Login

तो आणि तो

प्रेम कधीच चौकटीबाहेर नसतं. ते चौकटीच्याआतच असतं. अशीच चौकटीच्या बाहेरची नव्हे, चौकटीच्या आतली ही कथा आहे अयनची, त्याच्या लग्नाची, त्याच्या नात्याची आणि त्याच्या प्रेमाची.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
(लघुकथा फेरी)

शीर्षक : तो आणि तो

"तुला अक्कल आहे की तू अक्कल गहाण ठेवलीस? काहीही काय बोलतोय?" आदर्शराव जगताप संतापून अयनला ओरडत होते.

"बाबा, काहीही बोलत नाहीये मी, खरं बोलतोय. मी नाही लग्न करू शकत त्या मुलीशी कारण मी गे आहे. ऋत्विज फक्त माझा मित्र नाही, माझं प्रेम आहे त्याच्यावर. माझा जोडीदार फक्त तोच आहे आणि कायम असणार; त्याच्या व्यतिरिक्त आणखी कुणीच नाही." अयन स्पष्ट शब्दांत बोलून मोकळा झाला.

"माझा मुलगा असून असं कसं बोलतोयस तू? मला वाटतं, तू खूप जास्तच राहतोय ऋत्विजबरोबर हल्ली; म्हणून तुला असं वाटतंय. तुझं लग्न झालं की होशील तू बरा." आदर्शराव काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

"बाबा, मी आजारी नाहीये आणि ऋत्विज मला खूप आधीपासून आवडतो. प्लीज, जरा समजून घ्या, ऋत्विज माझा बॉयफ्रेंड आहे. आठ वर्षे झाली आम्ही एकत्र आहोत. त्याच्या बाबांनाही माहिती आहे आमच्याबद्दल आणि त्यांची काहीच हरकत नाही. ते म्हणाले की त्यांच्यासाठी आमचा आनंद महत्त्वाचा आहे. बाबा, लोक आणि समाज काय विचार करतील, ह्याच्याशी मलाही घेणं-देणं नाहीये. मला फक्त तुमचं मत जाणून घ्यायचंय कारण माझ्यासाठी माझं जग फक्त तुम्हीच आहात आणि माझ्या जगात मी त्यालाही प्रवेश दिलेला आहे; म्हणून बाबा इतरांचा विचार न करता आमच्या नात्याला परवानगी द्या." तो कळवळून बोलत होता आणि त्याचे बाबा थक्क होऊन ऐकत होते.

"बाबा, असा अबोला नका ना घेऊ. तुम्हीच म्हणत असता ना, जोड्या स्वर्गात जुळतात. मग बाबा त्याची नि माझी रेशीमगाठही स्वर्गातच जुळून आलीये! माझा सोलमेट फक्त तोच आहे, दुसरं कोणी होऊच शकणार नाही. तुम्ही एक संधी तर द्या आमच्या नात्याला..." त्याचे पाणीदार डोळे पाहून आदर्शरावांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या होत्या; पण लेकाचा निर्णय मान्य करायला त्यांचे मन आणि जीभ वळत नव्हती.

हृदय आणि बुद्धीच्या डाव-पेचात त्यांचे विचार आडवे आले आणि ते चढ्या आवाजात म्हणाले, "मला तुमचं नातं मान्य नाही. आता तू ठरव तुला त्या परक्या मुलाशी असलेलं नातं जपायचंय की आपलं बाप-लेकाचं नातं जपायचंय. निर्णय सर्वस्वी तुझा आहे."

"तुम्हाला हेच मंजूर असेल तर ठीक आहे." असे बोलून तो उलट्या हाताने डोळे पुसत तिथून निघून गेला.
...........

एकीकडे मंगलाष्टक सुरू होते. दुसरीकडून सनई-चौघड्यांचा आवाज येत होता. उपस्थित सर्वजण आनंदी होते; पण ज्याचे लग्न होते तोच नाखूश होता. निर्विकारपणे बसून यंत्रवत भटजी सांगतील त्याप्रमाणे विधी करत लग्न संपन्न झाले.

गृहप्रवेश आणि लग्नोत्तर विधीत आणखी काही दिवस निघून गेले. वैवाहिक आयुष्य सुरू झाले होते; पण फक्त नावापुरतेच! प्रत्यक्षात दोघांत ओढ वा शारीरिक जवळीक नव्हती. अयन तर पुढाकार घेणार नव्हताच पण कृतिकानेही (त्याची बायको) कधी पुढाकार घेतला नाही. एकाच खोलीत असूनही दोघे एकमेकांशी बोलायचेसुद्धा नाही.

अयन जेव्हा कृतिकाला पाहायला गेला होता तेव्हा त्याने तिलाही त्याच्या प्रियकराबद्दल सांगून लग्नाला नकार द्यायला सांगितले होते, तरीही तिने होकारच दिला. आता लग्न झाल्यावर मात्र तिचा वेगळाच आविर्भाव होता पण त्याने तिला विचारण्याची तसदी घेतली नाही, कारण तिच्याशी त्याला संसार थाटायचाच नव्हता. बळजबरी ते नाते त्याच्यावर लादले गेले होते.

अयन तीन महिन्यांपासून आदर्शरावांशीही बोलत नव्हता कारण त्यांनी त्याला वडील किंवा प्रियकर यापैकी एकाची निवड करायला सांगितले होते. आदर्शरावांनी बायकोच्या निधनानंतर अयनला खूप लाडाने, जबाबदारीने सांभाळले होते. कधी कशाचीही कमी भासू दिली नव्हती म्हणून अयनचा नाईलाज झाला आणि त्याने त्याच्या प्रियकराशी नाते तोडले.

असेच दिवस सरता सरता लग्न होऊन पंधरा दिवस उलटले. त्याचेच घर आता त्याला परके वाटायचे; म्हणून तो लवकर ऑफिसला जायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा. एक दिवस आदर्शरावांनीच पुढाकार घेऊन कृतिका आणि अयनला मधुचंद्रासाठी केरळला जाण्यास सांगितले. तसेच रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या लग्नाची नोंदणी करायलाही सांगितली. अयन फक्त हुंकार भरून निघून गेला; पण कृतिकाने एक दिवसासाठी माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. लग्न झाल्यानंतर ती एकदाही माहेरी गेली नव्हती; त्यामुळे आदर्शरावांनी होकार दिला.

आदर्शरावांनी अयनला सांगितले होते कृतिकाला माहेरी सोडायला; पण कृतिकाच म्हणाली की ती एकटी जाऊ शकते, काळजी करण्याचे कारण नाही. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे कृतिका माहेरी गेली आणि अयन ऑफिसला. त्याचा दिवस कामातच गेला. रात्रीही बराच वेळ अयन ऑफिसमध्येच होता.

तो घरी आला तेव्हा आदर्शराव हॉलमध्येच सोफ्यावर बसून होते. तो दुर्लक्ष करून खोलीत जात होताच की ते त्याला म्हणाले, "अयन..."

त्यांचा हळवा आवाज ऐकून आता अयन तिथेच थांबून त्यांना म्हणाला, "काय झालं?"

"कृतिका घर सोडून गेली." आदर्शराव म्हणाले.

"म्हणजे?" अयन म्हणाला.

"ती माहेरी गेलीच नाही." आदर्शरावांनी खुलासा केला.

"का?" अयनने विचारले.

"तिला तुझ्याशी कधी लग्न करायचंच नव्हतं. तिला पुरुष आवडतच नाहीत. तिची प्रेयसी होती. तिचं कुटुंब त्यांच्या नात्याला स्वीकारणार नाही म्हणून तिने तुझ्याशी तात्पुरतं लग्न केलं. काल मी तुम्हाला रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन तुमचं लग्न रजिस्टर करायला सांगितलं, तिला ते नको होतं. योग्य संधी साधून तिने माहेरी जात आहे असं सांगितलं; पण प्रत्यक्षात माहेरी न जाता ती तिच्या प्रेयसीसह विदेशात गेली. हे बघ, तिने फ्लाईटमध्ये बसण्याआधी मॅसेज करून माफी मागितली." आदर्शराव मोबाईलमधला मॅसेज दाखवत म्हणाले.

