Login

नाती उमलताना भाग -३

नाती उमलताना
चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा 2025 

नाती उमलताना

भाग तिसरा

काही दिवस घरातले वातावरण जणु भकास वाटत होते. सासू-सुंना  दोघी एकमेकांसोबत बोलत नव्हत्या. काही काम असेल तर कामापुरते दोन शब्द.

सकाळी गीता आपल्या नेहमीच्या गडबडीत आणि अर्चना आपली नोकरी आणि घर सांभाळण्यात व्यस्त. घरातल हसू जणु कुठे हरवले होते.

एका शनिवारी मात्र अर्चनाला अचानक ताप भरला त्या तापामुळे तिला अंगदुखी, डोके दुखी सर्वच एकत्र सुरु झाले.

ऑफिसला सुट्टी असल्याने तिने पलंगावरून उठण्याचा प्रयत्नही केला नाही. दिवसभर ती तशीच पडून राहिली.

सुरुवातीला गीता काही बोलल्या नाहीत. मनाशीच विचार करत राहिल्या“नोकरी, फोन, इकडे तिकडे फिरणं जास्त धावपळ झाली की असेच होते. पण बोलले तर राग येतो. आजकालच्या मुलींचा स्वभावच असा. आराम नकोच!”

पण संध्याकाळपर्यंत अर्चना उठलीच नाही, तेव्हा गीतांच्या मनातल्या चिडीबरोबरच काळजीही डोक वर काढू लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी गीता उठून स्वतःच सगळी कामं करू लागल्या. अंगण झाडणं, घर आवरणं, अमोलसाठी डबा बनवणं… सर्व काही स्वतःच्या हाताने केलं. पलंगावर पडलेली अर्चना हे सगळं पाहत होती. तिच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली 
“मी आजारी असल्यामुळे सगळी कामं आईवर आली. खरंच, त्यांच्या वयात त्यांना एवढं करायला लावणं योग्य आहे का? मी जर थोडी संयमाने वागले असते, त्यांचे ऐकल असते, तर आज अशी पडून राहिली नसते.”

दुपारी गीता तिच्या खोलीत आल्या. हातात गरम हळदीच्या दुधाचा ग्लास आणि औषध होते. त्यांनी अर्चनाला अलगद बसवले आणि औषध तिच्या हातावर ठेवत म्हणाल्या,
“अगं, एवढा सगळा त्रास होत होता तर मला आधी का नाही सांगितलेस? सगळी काम एकटीच अंगावर का घेतलीस?”

अर्चनाच्या डोळ्यांत पाणी आलं. तिने कापऱ्या आवाजात उत्तर दिले,
“आई, अहो खरं तर मी सर्व तुमच्या अंगावर पडू नये म्हणून करत होते पण ऑफिस, प्रवास, घरकाम हे सगळं सांभाळताना थकून हि जाते. तुम्हाला विरोध करायचा नव्हता कधी, पण कधी तुमच्या अपेक्षा माझ्या वेळेशी जुळत नव्हत्या. म्हणून गप्प राहिले.”

गीता बराच वेळ शांत बसल्या. त्यांच्या डोळ्यांतला कठोरपणा हळूहळू विरघळू लागला. मग हळुवारपणे म्हणाल्या,
“आमच्या काळात वेगळं होतं. आम्ही घराबाहेर पडलोच नाही, पण तुमाची पिढी मात्र दोन्ही जबाबदाऱ्या पेलता  बाहेरचीही, आतलीही. तुला खरंच अवघड जात असेल तर आपण काहीतरी बदल करूया. काही कामं तू बघ, काही मी बघते. एकमेकींवर राग काढून काही उपयोग नाही गं.”

त्या दिवसानंतर घरातला माहौल हळूहळू बदलू लागला. अर्चना ऑफिसमधल्या गोष्टी मोकळेपणाने आईला सांगू लागली. गीता तिच्या कामाचं कौतुक करू लागल्या. रविवारी दोघींनी मिळून स्वयंपाकघरात पुरणपोळी केली आईच्या हातचं पीठ आणि सुनेच्या हातचं पुरण. घरभर गोड वास पसरला.

तो वास, ती चव, आणि त्या क्षणी दोन पिढ्यांचा मनोमन झालेला मिलाफ होता.

अमोलने हे दृश्य पाहिलं आणि मनोमन हसला. त्याला जाणवलं की आता त्याच्या घरात दोन पिढ्या एकमेकींशी फक्त भांडत नव्हत्या, तर एकमेकींना समजून घेत, थोडं झुकून, एकत्र जगायला शिकत होत्या.