Login

तो, ती आणि... ते? | भाग ३

This Is The Story Of Nalini, Nishant and Him?
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

भाग ३

घरात येऊन निशांतने धाडकन दरवाजा बंद केला. दरवाजाच्या आवाजाने नलिनी शुद्धीवर आली. इतका वेळ ती तिच्या भानात नव्हती. भानावर आल्यावर तिने समोर पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला.

तिला दिसले की, निशांत समोरच एका कोपऱ्यात बसून भीतीने थरथरत होता. ती हातातील फुलं खाली टाकून धावतच त्याच्या जवळ गेली.

त्याच्या जवळ जाऊन ती त्याच्या बाजूला बसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला काय झाल्याचं विचारू लागली; पण भीतीने त्याच्या मुखातून शब्द फुटेना झाले. तिने उठून त्याच्यासाठी ग्लासात पाणी आणले आणि त्याला पाजले.

पाणी पिऊन देखील त्याला बरं वाटत नव्हतं. त्याला दरदरून घाम फुटला होता. त्याचं संपूर्ण अंग भीतीने कापत होतं. त्याच्या चेहऱ्यावर भिती स्पष्ट दिसत होती.

तिने त्याला काय झाल्याचं विचारण्याचा खूप प्रयत्न केला. तो देखील बोलायचा प्रयत्न करत होता; पण त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडत नव्हते. तिला देखील काय करावे समजेना झाले. तो त्या थरथरत्या हाताने दरवाजाच्या दिशेला बोट दाखवू लागला.

तिला आता त्याची काळजी वाटू लागली. ती तशीच उठून देव्हाऱ्यासमोर गेली आणि तिने देवा समोर हात जोडले. मग तिने देवा समोरची अंगाऱ्याची डब्बी उचलली आणि त्याच्या जवळ जाऊन देवाचं नाव घेऊन त्यातील अंगारा त्याच्या कपाळाला लावला.

अंगाऱ्याच्या स्पर्शाने तो थोडा शांत झाला. ती त्याला पुन्हा काय झाल्याचं विचारू लागली. त्यावर तो तसाच घाबरलेल्या स्वरात हळूहळू तिला बोलू लागला,
" त्या... त्या... झाडावर कोणी तरी आहे नलिनी... ते आपल्याला जिवंत नाही सोडणार ते... ते... आपल्याला मारून टाकणार. ते तुला पण फसवतंय त्याच्यावर फुलं वगैरे काही नाहीत. तो सुगंध ती फुलं ते फसवे आहे सगळं. जे फक्त तुलाच जाणवतंय! तू त्यात भुलून जाऊ नकोस."
त्याचं ते सगळं बोलून ऐकून तिच्या पाया खालची जमीनच सरकली. तिने त्याला तसंच लगेच आपल्या मिठीत घेतलं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला शांत करू लागली. 

त्याला शांत करत ती बोलू लागली,
" असं काही नाही होणार तुम्ही शांत व्हा बघू आधी आणि चला आत तुम्ही शांत झोपा . मी आहे ना तुमच्या जवळ, मी नाही जाणार तिथे काळजी करू नका."
इतकं बोलून ती त्याला त्यांच्या खोलीत घेऊन गेली आणि त्याला बेडवर तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपवलं.

त्याला झोपवताना ती त्याच्या केसांमधून हात फिरवत त्याच्या बोलण्याचा विचार करू लागली. तो जसं बोलत होता तसं अजून तरी तिला काहीच जाणवलं नव्हतं. म्हणून तिने त्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवलं.

काही वेळाने त्याला शांत झोप लागल्याचं तिला समजलं. तिने त्याच्या सुरक्षेसाठी त्याच्या भोवती हातातील डब्बीतील अंगाऱ्याचे रिंगण काढले आणि ती हळूच दबक्या पावलांनी खोली बाहेर आली आणि तिने हळूच दरवाजा बाहेरून बंद करून घेतला.

तशीच ती मुख्य दरवाजाच्या बाहेर येऊन घरच्या मागच्या दिशेला त्यांच्या बागेत त्या झाडा जवळ जाऊ लागली.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ
0

🎭 Series Post

View all