"ह्म्म. बरं मग आता पोटगी तर द्यायची नाही कारण कायद्याने मी अजूनही अविवाहित आहे, तर तुम्ही या घराण्याची सून शोधायला आणखी एकदा मोकळे झालात. सगळं ठरलं की कळवा, मी बोहल्यावर चढेन परत." तो निर्विकारपणे म्हणाला आणि जाऊ लागला.

"अयन मला माफ कर. तू माझ्या होकारासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिलास. मी नकार दिल्यावर यंत्रवत मी म्हणेल तेच केलं, तर दुसरीकडे कृतिका तिने तर तिच्या माहेरी तिच्या प्रेयसीविषयी काहीच कळवलं नाही. तिने स्वतःचा विचार केला आणि निघून गेली. खरंतर ती चुकीची नव्हतीच; कारण घरी कळवलं तरी त्यांनीही तिला तिच्या प्रेयसीला सोडायलाच सांगितलं असतं म्हणून तिने स्वतःला निवडलं; पण तू प्रेमाऐवजी मला निवडलं, किंबहुना मी तुला ते करायला भाग पाडलं. मी खूप वाईट बाप आहे. मी समाजाच्या भीतीने तुझ्या आनंदाचा विचार केला नाही. ज्या मुलाला हवं ते मिळावं म्हणून आयुष्यभर झटलो, त्याच मुलाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद मी हिरावून घेतला. मला माफ कर." आदर्शराव रडतच माफी मागत होते.

आज पहिल्यांदा तो त्यांना रडताना पाहत होता. त्यांचे अश्रू पाहून त्याचा राग मावळला आणि त्याने उदार मनाने वडिलांची माफी स्वीकारली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी अयन आणि ऋत्विजच्या नात्याला स्वीकृती दिली. अयनचे डोळे पाणावले आणि त्याने आदर्शरावांना कडकडून मिठी मारली.

दुसऱ्या दिवशी अयन ऋत्विजला भेटायला त्याच्या घरी गेला. त्याने आधी माफी मागितली, तीन महिन्यांत त्याच्या आयुष्यात जे काही घडले त्याची माहिती दिली आणि आता आदर्शरावांनी त्यांच्या नात्याला स्वीकृती दिल्याचेही सांगितले. ऋत्विज मात्र काही न बोलता निघून जाऊ लागला तर अयनने परत माफी मागितली व त्याला आणखी एक संधी मागितली; पण ऋत्विजने त्याला माफ केले नाही आणि संधी देण्यासही नकार दिला.

"का आणि कशासाठी द्यावी मी तुला संधी? तू एकदा मला सोडून गेलास, परत नाही जाणार हे कशावरून? कसाबसा मुव्ह ऑन करतोय, नको तेच दुखणं परत..." तो बोलून त्याच्या खोलीत निघून गेला. दार आपटण्याचा आवाज मात्र अयनच्या कानात निनादत राहिला.

तेवढ्यात ऋत्विजचे बाबा—सूर्यकांत सराफ तिथे आले. त्यांनी कदाचित दुरूनच सर्वकाही ऐकले होते म्हणून ते म्हणाले, "आता त्याने जरी होकार दिला तरी माझा नकार असेल. काय समजलं होतं मी तुला अयन आणि तू काय निघालास? कसे काढलेत त्याने ते दिवस तुला माहितीये? अजूनही तुमच्या ब्रेकअपचा दिवस आठवून रडत असतो तो... खूप सहन केलं माझ्या मुलाने... नीट जेवण करत नाही की जास्त बोलत नाही. हसरा, खोडकर, खट्याळ माझा ऋत्विज शांत झाला फक्त तुझ्यामुळे... चालता हो आणि परत येऊ नकोस."

"बाबा..." तो बोलतच होता की त्यांनी थांबवले.

"आपल्यात ते नातं राहिलेलं नाही. तू गमावलंस हे नातं ज्यादिवशी तू माझ्या मुलाला एकटं सोडून गेला होतास." सूर्यकांत कठोर आवाजात म्हणाले.

"बाबा, मी चुकलो मला मान्य आहे; पण मी तुमचं मन परत जिंकणार आणि ऋत्विजचं प्रेम परत मिळवणार." अयन निश्चय करत म्हणाला.

"वाट बघ." सूर्यकांत खोचकपणे म्हणाले.

उलट उत्तर न देता अयन निघून गेला. त्यानंतर तो प्रयत्न करत राहिला. आपल्या कृतीतून, शब्दांतून, जमेल त्या प्रकारे व्यक्त होऊन, माफी मागून तो आणखी एक संधी मागत होता; पण ऋत्विजचा नकार ठाम होता. असेच आणखी काही महिने सरले. खूप एकटा आणि हतबल झाला होता तो ऋत्विजच्या आधाराविना; म्हणून तो एक दिवस त्याच्या आठवणीत रडत होता. त्याच्या बाबांना लेकाची अवस्था पाहावली गेली नाही आणि ते एकटेच ऋत्विजला भेटायला गेले.

"ऋत्विज तुझा गुन्हेगार मी आहे, अयन नाही. तो शेवटपर्यंत प्रयत्न करत होता; पण मी त्याला आपल्या दोघांपैकी एकाला निवडायला सांगितलं. मला माहीत होतं की त्याला माझ्या कष्टांची जाणीव आहे म्हणून त्याचा नाईलाज होईल व तो तुझ्याशी नातं तोडेल आणि झालंही तसंच. तू जेवढ्या यातना सहन केल्या तेवढ्याच त्यानेही सहन केल्या. दिवसा तो स्वतःला कामात गुंतवून ठेवायचा आणि रात्री तुझ्या आठवणीत झुरायचा. तुझ्याशी नातं तोडायला त्याला मी भाग पाडलं होतं हेदेखील त्याने तुला सांगितलं नसेल. मी तुझी माफी मागतो पण तू त्याला एकटं सोडू नकोस. तुझा राग स्वाभाविक आहे; पण तो त्याच्यावर नव्हे तर माझ्यावर काढ. हवी ती शिक्षा दे तू मला पण त्याची साथ सोडू नकोस. खूप खचला आहे तो... तुझ्याविना रूक्ष आहे त्याचं आयुष्य; म्हणून तू पाठ फिरवू नकोस. त्याचा आनंद तू आहेस म्हणून त्याच्या सुखाची मी तुला भीक मागतो. त्याला एकदा संधी दे, तो परत कधीच तुला निराश करणार नाही." आदर्शरावांनी रडतच हात जोडले.

अयनने नाईलाजाने नाते तोडले हे ज्या क्षणी कळले त्याच क्षणी ऋत्विजचा राग नाहीसा झाला होता. अयनची बाजू कळताच तो पळत अयनला भेटायला गेला. सूर्यकांत अजूनही नाराज होते. आदर्शरावांनी त्यांची माफी मागितली आणि त्यांना शब्द दिला की परत कधीच असे घडणार नाही. शेवटी ऋत्विजच्या आनंदासाठी सूर्यकांत सराफ यांनी माघार घेतली.

ऋत्विज आला तेव्हा अयन रडतच होता; पण ऋत्विजची चाहूल लागताच त्याने अश्रू लपवण्याचा प्रयत्न केला. ऋत्विजने दुसऱ्याच क्षणी त्याला घट्ट मिठी मारली.

"माझंही तुझ्यावर प्रेम आहे. अयनविना ऋत्विज अपूर्ण आहे म्हणून शेवटची संधी देतोय प्लीज..." ऋत्विज बोलतच होता की अयनने त्याला परत मिठी मारली.

"परत कधीच तुला एकटं सोडणार नाही कारण ऋत्विजविना अयनही पाषाण आहे." अयन भावनांना आवर घालत म्हणाला.

त्यानंतर बराच वेळ ते दोघे त्यांच्या नात्याच्या भविष्याची स्वप्ने रंगवत तसेच एकमेकांना बिलगून राहिले.

समाप्त.
©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
0