Login

नाती उमलताना भाग -१

नाती उमलताना
चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा 2025 

नाती उमलताना

भाग पहिला 

अर्चना नव्या आयुष्याची पायरी चढून नुकतीच या घरात आली होती.अर्चना ,तिचा नवरा अमोल आणि सासु सासरे असे छोटसे कुटुंब. 

लग्नाच्या दिवशी तिच्या आईने एक वाक्य हळूच कानात सांगितलं होतं "बाळा, संसार सोन्यासारखा कर, पण लक्षात ठेव या घरावर तुझ्या सासूबाईंचं कठोर राज्य आहे. त्यांचा स्वभाव जरा टोकाचा आहे. तू समजुतीने राहिलीस तर सगळं निभावेल."

आईच्या शब्दांना अर्चनाने हो एवढेच उत्तर दिले.

गीता ताईंचा स्वभाव चिडचिडा असल्यामुळे शेजारीपाजारी त्यांना मागून “हिटलर” म्हणून हिणवत असत.

पहिल्याच दिवशी त्यांनी सकाळी पाच वाजताच अर्चनाला उठवले.
“सुनबाई, घरातलीच लक्ष्मी उशिरा उठली तर देवी लक्ष्मी तरी कशी नांदेल आपल्या घरी? उठ पटकन. तुळशीला पाणी घाल, पूजा कर आणि देवापुढे नैवेद्य ठेव.”

डोळे चोळत अर्चना म्हणाली, “आई, उठतेच आहे हो. पण थोड्या दिवसाने ऑफिसलाही जावे लागेल त्यामुळे जर उठण्याचा वेळ थोडा बदलता येईल का हो?”

गीताताई लगेच कडक आवाजात म्हणाल्या, “माझ्या घरातले नियम बदललेले मी अजिबात खपवून घेणार नाहीत. कामाला जा नाहीतर दुसरीकडे कुठे जा, पण घरातली सर्व कामं आधी करायची.”

हे ऐकून अर्चना शांत झाली. पण तिचे मन खट्टू झाले होते. ती शिकलेली, स्वतंत्र, स्वतःचे करिअर सांभाळणारी मुलगी होती. पण या घरात पाऊल टाकल्यापासून तिला जाणवले की तिचं मत, तिचा वेळ, तिच्या कामाचे इथे काहीच महत्त्व नाही.

दिवसांवर दिवस जात होते, पण सासूबाईंचं वागणं अजूनच कठोर वाटू लागले. एका संध्याकाळी भाजी करताना त्यांनी टीका केली.
“एवढं मीठ कोण घालत भाजीमध्ये? जेवण परिपूर्ण असल पाहिजे, नाहीतर लोक काय म्हणतील?” जेवण, नीट आलचं पाहिजे.”

कपडे धुताना ही टोमणा,
“अगं, पांढरे कपडे नीट धुऊन घ्यायचे. त्या डबड्यात काय स्वच्छ होतात कपडे? तुम्हा मुलींना शारीरिक हालचाल नको वाटते. रोज हातानेच कपडे धुवायचे. आजकालच्या सुनांना शिस्तच उरली नाही.”

असेच एक दिवस अर्चना आपल्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होती. ते पाहून सासूबाई कानाशी येऊन म्हणाल्या,
“काय गं? एवढा वेळ कुणाशी बोलतेस? हे असले फोनवर बसून राहणे मी खपवून घेणार नाही.”

रोजचे टोमणे, उपदेश ऐकून अर्चना पार रडकुंडीला आली होती. तरीसुद्धा सासूबाईंचा आदर ठेवून तिने  तोंडातून एकही अक्षर उलटून बोलली नाही.

अर्चना रोज ऑफिस करून दमून येत असे. तरीसुद्धा शारीरिक कामावरच भर दिला जात होता. अमोलला काही सांगावे असं तिच्या मनात येई, पण नवरा आईला धरूनच वागे.