Login

जशास तसे... भाग ३(अंतिम)

साठे वकिलांचे हे वाक्य ऐकून अनिताबाई आणि अर्जुनरावांच्या काळजावर जसा कोणी सुरा चालवला असे त्यांना वाटले. नकळत आसवांचे दोन थेंब अनिता बाईंच्या गालावर ओघळले. विराज गुपचूप हे सगळं बघत होता.


मागील भागात आपण बघितले…


"मैत्री चल जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे." विनिता ने मैत्रीच्या हाताला घट्ट पकडले आणि बोलताना रागाचा एक कटाक्ष अनिताबाई व अर्जुनरावांवर टाकला.


"आई, हात सोड माझा. आपण कोर्टात आहोत, घरी नाही. मी सांगितलं ना की, मला तुम्हा दोघांशी काहीही बोलायचे नाही." असं म्हणत मैत्री ने हात झटकला.


आता पुढे…


"चल म्हणते ना."

"आई प्लिज. नको उगाच इश्यू करुस."


"कळतंय मला तुला कोणाची फुस आहे ते." विनिता परत अर्जुन राव आणि अनिता बाईंकडे रागाने बघत बोलली.


"आईऽऽऽऽ" मैत्री जवळ जवळ ओरडलीच.


"तू भेट नंतर मग बघते तुला." विनिता दात ओठ खात बोलली.


हा सगळा प्रकार बाजूलाच उभे असलेले मैत्री चे वकील सुधीर माने बघत होते.


"मॅडम तुम्ही मैत्रीला असे धमकावू शकत नाही. आणि तुम्ही असं केलं तर मी तुमच्यावर गुन्हा दाखल करील." वकील सुधीर माने

हे सगळं घडत असतानाच त्यांच्या केसचा पुकारा झाला. तसे सगळे आत गेले.

दोन्हीकडच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली.


"जाज साहेब, निव्वळ सोळा वर्षांच्या मुलीला काय कळतं? तिला तिच्या आजी आजोबांची शिकवण आहे.माझ्या क्लायंट ने मला सांगितलं आहे त्यावरून तरी हेच सिद्ध होते की, मैत्रीच्या आजी आजोबांना मैत्रीच्या आई बाबांचा सुखाचा संसार बघवत नाही." विराज आणि विनिताचे वकील साठे बोलत होते.


साठे वकिलांचे हे वाक्य ऐकून अनिताबाई आणि अर्जुनरावांच्या काळजावर जसा कोणी सुरा चालवला असे त्यांना वाटले. नकळत आसवांचे दोन थेंब अनिता बाईंच्या गालावर ओघळले.
विराज गुपचूप हे सगळं बघत होता.


"ऑब्जेक्शन माय लॉर्ड, वकील साठे असे कोणावर आरोप करू शकत नाही. वकील सुधीर माने


आरोप प्रत्यारोपानंतर मैत्रीला बोलण्याची संधी मिळाली.


“मैत्री तुला का वेगळं व्हावंसं वाटतं आहे? तुला तुझ्या आजी आजोबांनी शिकवलं आहे ना हे करण्यासाठी.?”वकील साठे

“ जज साहेब. माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. माझ्या आजी आजोबांनी मला असं करण्यास सांगितले नाही. हा माझा स्वतः चा निर्णय आहे." मैत्री अगदी निर्विकार पणे बोलत होती.


माझे आई वडील फक्त नावाला आहेत. मला जेव्हा पासून समजायला लागलं तेव्हा पासून मी सतत त्यांना भांडतानाच बघितले आहे. कोण सर्वात श्रेष्ठ? कोणाची कमाई जास्तं ? दोघे नेहमी आपलंच बरोबर आहे, हेच सिद्ध करायच्या मागे असतात.


दोघांना नेहमी एकमेकांना हेच दाखवायचं असतं की कोण मला जास्त पैसे देतं? कोण महागड्या वस्तू घेऊन देतं? आई वडील असून एकमेकांमध्ये चढाओढ असते.


नेहमी भांडणात डिवोर्सेच्या गोष्टी करतात आणि मी कोणाकडे राहणार ह्या साठी परत भांडतात.


