले होते. अशात मैत्री समोर आली असती तर तिला फटके नक्कीच पडले असते. विचारांच्या काहूरात तीन चार दिवस निघून गेले आणि कोर्टात जायचा दिवस उजाडला. विनिता आणि विराज कोर्टात पोहोचले. तिथे उभं राहून ते मैत्रीची वाट बघत होते. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू, आणि तिला चांगला जाब विचारू असं त्यांना वाटतं होतं.
थोड्या वेळात मैत्री, अर्जुनराव आणि अनिताबाई सुद्धा तिथे पोहोचले. विनिता आणि विराज त्यांना बघून त्यांच्या जवळ बोलण्यासाठी म्हणून गेले पण मैत्रीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि समोरच्या बाकावर जाऊन बसली.
"मैत्री चल जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे." विनिता ने मैत्रीच्या हाताला घट्ट पकडले आणि बोलताना रागाचा एक कटाक्ष अनिताबाई व अर्जुनरावांवर टाकला.
"आई, हात सोड माझा. आपण कोर्टात आहोत, घरी नाही. मी सांगितलं ना की, मला तुम्हा दोघांशी काहीही बोलायचे नाही." असं म्हणत मैत्री ने हात झटकला.
पुढील भागात बघू मैत्रीशी बोलण्यात विनिताला यश येईल का?
क्रमशः
© वर्षाराज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा