Login

जिवलगा कधी रे येशील तू

I am an academician by profession. My interests include reading, writing, shopping. I am very foodie. I have thorough understanding of music. I am a big fan of old Hindi rare songs. ... Deep concern for underprivileged people.

जगातील सगळ्यात समजूतदार आणि प्रेमळ नवऱ्याला,
मला जर विचारलं, तुला नवरा कसा हवा, तर माझं उत्तर एका वाक्यात आहे, तूच माझं जग आहेस, म्हणणारा. लग्न म्हणजे एक प्रकारचा व्यवहार आहे, हे माझ्या कधीच पचनी पडणार नाही. माझ्यासाठी ते फक्त आणि फक्त समर्पण आहे (त्याग नाही हा). लहानपणापासूनच माझं नितांत प्रेम आहे, तुझ्यावर. प्रेम काय फक्त माहित असलेल्या व्यक्तीवर करतात! उलट कल्पनेतील व्यक्ती जास्तच जवळची असते ना..कारण ती कधी दुखवत नाही आपल्याला. तुला माहितीये का तुझी बायको किती रोमँटिक आहे.. तिचा आनंद फार छोट्या छोट्या गोष्टींत असतो आणि उदास पण मग ती छोट्याशा गोष्टीने होते. 
तुझी बायको चारचौघी सारखी बिलकुल नाही. एखादी गोष्ट वर्षानुवर्ष चालत आली, म्हणून करणाऱ्यातली नाही. किंबहुना, जी गोष्ट सगळे करतात, ती योग्य, हे माझ्या पचनी पडतच नाही. मला स्वतंत्र बुद्धीने विचार करता येतो आणि तो प्रवाहाविरुद्ध असला तरी सगळी आव्हानं पेलण्याची ताकद माझ्यात आहे, पण त्याने तू नाराज असशील, तर मला त्रास होईल. याचा अर्थ असा नाही की तुला माझी प्रत्येक गोष्ट पटली किंवा आवडली पाहिजे, पण माझ्या बायकोची स्वतंत्र अशी मतं आहेत आणि त्याप्रमाणे वागण्याचं धाडस ही तिच्यात आहे, याचा तुला अभिमान असावा, एवढं वाटतं मला.
मुळात दोन माणसांनी एकत्र का राहावं तर, एकमेकांच्या सहवासात ते अधिकाधिक समृद्ध होत जातील. 

मी प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे..म्हणजे फक्त प्रोफेशनल पातळीवर नाही तर वैयक्तिक आयुष्यात ही.. सिंधूताई सपकाळ यांच्या वरच्या चित्रपटात तिचा बाबा म्हणतो, करिअर म्हणजे फक्त शिक्षण घेऊन पैसा कमावणं नाही. तर आपली मतं मांडता येणं, आपल्याला ज्या गोष्टी योग्य वाटत नाही त्यांना विरोध करणं, हेही करिअरच आहे. त्या करिअर मध्ये मला जास्त उंच झेप घ्यायचीय, अर्थात तुझ्या सोबतीने..

तू माझ्या मटेरियलीस्टिक गरजा पूर्ण कराव्यात, अशी माझी बिलकुल अपेक्षा नाही. जसं आपण म्हणतो, संसार दोघांचा आहे, तर स्वयंपाक मी एकटी का करू, तशाच आर्थिक जबाबदाऱ्या आपल्या मिळून असतील. आणि आपलं कितीही मोठं भांडण झालं तर मला खुश करण्यासाठी महागडं गिफ्ट देण्यापेक्षा, तू जर माझ्यासाठी एखादं छान रोमँटिक गाणं म्हटलं, तर माझा रुसवा लगेचच जाईल किंवा माझा आवडता पदार्थ बनवला तर अजूनच छान..(ऑर्डर केलास तरी चालेल) आणि चूक माझी असेल, तर तुला काहीच करावं लागणार नाही. मी नेहमी तयारच असेन म्हणायला, अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना..
आणि आपल्यात हे काम माझं, हे तुझं असं कधीच नसेल. जो लवकर घरी येईल, तो स्वयंपाकाला सुरुवात करेल किंवा ज्याला जे काम सोपं जात असेल तसं आपण करु. वुई विल अल्वेज बी टीम.
मी आईशिवाय जराही राहत नाही, तर सगळे म्हणतात, लग्नानंतर कसं होणार. पण मी सांगते, माझा नवरा मला आईपासून कधीच दूर करणार नाही. मग त्यांना वाटतं, घरजावई करून घेणार आहे का... मग मी जरा त्यांना समजावून सांगते, आम्ही एका कॉम्प्लेक्स मध्ये घरं घेऊ, अगदीच नाही, तर एका परिसरात तरी. आणि सासर माहेर असा विचार करण्यापेक्षा, हे आईचं घर आणि हे नवऱ्याचं घर.. म्हणजे कसं दडपण नको. 

एखादा संबंध दिवस मी फक्त शिरीष कणेकर च्या यादों की बारात मधील किंवा आचार्य अत्रेंच्या मी कसा झालो मधील किस्से सांगत बसेन.
एखाद्या वेळी अचानक अशी हाक मारेन की तू घाबरून काय झालं बघायला येशील, तर मी म्हणेन, हे पण काव्य राजेंद्र कृष्णचं आहे; आणि सज्जाद हुसेन बद्दल बोलताना मी पृथ्वीवर नसेनच. 
एखाद्या वेळी कर्णबद्दल बोलताना माझ्या डोळ्याच्या कडा ओलावतील किंवा मधुबालाच्या शेवटच्या काळाबद्दल बोलताना हुंदका ही अनावर होईल. तेव्हा तू माझं भावविश्व समजून घेशील.
मला आपल्यात सगळ्यात आधी मैत्रीचं नातं फुलायला हवय. हे मी ह्याला कसं सांगू, असं वाटणं नको. माझ्या आयुष्यात मला कळायला लागल्यापासूनच्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी मला तुझ्याशी शेअर करायच्या त.  म्हणजे अख्खं आयुष्य तू बरोबर असल्याचा फील येईल. पुढच्या जन्मी तर तू लहानपणीचा सवंगडीच असशील.. या जन्मी किती उशीर करतोस...
मला तुझ्याबरोबर खूप मजा करायचीय..बॅडमिंटन, कॅरम खेळायचं आहे; आणि पत्ते पण. सारखं सारखं मी हरत असेन तर तू मला मुद्दामहून जिंकू द्यायचंस..हा हा हा आणि मला असं युरोप फिरण्यात वगैरे रस नाही, माथेरानला पण मला तितकीच मजा येईल. मला जागेपेक्षा सहवास महत्वाचा वाटतो.. आणि तो खर्च समाजाच्या तरी कामी येईल. माझ्या त्याबद्दलच्या कल्पना मी भेटल्यावर सांगेन.
लवकर ये ना... मला म्हणायचं आहे, अब तो आके तुमने हमको जीना सीखा दिया है, चलो दुनिया नयी बसाएंगे...

आतुरतेने वाट पाहणारी तुझी सखी,.....

0