पैशाने सगळं काही मिळतं असं म्हणतात दोघे. पण मला तर त्यांच्या पैशाने त्यांचं प्रेम आणि वेळ मिळतच नाही. लहानपणा पासून माझं सगळं माझ्या आजी आजोबांनी केलं. आजारपण काढलं, हट्ट पुरवले. माझ्याशी खेळले, माझ्यावर चांगले संस्कार केले.

"माझ्या शाळेत माझे पालक कधी आले नाहीत. माझ्या कडून फक्त अपेक्षा असतात की, मी त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. ते ऑफिस मधून आल्यावर त्यांना चहा पाणी द्यावं. पण ते माझ्यासाठी काहीच करत नाहीत. माझी आई म्हणजे विनिता देसाई मला कधीच सकाळी उठून डब्बा बनवून देत नाही कारण, तिला लवकर उठाव लागतं आणि मग तिचा आराम होत नाही का तर? नंतर तिला सुद्धा ऑफिसला जायचं असतं. माझी आजी किंवा आजोबा मला डब्बा देत. पण सासू सासरे नकोत ना तिला म्हणून त्यांच्याशी सुद्धा भांडून वेगळी निघाली. माझ्या डोक्यावरून मायेचा हात पण हिरावून घेतला ह्यांनी.


इतर मुलीच्या वडीलांप्रमाणे माझे वडील माझ्या मित्रासारखे कधीच वागत नाहीत. ते त्यांच्या आई वडिलांशी नीट वागू शकत नाहीत. त्यांचा मान ठेवत नाहीत. मग माझ्याकडून कशी अपेक्षा करतात की मी त्यांचा मान ठेवावा?


माझ्या मनात काय सुरू आहे हे कधीच जाणून घेतलं नाही आणि आता मला त्यांच्या अशा वागण्याचा प्रचंड मानसिक ताण होतो. माझ्या भविष्याच्या दृष्टीने मला हा ताण नको आहे. त्यांनी डिवोर्से घ्यायचा की, नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण मला त्यांच्या कडून डिवोर्से हवा आहे. मला त्यांच्या बंधनातून मुक्त व्हायचे आहे. मला माझ्या आजी आजोबांच्या सोबत रहायचं आहे. ते माझा एकमेव आधार आहेत. आणि मी त्यांच्या म्हातारपणाची काठी.”


कोर्ट मैत्रीच्या बोलण्याने स्तब्ध झालं होतं. विनिता आणि विराजला त्यांच्या वागण्याची जाणीव झाली होती.

कोर्टाने चूक सुधारण्याची एक संधी विराज आणि विनिताला दिली. त्यानुसार पुढील सहा महिने विराज आणि विनिताने फक्त मैत्रीच नव्हे तर अर्जुनराव आणि अनिताबाई ह्यांच्याशी चांगली वर्तणूक करावी आणि एका घरात राहणे भाग होते. असे न झाल्यास मैत्रीच्या अर्जावर शिक्कमोर्तब केला जाणार होता.

त्यानुसार पुढचे सहा महिन्यात विराज आणि विनिताची वागणूक बदलली. मैत्री, अर्जुनराव आणि अनिताबाई ह्यांच्याशी ते नीट वागत होते. त्यांच्यातील भांडणं संपून आता ते प्रेमाने रहात होते. सगळे खुश असेल तरी मैत्रीच्या मनावर जो परिणाम झाला होता त्याचे घाव इतक्या सहज भरून निघणार नव्हते. काही घाव तर असे असतात की ते कधीच भरून निघत नाहीत.


धन्यवाद…
© वर्षाराज

आपल्या वागण्याचा मुलांवर खूप परिणाम होत असतो. हेच सांगायचं आहे ह्या कथेतून. त्यामुळे पालकांनी वागताना, आपल्या मुलांवर त्याचा परिणाम होतो आहे हे लक्षात घेऊन वागावे. तुम्हाला माझी कथा कशी वाटली ते नक्की सांगा. आणि आवडल्यास एक लाईक करायला विसरु नका.
0

🎭 Series Post

View all