लेकी बोले सुने लागे
(भाग ३) सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
(भाग ३) सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिहीरचे लग्न ठरले होते. त्याला आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला मधुराला मन्याने जेवायला घरी बोलावले. मिहीरची बायको मधुरा साॅफ्टवेअर इंजिनिअर आणि एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर पदावर काम करत होती. पण सोना आणि तिच्या आईला काहीच माहिती नव्हते. त्या कायम स्वतःच्या विश्वात मशगूल असत. मधुरा छान साडी, लांब केस मोकळे सोडून त्यावर गजरा, एका हातात बांगड्या एका हातात स्मार्ट वाईट असे छान नटून थकून आली होती. सोना आणि तिच्या आईचा समज झाला की ही मिडलक्लास कमी शिकलेली असेल. कारण त्या स्वतः कधीच असे छान आवरत नव्हत्या. थोड फार हाय हॅलो झाल्यावर सोनालीने मुद्दाम इंग्रजीत बोलायला सुरवात केली. आधी मधुरा शांत होती, पण सोनाली तिला कमी शिकलेली समजते आहे हे लक्षात आल्यावर मधुरा तिच्या स्टाईलने सुरू झाली आणि मग सोनालीची ततपप झाली. सोनालीच्या चुका मधुरा काढायला लागल्यावर तिने मधुराला काय करतेस वगैरे विचारले. तिची पोझिशन, तिचा दर वर्षाचा इनकम ऐकूनच सोनाली गार पडली. आणि हाच चान्स घेत मन्याने सुरवात केली.
“ मधुरा, मग तू आता मिहीरला नोकरीचा राजिनामा द्यायला सांगितला असेल?” मन्याने विचारले.
“ का? त्याचा चांगला जाॅब आहे. आणि असे का वाटले तुला? “ मधुरा.
“नाही, नवर्याला नोकरी नसली की आयता नोकर मिळतो ना घर कामाला, म्हणून. “ मन्या सोनालीकडे पहात म्हणाला. (तो लेकी बोले सुने लागे चा बेमालूम वापर करत होता)
“नवरा काय किंवा बायको काय दोघेही संसारात तितक्याच महत्वाची असतात ना. त्यात कधी एक वरचढ एक दुय्यम नसतो, नसावा. काम कुठलाही असो ते कमी महत्वाचे, जास्त महत्त्वाचे नसते. मी तसे मानत नाही. मला चांगली नोकरी मिळाली हे माझे नशीब. म्हणून तो कमी महत्वाचा होत नाही. किंवा त्याचे कामही. अगदी आमच्या दोघांपैकी कुणीलाही तसे वाटत नाही. ” मधुरा म्हणाली.
“अरे बापरे, मग तुमच्या घरात कोण काम करणार? मन्या आश्चर्य करीत म्हणाला.
“ खरतरं आम्ही कामाला कोणी बाई किंवा माणूस ठेवणार आहोत. पण एखाद्या वेळी अगदी वेळ पडली तर किंवा मूड आला तर आम्ही दोघही उत्तम स्वयंपाक करू शकतो. आणि आम्हाला दोघांना स्वतःचे काम स्वतः करण्याची सवय आहे. आम्हाला आमच्यासाठी एकमेकांना त्रास द्यायला आवडत नाही. आणि कुठलेही काम हे काम असते. घरकाम असले तरी तेही कामच आहे. त्यालाही कष्ट पडतातच ना? आणि स्वयंपाक सुद्धा चांगला चविष्ट झाला तरच लोक खातील ना? हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.“ मिहीर म्हणाला.
“ आणि माझ्या पोस्टला हेल्पिंगस्टाफ अलाउन्स मिळतो. “ मधुरा हसत हसत म्हणाली.
“ भले शाब्बास, अरे तुम्ही तर नशीबवान आहात. नाहीतर आमचे नशीब. सगळे आयुष्य गुलामगिरीतच गेले. फक्त राणी सरकारांची मर्जी सांभाळायची. “ बाबांनीही वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. बाबा असे म्हणाल्यावर मन्याच्या सासूबाई उठून जाऊ लागल्या. मन्याने पटकन त्यांचा हात धरून त्यांना खाली बसवले.
“थांबा हो आई. कधी नव्हे ते बाबा बोलता येत आज. पुर्वीच्या सासवा आपल्या सुनांना इतक्या धारेवर धरत नसतील किंवा सगळेच नवरे ही बायकोचा इतका छळ करत नसतील. आमच्याकडे जेवताना टिव्ही बघायचा नाही. वेळीअवेळी वाचायचे नाही, मोठ्याने बोलायचे नाही, हसायचे नाही इतके नियम आहेत . “ मन्याने बाबांचीच लाईन पकडून ठेवली.
“ पण आता नाही हे सहन होणार. लग्नाच्यावेळी मला चांगली नोकरी नव्हती म्हणून मी घर मी सांभाळीन असे म्हणालो होतो. बाबा, मला चांगला जाॅब मिळाला आहे. मी पुढच्या आठवड्यात जाॅईन होणार आहे. माझेही आता चांगले दिवस येतील, मी ही एका पैशासाठी कुणाचा मिंधा होणार नाही. माझ्या खर्चासाठी मी स्वतः मिळवून, पण माझ्यावर अवलंबून असलेल्या कोणताही माणूस गुलाम असणार नाही. चला बाबा, तुम्हांला ही माझ्याबरोबर नेतो आणि या गुलामगिरीतून मुक्त करतो. “ मन्याने हे घोषित केल्याबरोबर सासूबाई आणि सोनालीचे चेहरे पांढरे पडले.
समाप्त
©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
मिरज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा